प्रा.डॉ.अशोक चौसाळकर : प्रबोधन चळवळीशी नाळ असलेले विचारवंत राज्यशास्त्रज्ञ ------------------



प्रेस मीडिया लाईव्ह :

 प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

महाराष्ट्रातील ज्येष्ठ विचारवंत,नामवंत राज्यशास्त्रज्ञ, राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय राजकारणाचे - समाजकारणाचे  विश्लेषक, समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष आणि गेल्या चाळीस वर्षापासूनचे माझे जेष्ठ स्नेही, मार्गदर्शक  प्रा.डॉ.अशोक चौसाळकर १५ मार्च २०२४ रोजी अमृत महोत्सवी वर्षात पदार्पण करत आहेत. त्यांना समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या मनःपूर्वक शुभेच्छा..!

१५ मार्च १९५० रोजी आंबेजोगाई मध्ये डॉ. अशोक चौसाळकर यांचा जन्म झाला.त्यांचे प्राथमिक-माध्यमिक शिक्षण तिथेच झाले. त्यानंतर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण त्यांनी मुंबई विद्यापीठात घेतले. आणि १९७९ साली ते शिवाजी विद्यापीठामध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये अध्यापक म्हणून रुजू झाले. राज्यशास्त्र विभागात अध्यापकापासून विभागप्रमुखपदा पर्यंत साऱ्या जबाबदाऱ्या पार पाडत ३१ वर्षाच्या सेवेनंतर सर २०१० साली निवृत्त झाले. शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागासह,नेहरू अभ्यास केंद्र, गांधी अभ्यास केंद्र, वृत्तपत्र विद्या व संवाद शास्त्र विभाग आदी अनेक ठिकाणी त्यांनी मूलभूत व मौलिक स्वरूपाचे काम केले. शिवाजी विद्यापीठाच्या  शैक्षणिक व सामाजिक वाटचालीमध्ये डॉ.अशोक चौसाळकरांचे योगदान  अतिशय महत्त्वाचे राहिलेले आहे. विद्यापीठाचा आणि त्याच्या विविध  विभागांचा नावलौकिक राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर वाढविण्यामध्ये डॉ.अशोक चौसाळकर यांचे योगदान अतिशय महत्त्वाचे राहिलेले आहे. या साऱ्या वाटचालीमध्ये त्यांना त्यांच्या अर्धांगिनी आणि चित्रकार गौरी वहिनी यांची साथ अतिशय मोलाची लाभलेली आहे. या दाम्पत्याचा मुलगा शिशिर उर्फ मनीष  साऊंड डिझाईन इंजिनियर आहे.साऊंड डिझाईन या क्षेत्रामध्ये तो मुंबईमध्ये फार चांगली कामगिरी करतो आहे. अनेक चित्रपटांचे, मालिकांचे काम त्याने केलेले आहे.त्याला झी गौरव पुरस्कारही जाहीर झालेला आहे.आणि कन्या ऋता सिंगापूर मध्ये आहे. तेथील बँकेत अधिकारी म्हणून काम करते आहे.आपापल्या जोडीदारासह ,कुटुंबासह आनंदाने हे सर्वजण  मार्गक्रमण करत आहेत. कोणत्याही विचारवंताच्या एकूण वाटचालीमध्ये त्याच्याकडून जे जीवन गौरवी कार्य होत असते त्यामध्ये त्याच्या कुटुंबीयांचे योगदान अतिशय मोठे असते. डॉ. चौसाळकर यांना असे कुटुंबीयांचे पाठबळ सातत्याने मिळत आहे ही अतिशय आनंदाची गोष्ट आहे. चौसाळकर सरांच्या या अमृत महोत्सवी पदार्पणानिमित्त त्यांना , गौरी वहिनींना, शिशिर उर्फ मनीष आणि ऋता आणि त्यांच्या कुटुंबीयांचेही अभिनंदन करून पुढील वाटचालीसाठी भरभरून शुभेच्छा देतो.


डॉ.अशोक चौसाळकर शिवाजी विद्यापीठामध्ये रुजू झाले त्याच्या आधीची एक - दोन वर्षे ' समाजवादी प्रबोधिनी 'या संस्थात्मक प्रबोधन करणाऱ्या संस्थेच्या उभारणीचे काम सुरू होते. आणीबाणी संपल्यानंतर च्या कालखंडामध्ये कार्यकर्त्यांचे सैद्धांतिक प्रबोधन व्हावे यासाठी आचार्य शांताराम बापू गरुड, शहीद कॉम्रेड गोविंद पानसरे, प्रा. डॉ.एन.डी. पाटील  हे प्रमुख मान्यवर आपल्या सहकाऱ्यांच्या माध्यमातून 'शास्त्रीय समाजवादाचे खुले ज्ञानपीठ ' असलेल्या समाजवादी प्रबोधिनीची उभारणी करत होते. त्या काळामध्ये  राज्यशास्त्र ,अर्थशास्त्र, समाजशास्त्र ,साहित्य आदी विषयांमध्ये  जे व्यासंगी अभ्यासक, प्राध्यापक आहेत, जे सैद्धांतिक दृष्ट्या लेखन व भाषण करू शकतात, कार्यकर्त्यांचे प्रबोधन करू शकतात अशा तरुण अभ्यासकांचा आचार्य शांताराम बापू आणि त्यांचे सहकारी शोध घेत होते. त्यामध्ये राज्यशास्त्र विषयामध्ये डॉ.अशोक चौसाळकर हे एक अतिशय महत्त्वाचे विचारवंत, तरुण अभ्यासक त्यांना मिळाले. म्हणूनच इचलकरंजीमध्ये मुख्य केंद्र असलेल्या समाजवादी प्रबोधिनीचे त्या अर्थाने डॉ. अशोक चौसाळकर हे अगदी स्थापनेपासूनचे महत्त्वाचे अभ्यासक, सहकारी, कार्यकर्ते, लेखक, वक्ते, मार्गदर्शक राहिलेले आहेत. समाजवादी प्रबोधिनीच्या गेल्या ४७  वर्षाच्या वाटचालीत कालवश प्राचार्य ए . ए.पाटील ,प्राचार्य एम. डी.देशपांडे ,आचार्य शांताराम गरुड ,प्रा. डॉ.एन.डी.पाटील, प्रा . डॉ.जे. एफ.पाटील आदी अध्यक्षांच्यानंतर समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष म्हणून प्रा. डॉ.अशोक चौसाळकर कार्यरत आहेत. ही आमच्या सर्वांच्याच दृष्टीने आनंदाची व अभिमानाची बाब आहे. 


डॉ.अशोक चौसाळकर यांचा व माझा परिचय हा मी प्रबोधिनीचा पूर्णवेळ कार्यकर्ता म्हणून काम करण्याचा निर्णय घेतला तेव्हापासूनचा अर्थात गेल्या चाळीस वर्षापासूनचा आहे.समाजवादी प्रबोधिनीच्या 'प्रबोधन प्रकाशन ज्योती' मासिकासाठी गेल्या पस्तीस वर्षात डॉ .अशोक चौसाळकर यांनी अनेक पुस्तिका लिहिल्या. विधानसभा व लोकसभेच्या निवडणुकांच्या विश्लेषणासह जम्मू काश्मीरचा प्रश्न, पंजाबचा प्रश्न, आरक्षणाचा प्रश्न , भारतीय राज्यघटना व भारतीय राज्यकारण अशा विविध विषयांवर सातत्यपूर्ण लेखन केले व आजही करत आहेत. गेली काही वर्षे या मासिकात ते सातत्याने दर महिन्याला जे 'आंतरराष्ट्रीय राजकारण 'सदर लिहितात त्यातून जगाच्या राजकारणाची  अत्यंत सुस्पष्ट अशी मांडणी वाचकांना व अभ्यासकांना उपलब्ध होत असते.' प्रबोधन प्रकाशन ज्योती ' मासिकासह सह समाज प्रबोधन पत्रिका, नवभारत, आजचा सुधारक , परामर्श , श्रीवाणी आदी अनेक नियतकालिकांसह डॉ. चौसाळकर यांनी विविध दैनिकात सातत्यपूर्ण लेखन केलेले आहे. तसेच वैचारिक लेखन करणाऱ्या चौसाळकर सरांनी अनेक कथाही लिहिलेल्या आहेत.


 समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने त्यांनी प्रबोधिनीच्या कार्यक्षेत्रात शब्दशःशेकडो भाषणे दिलीआहेत. राजकारणापासून साहित्यापर्यंत आणि समाजकारणापासून अर्थकारणापर्यंत विविध विषयांवर चौसाळकर सर जी व्याख्याने देत असतात ती अतिशय अभ्यासपूर्ण, सैद्धांतिक ,विश्लेषणात्मक असतातच असतात पण त्याचबरोबर ती अतिशय सोपी, सुबोधही असतात. व्याख्यानाच्या विषयाच्या टीप्पणाचा कागद हातात न घेताही चौसाळकर सर त्या विषयाची सूत्रबद्ध मांडणी करतात. ती मांडणी विषय कितीही अवघड व व्यापक असला तरी अतिशय काव्यमय होत असते. महाराष्ट्रातील व भारतातील विद्यापीठे स्तरावरील अनेक सेमिनार बरोबरच कार्यकर्त्यांच्या अभ्यास वर्गात ,शिबिरात, मेळाव्यात, संमेलनात चौसाळकर सातत्याने मांडणी करत असतात. त्या मांडणीतून महाराष्ट्राच्या प्रबोधन चळवळीतील कार्यकर्त्यांची विचार दृष्टी व कार्य दृष्टी विकसित होण्यास मोठी मदत झालेली आहे. हे त्यांचे वेगळेपण माझ्या दृष्टीने अतिशय महत्त्वाचे आहे.


तर्कनिष्ठ व तर्कपूर्ण मांडणी करणारे डॉ. अशोक चौसाळकर हे काहीसे मितभाशी वाटतात.मात्र त्यांचे एखादे व्याख्यान ऐकल्यानंतर त्यांच्या मांडणीतून त्या विषयाच्या विविध बाजूंचे जे परिपूर्ण आकलन होते ते ऐकणाऱ्याला मोठी वैचारिक सकस मेजवानी देत असते. विचार संपन्न करून जात असते. असा माझा सातत्याचा अनुभव आहे अर्थात तो इतरांनाही नक्कीच येत असेल. डॉ अशोक चौसाळकर शिवाजी विद्यापीठाच्या नेहरू अभ्यास केंद्रामध्ये संचालक म्हणून काम करताना पंधरा वर्षांपूर्वी मला सहा महिन्यांसाठी पाहुणे तज्ञ म्हणून काम करण्याची संधी दिलेली होती. त्यावेळी मी ' मराठी कादंबरीतील नेहरूकालीन सामाजिक राजकीय परिवर्तनाचे चित्रण ' हे पुस्तक लिहिलेले होते. शिवाजी विद्यापीठाच्या वतीने ते प्रकाशितही झाले. या माझ्या कामातील मोठे मार्गदर्शन डॉ. अशोक चौसाळकरांचेच आहे. 'समाज प्रबोधन पत्रिका' या त्रैमासिकाचे संपादक म्हणूनही डॉ. चौसाळकरांचे योगदान अतिशय महत्त्वाचे आहे. 


डॉ. अशोक चौसाळकर हे राज्यशास्त्र विभागात अध्यापनाचे काम करत असतानाच निरनिराळ्या सामाजिक चळवळीत व प्रबोधनाच्या संस्थांमध्ये सुद्धा सातत्यपूर्ण सहभागी होत राहिले आहेत.शिवाजी विद्यापीठाच्या राज्यशास्त्र विभागासह ,गांधी अभ्यास केंद्र ,नेहरू अभ्यास केंद्र व इतर अनेक विभागांमध्ये अनेक महत्त्वाच्या राष्ट्रीय - आंतरराष्ट्रीय परिषदांच्या आयोजनाद्वारे त्यांनी मोठे काम केले आहे त्यातून अनेक महत्त्वाच्या विषयांवरची पुस्तके संपादित झाली. आज आपण भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवही संपन्न केलेला आहे. स्वातंत्र्यानंतरच्या पहिल्या एक, दोन, तीन पिढीच्या ज्या राजकीय प्रेरणा होत्या त्या हळूहळू कमजोर होत गेल्या. त्यानंतर गेल्या काही दशकांमध्ये राजकारण हे केवळ आणि केवळ सत्ताकारण बनत चाललेले आहे. ते आपल्याला स्पष्टपणे दिसतेही. पण अशा संक्रमणाच्या कालखंडात डॉ. चौसाळकर हे  प्राचीन राजकिय विचारापासून वर्तमान राजकारणापर्यंतची जी मूलभूत मांडणी करत आहेत ती अतिशय महत्त्वाची, अतिशय उपयुक्त आणि अतिशय मार्गदर्शक आहे.


आज अनेक मराठी, हिंदी ,इंग्रजी वाहिन्यांवर राजकीय ,आर्थिक, सामाजिक सांस्कृतिक प्रश्नांवरील चर्चा होत असतात. पण काही अपवाद वगळता त्या चर्चा गांभीर्याने पहाव्यात ,ऐकाव्यात असे विचारी माणसाला वाटत नाही.कारण या चर्चांना एक प्रकारचे प्रचारकी कल्लोळी स्वरूप आलेले आहे. म्हणूनच अनेक वाहिन्या सातत्याने बोलवत असूनही चौसाळकर त्याचा भाग होत नाहीत.त्यापेक्षा ते नियतकालिकातील लेखन आणि अभ्यासक व कार्यकर्त्यांसमोरील भाषण याला प्राधान्य देतात. हे फार महत्त्वाचे आहे. कारण विचारांच्या क्षेत्रातील सार्वत्रिक सुमारीकरणाच्या काळात ते विचार पेरण्याचे जे काम करत आहेत ते फार महत्त्वाचे आहे.डॉ. चौसाळकर गेली अनेक वर्षे करत असलेली मांडणी ही केवळ राज्य स्तरावर नव्हे तर राष्ट्रीय -आंतरराष्ट्रीय स्तरावरही अतिशय महत्त्वाची आहे.विचारांचा तो धागा घेऊनच राजकारण,समाजकारण, अर्थकारण ,साहित्य, संस्कृती याकडे बघावे लागेल यात शंका नाही. कारण त्यामध्येच खऱ्या अर्थाने भारतीय विचार परंपरेचे अमृततत्व साठवलेले आहे.


डॉ.अशोक चौसाळकर यांनी मराठी व इंग्रजी मध्ये प्रचंड स्वरूपाचे लेखन ग्रंथरूपाने लेखन केले. त्यांनी मराठीमध्ये १६ व इंग्रजी मध्ये ११ ग्रंथांचे लेखन केले आहे.शहीद भगतसिंग, कॉ.श्रीपाद अमृत डांगे , संस्कृती भाष्यकार डी.डी.कोसंबी, न्यायमूर्ती रानडे ,राजाराम शास्त्री भागवत आदींची त्यांनी लिहिलेली चरित्रे अतिशय महत्त्वाची आहेत. डॉ. चौसाळकर यांनी आपल्या अनेक ग्रंथातून प्राचीन भारतातील कौटिल्यपूर्व राजकीय विचार आणि अर्वाचीन काळातील राजकीय विचार यावर लेखस्वरूपाने अतिशय सखोल लेखन केलेले आहे. 


न्याय आणि धर्म,आधुनिक राजकीय सिद्धांत, मार्क्सवाद उत्तरमार्क्सवाद, भारतीय राष्ट्रवाद आणि सामाजिक अंतर विरोध, महात्मा फुले आणि शेतकरी चळवळ, भारतीय स्वातंत्र्याची चळवळ आणि राज्यघटना महर्षी शिंदे यांचे धर्मविषयक विचार, हिंद स्वराज्य आणि आत्मबळाची प्राप्ती , नवरात्र असे अनेक मराठी ग्रंथ त्यांनी लिहिले. त्याचबरोबर इंडियन आयडिया पॉलिटिकल रेसिस्टन्स, ए कंपरेटिव्ह स्टडी ऑफ कौटिल्य अँड अरिस्टोटल,सोशल अँड पॉलिटिकल इम्प्लिकेशन्स ऑफ कन्सेप्ट जस्टिस अँड धर्म असे अनेक महत्त्वाचे इंग्रजी ग्रंथ ही त्यांनी लिहिले. विचारशालाकाचे संपादक व ज्येष्ठ विचारवंत प्राचार्य डॉ.नागोराव कुंभार यांच्या निवृत्तीनिमित्त प्रकाशित केलेल्या ' विचारवंत आणि समाज 'या ग्रंथासह ' गांधी विचार आणि समकालीन विचारविश्व ' यापर्यंत अनेक ग्रंथांचे महत्त्वपूर्ण संपादन डॉ.अशोक चौसाळकर यांनी केले आहे. अनेक ग्रंथांना त्यांनी प्रस्तावनाही लिहिली आहे. अनेक नवे अभ्यासक, वक्ते व लेखक घडवण्यामध्येही त्यांनी फार मोठे योगदान दिलेले आहे.हे सारेच अतिशय मौलिक स्वरूपाचे काम आहे यात शंका नाही.


गांधी विचार आणि समकालीन विचार विश्व या ग्रंथाच्या प्रस्तावानेत डॉ.चौसाळकर म्हणतात, महात्मा गांधींच्या लढ्याची तीन वैशिष्ट्ये होती (१) हा लढा पूर्ण अहिंसात्मक पद्धतीने लढवला गेला आणि लढ्याचा उद्देश सरकारची अधिमान्यता काढून घेणे हा होता.(२)भारत आणि ब्रिटिशांच्यातील सत्तांतर शांततेच्या मार्गाने झाले व सत्तांतरानंतर इंग्रजांचे व भारतीयांच्या संबंध संवाद पूर्ण राहिले.(३) या चळवळीने जनतेमध्ये आपल्या अधिकाराबाबत जागृती निर्माण केली. आणि त्यातून झालेल्या नव्या वातावरणामुळे भारतात लोकशाही राजवट स्थापन झाली.घटनात्मक शासन यंत्रणा उभी राहिली. पण भारताची परकीय राजवटी पासून मुक्तता करणे हेच महात्मा गांधींचे ध्येय नव्हते. त्यांना समाजात मूलगामी परिवर्तन घडवून आणायचे होते. व्यक्तीला स्वातंत्र्य प्राप्त करून देण्याचे व हिंसा व वैमनस्यमुक्त समाज निर्माण स्थापन करण्याचे त्यांचे स्वप्न होते. त्यासाठी त्यांनी पर्यायी विकासाची विचारसरणी विकसित केली. त्यामुळे त्यांच्या विचारांचा अभ्यास सातत्याने जगातील विविध देशात केला जात आहे. जगापुढे निर्माण झालेल्या गंभीर समस्याना एक मानवतावादी पर्याय गांधी विचारातून प्राप्त होऊ शकतो याची जाणीव आज लोकांना होत आहे.'


'मार्क्सवाद उत्तर मार्क्सवाद 'या ग्रंथाच्या प्रस्तावनेत ते म्हणतात,' मार्क्सवाद आणि उत्तर मार्क्सवाद हा विषय गंतागुंतीचा आहे. पण आपणा सर्वांसाठी तो महत्त्वाचा आहे .कारण मार्क्सने समाजवादी क्रांतीचा सिद्धांत मांडला. या सिद्धांताची मांडणी करत असताना त्याने मानवी स्वातंत्र्याचा व मानवी मुक्तीचा विचार मांडला. माणसाला त्याच्या पूर्ण मनुष्यत्वाचा लाभ व्हावा आणि खऱ्या अर्थाने त्यांने आपल्या स्वातंत्र्याचा विकास करावा अशी त्याची भूमिका होती. अधिकाराच्या उदारमतवादी आणि आदर्शवादी व्याख्या अपुऱ्या आहेत.आणि शोषण व शासनमुक्त साम्यवादी समाजातच माणसास खऱ्या अर्थाने अधिकारांचा लाभ होईल आणि मनुष्यत्वाचा लाभ होईल असे मार्क्सन प्रतिपादन केले होते. पश्चिम युरोपात आणि अमेरिकेत १९६० नंतर विविध नवमार्क्सवादी  विचार मांडण्यात आले. नव मार्क्सवाद्यांचा प्रयत्न परात्मभावाची कल्पना मांडणारा सुरुवातीचा मार्क्स केंद्रस्थानी आणण्याचा होता. साम्राज्यशाहीस विरोध करणारी लेनिनवादी परंपरा त्यांना अमान्य नव्हती, पण सोवियत व्यवस्थेतील नोकरशाही समाजवाद त्यांना मान्य नव्हता.'


विचारवंत आणि समाज ' या डॉ. चौसाळकर यांनी  संपादित केलेल्या ग्रंथाच्या प्रस्तावना ते म्हणतात, ' विचारवंत हा शब्द व्यापक आहे. आधुनिक महाराष्ट्र घडवण्यात अनेक विचारवंतांनी ,प्रबोधकांनी महत्त्वाची भूमिका पार पडली. विचारवंतांनी समाज प्रबोधनाचे समाज परिवर्तनाचे व समाजाला योग्य दिशा देण्याचे कार्य केले. पण आज विचारवंतांची संख्या कमी आहे. खऱ्या विचारवंतांना ऐवजी स्वयंघोषित विचारवंतांची संख्या मोठी आहे .म्हणून समाज विचारवंतांबरोबरच समाज अभ्यासकांची भूमिकाही आज महत्त्वपूर्ण आहे.१९९०  नंतरच्या बदलत्या सामाजिक, आर्थिक व राजकीय परिस्थितीत विचारवंत (अभ्यासक )व समाज यांच्यामध्ये अंतर पडले आहे. समाज वास्तवापासून विचारवंत (अभ्यासक) तुटले आहेत. काही अपवाद वगळता आणि समाज- शासन -राज्यकर्ते हे विचारवंत (अभ्यासक) यांना विचारात घेत नाहीत. असा दोन्ही बाजूंनी आज पेच निर्माण झाला आहे.गुंतागुंतीचे प्रश्न निर्माण झाले असताना आणि अस्मिता वादातून प्रचंड अस्वस्थता वाढत असताना समाजाला योग्य दिशा देण्यासाठी कोणी पुढे येत नाही. उलट विचार संपले असे म्हणणारे पुढे येत आहेत .अशा परिस्थितीत महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात विचारवंत व अभ्यासकांचा हस्तक्षेप वाढला पाहिजे.'


डॉ. चौसाळकर यांचे सर्वच लेखन व मांडणी ही नेहमीच विचारप्रवृत्त करणारी ठरते. भारतीय राष्ट्रवादात बाबत एके ठिकाणी ते म्हणतात,' भारतीय राष्ट्रवाद हा बहुसंस्कृतिक समाजाचा निर्माण साधलेला विचार होता. ज्याच्या प्रेरणा एकजिनसी समाजात निर्माण झालेल्या राष्ट्रवादातून वर्तवल्या होत्या. या राष्ट्रवादाचा तीन टप्प्यात विकास झाला. पहिल्या टप्प्यात हिंदू संस्कृतीक परंपरांच्या संदर्भात त्याची मांडणी झाली. तर दुसऱ्या टप्प्यात ब्रिटिश साम्राज्यवादाविरुद्ध प्रखर संघर्ष धडाक्यात झाला.तिसरा टप्पा विविध संस्थांची उभारणी करून राष्ट्रबांधणी करण्याची होती. राष्ट्रवादाच्या विकासाची ही प्रक्रिया सुरू असतानाच भारतीय समाजात धर्म, भाषा आणि जात या आधारावर सर्व सामाजिक आंतरविरोध उभे राहिले. प्रत्यक्ष प्रश्न सामाजिक न्यायाचा व समाजातील सर्व घटकांत सत्तेचे योग्य वाटप करण्याचा होता. मुस्लिम, आदिवासी, दलित आणि मागास जाती यांच्या अधिकारांना सामावून घेणे महत्त्वाचे होते.त्यातूनच देशाची फाळणी झाली. फाळणी हे भारतीय राष्ट्रवादाचे अपयश होते.'


'भारतीय राष्ट्रवाद आणि मुस्लिम 'यासंदर्भात ते म्हणतात, भारतीय राष्ट्रवाद हा सामायिक राष्ट्रवाद आहे. आणि या राष्ट्रवादाच्या वाढीमध्ये मुस्लिम समाजाने संस्कृतीने मोठे योगदान केलेले आहे. भारतीय राज्यघटनेने कलम २५-३० मध्ये अल्पसंख्याकांच्या धार्मिक आणि संस्कृतिक अधिकारांचा समावेश केलेला आहे.पण घटनेतील अधिकार जर प्रत्यक्षात अमलात आणले जात नसतील तर त्याबाबत प्रश्न निर्माण होतील.भारताच्या सामाजिक, आर्थिक आणि राजकीय विकासात अल्पसंख्यांकांना विशेषतः मुस्लिमांना योग्य असा वाटा मिळाला पाहिजे. सरकारी नोकऱ्या, खाजगी क्षेत्र आणि इतर संस्थांच्या मध्ये मुस्लिमांना योग्य प्रतिनिधित्व मिळालेलं नाही. भारतीय जनता पक्षाच्या लोकसभेतील २८२ खासदारांमध्ये एकही मुस्लिम खासदार नाही. उत्तर प्रदेश विधानसभेच्या ३२५ भाजप आमदारांपैकी एकही मुसलमान नाही. कारण भाजपने एकाही मुसलमानाला उमेदवाराला तिकीट दिले नाही. भाजप आणि हिंदुत्ववादी तीन प्रकारे मुस्लिमाना लक्ष करताना आपल्याला दिसतात. (१) राजकीय सत्तेच्या सर्वच विभागातून मुस्लिमाना कमीत कमी प्रतिनिधित्व देणे (२)गोहत्याबंदी करून त्यांची खाद्यसंस्कृती बदलणे आणि गोरक्षकांचे हिंसक कळप तयार करून निरपराध मुस्लिम कसायांना व पशुविक्रेत्यांना मारहाण करणे, हिंसाचार करणे(३)  वेळीअवेळी रामजन्मभूमीचा मुद्दा पुढे करून सातत्याने मुस्लिमांच्या विरुद्ध प्रचार करून त्यांच्यामध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण करणे. या सर्व प्रकारामुळे मुस्लिमांच्या मध्ये देशस्तरावरचे नवे राजकीय नेतृत्व निर्माण होत नाही.स्वातंत्र्यानंतरच्या काळात काँग्रेस, समाजवादी व कम्युनिस्ट यांच्यामध्ये अशा गुणवत्तेचे नेते होते. पण आता असे नेते राहिलेले नाहीत. ही गंभीर बाब आहे.भारतातील शीख, ख्रिश्चन, पारशी, जैन या अल्पसंख्यांक समाजापुढे हे प्रश्न नाहीत. भारतीय राष्ट्रवादामध्ये मुस्लिम समाजाच्या आशा आकांक्षांचाही समावेश होणे गरजेचे आहे.नाहीतर आंतरविरोध जास्त तीव्र होतील. कदाचित हिंसक रूपही  धारण करील .'


अशा पद्धतीने डॉ. चौसाळकरांचे सर्वच सैद्धांतिक लेखन अतिशय महत्त्वपूर्ण आणि विचार प्रवृत्त करणारे आहे.'डॉ.अशोक चौसाळकर यांनी आपल्या विविध पुस्तकातून छत्रपती शिवाजी आणि आधुनिक महाराष्ट्र, इतिहासाचार्य राजवाडे यांचे जातीसंस्था विषयक विचार, डॉ.आंबेडकरांचा सामाजिक प्रतिकाराचा सिद्धांत ,आचार्य जावडेकर - महात्मा गांधी आणि भगवद्गीता, पंडित नेहरू यांचा समाजवाद : ऐतिहासिक अन्वयार्थ ,पंडित नेहरू आणि भारतातील जमातवाद व राष्ट्रवाद, राजकीय हिंसा ,जागतिकीकरण आणि राज्यसंस्था, लोकशाहीचे काही नवे सिद्धांत, समुदायवाद ,बहुसंस्कृतीवाद, ग्रामसीचे राजकीय विचार, गीतारहस्यातील राजकीय तत्वज्ञान, मार्क्स-मानवी स्वातंत्र्य आणि अधिकार, नवमार्क्सवाद, चीन आणि रशियातील तात्विक संघर्ष, मार्क्स आणि भारतातील लोकशाही समाजवाद, नव वसाहतवादाची चिकित्सा अशा अनेक विषयांवरचे लिहिलेले लेख हे फार मोठे वैचारिक धन आहे.


'समकालीन समाजात विचारवंताची भूमिका' या लेखामध्ये डॉ.अशोक चौसाळकर म्हणतात,'सर्व संघटित समाजाला विचारवंतांची गरज असते. कारण विचारवंत त्यांना त्यांच्या जगण्याचे प्रयोजन सांगत असतात.समाजाने कोणत्या दिशेने जावे हे सांगत असतात. भारतीय तत्त्वज्ञानामध्ये 'लोकसंग्रह 'हा शब्द वापरला आहे .त्याचा अर्थ शंकराचार्यांनी सांगितला आहे. त्यांच्या मते लोकसंग्रह म्हणजे असंघटित व पथभ्रष्ट झालेल्या लोकांना एकत्र करणे आणि त्यांना प्रगतीच्या दिशेने अग्रेसर करणे होय. हे काम राजकीय लोकाग्रणींचे आहे. पण या कामात उपकारक अशी कृती विचारवंत करत असतात. ते हे सांगतात की, लोकसंग्रह म्हणजे अडाणी व संघटित लोकांना त्यांच्या भावना उद्दिप्त करून त्यांचा जमाव बांधणे नव्हे .तर समाजाला चांगल्या कामासाठी एकत्र आणून त्याला योग्य दिशेने काम करायला समजावून सांगणे होय. जुन्या काळात हे काम धर्मगुरू कवी व लेखक करत असतात. विचारवंत एखादी विशिष्ट कृती समाजाने का करावी हे सांगत असतात .त्या मागची कारण परंपरा सांगत असतात. त्याचा समाजास काय फायदा होणार आहे हे सांगत असतात.व ती कृती केली नाही तर समाजाचे काय नुकसान होते हेही सांगत असतात '


हे स्पष्ट करून डॉ.अशोक चौसाळकर म्हणतात,आज मुख्यतः पाच प्रश्नांच्या बाबतीत भारतीय विचारवंतांना महत्त्वाची भूमिका बजावायची आहे ते म्हणजे (१)भारतात आधुनिक लोकशाहीवादी व धर्मनिरपेक्ष समाज स्थापन करणे (२) सामाजिक न्याय आणि सामाजिक समता याबाबत भूमिका घेणे (३)धार्मिक असहिष्णुता व हिंसा यांचा समाजात  होणारा वाढता वावर रोखणे (४) सामाजिक दुरावा व व्यक्ती व्यक्तीमध्ये निर्माण झालेला वाढता परात्म भाव दूर करणे .(५) कला, विज्ञान व तत्वज्ञान यांचे खरे स्वरूप समजावून घेऊन त्यांचा समाज स्वास्थ्यासाठी व ऐकण्यासाठी वापर करणे. विचारवंत पुस्तके व वर्तमानपत्रात लेख लिहून, चर्चासत्रात भाग घेऊन, सभात व शिबिरात भाषणे देऊन लोकांची मने घडवत असतो. त्यांच्या विचारांना वळण देण्याचे काम करतो .समाजात आतून बदल घडवण्यात त्यांची भूमिका मोलाची असते.समाजास समजावून सांगण्याची, मन वळवण्याची त्यांची पद्धत असते. मात्र ही भूमिका बजावत असताना त्याने कोणत्याही प्रकारच्या हित अहिताचा विचार न करता निर्भीडपणे आपले मत मांडावे अशी त्यांच्याकडून अपेक्षा असते .तो संवेदनशील असला पाहिजे. त्याने राज्यकर्त्यांना खडे बोल सुनावले पाहिजेत व त्यासाठी पडेल ती किंमत मोजली पाहिजे.'डॉ. चौसाळकर लेखनातून ही जी भूमिका मांडतात तीच भूमिका ते गेल्या चार दशकाहून अधिक काळ कृतीतूनसुद्धा बजावत आहेत हे फार महत्त्वाचे आहे. म्हणूनच डॉ. चौसाळकर अमृत महोत्सवी पदार्पण करत असताना त्यांनी गेल्या ४० वर्षांमध्ये त्यांनी एक विचारवंत ,प्रबोधनकार म्हणून जे काम केलेले आहे त्याचे महत्त्व महाराष्ट्राच्या राजकीय, सामाजिक ,सांस्कृतिक प्रबोधनचळवळीत फार मोठे आहे. प्रबोधन चळवळीशी नाळ असलेला एक नामवंत विचारवंत राज्यशास्त्रज्ञ म्हणून त्यांचा गौरवाने उल्लेख करावा लागेल.


डॉ.अशोक चौसाळकर यांना त्यांच्या महत्त्वपूर्ण कार्याबद्दल महाराष्ट्र शासन ,महाराष्ट्र फाउंडेशन यांच्या पुरस्कारासह  नरहर कुरुंदकर साहित्य पुरस्कार, महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा पुरस्कार, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे पुरस्कार, अखिल भारतीय राज्यशास्त्र परिषदेचा जीवनगौरव पुरस्कार, डॉ. यशवंत सुमंत जीवन गौरव पुरस्कार असे अनेक पुरस्कार प्राप्त झालेले आहेत. अमृत महोत्सवी वर्षांमध्ये पदार्पण करत असताना चौसाळकर सर आजही तितक्याच तळमळीने लोकप्रबोधनाचे व जनजागरणाचे काम करत असतात हे फार महत्त्वाचे आहे .हे त्यांचे कार्य अखंड सुरू राहो हीच या निमित्ताने माझ्या आणि संपूर्ण समाजवादी प्रबोधिनी परिवाराच्या वतीने मनःपूर्वक शुभेच्छा....!


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post