जागतिक महिला दिन आणि सावित्रीबाई स्मृतीदिन

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

Prasad.kulkarni65@gmail.com

८ मार्च हा दिवस दरवर्षी ‘जागतिक महिला दिन’ म्हणून साजरा केला जातो .तर १० मार्च  हा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा स्मृतिदिन असतो. जागतिक महिला दिनाचा आशय आणि ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जीवन संदेश जाणून घेऊन, त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे.कारण भवताल अतिशय अस्वस्थ आहे. निर्भया  ते हिंगणघाट , पदकविजेत्या महिला कुस्तीपटू ते मणिपूर हा अमानुषतेचा, क्रूरतेचा प्रवास अजून सुरूच आहे.हे सारं अतिशय अस्वस्थ करणार आहे. समतेची तुतारी वाजवण्यापेक्षा समरसतावादाची पिपाणी जोराचा आवाज काढताना दिसत आहे.अर्थात यात प्रामुख्याने दोष आपलाच आहे .कारण आपण महिला दिनाचा संदेश आणि ज्ञानज्योतींचा विचार अंगीकारण्यात कमी पडलो आहोत. काही महिन्यापूर्वी बहुतांश सर्व पक्षांनी पाठिंबा देत' नारी शक्ती वंदन 'या नावाने महिला आरक्षणाचे विधेयक संमत केले. गेली ३५ वर्षे लोकसभेत राज्यसभेत या विधेयकाची चर्चा होत राहिलेली आहे.मात्र यावेळी ते मंजूर झाले ही स्वागतार्ह बाब आहे. फक्त ते आगामी जनगणना ,त्यानंतर होणारी मतदारसंघाची पुनर्रचना आणि त्यानंतर याचा अवलंब होणार आहे. पण विधेयक मांडणाऱ्या व त्याला पाठिंबा देणाऱ्या राजकीय पक्षांनी आगामी निवडणुकात आपण लढणार असलेल्या जागांपैकी किमान ३३ टक्के जागांवर महिलांना उमेदवारी द्यायला काय हरकत आहे.


अमेरिकेत वस्त्रोद्योग क्षेत्रात काम करणाऱ्या महिलांनी आपल्यावर होणाऱ्या अन्यायाविरोधात व शोषणाविरोधात संघटितपणे आवाज उठवला .शोषकांचा निषेध करत आपला आवाज बुलंद केला. घरामध्ये , कारखान्यांमध्ये ,गिरण्यांमध्ये सोशिक पणे काम करणाऱ्या स्त्रिया सहनशीलतेचा अंत पाहणाऱ्या व्यवस्थेविरुद्ध आवाज देत रस्त्यावर उतरल्या. त्यांनी आपल्यावरील अन्यायाला जाहीर वाचा फोडली.आपल्यावरील अन्यायाचा प्रतिकार आपणच करायला हवा या निश्चयाने त्यांनी लढा उभारला .परिणामी स्त्रीयांच्यात प्रचंड आत्मसन्मान व आत्मविश्वास जागृत झाला. पुरुष केंद्री व्यवस्थेमध्ये शतकानुशतके कोंडीत सापडलेल्या स्त्रियांनी आत्मविश्वासाने मोकळा श्वास घेतला .स्त्रियांतील सुप्तशक्ती जागी झाली आणि त्यातून जगभरातील स्त्रियांना एक नवी प्रेरणा मिळाली. या संघटित शक्तीचा विजय नारा देणारा दिवस होता ८ मार्च १९१०. तेव्हापासून गेली एकशे ११४ वर्षे हा दिवस जागतिक महिला दिन म्हणून साजरा केला जातो.


भारताच्या संदर्भात विचार करता स्त्री-पुरुष समता हा नव्या शतकातील नव्या समाजरचनेच्या निर्मितीतील एक महत्त्वाचा प्रश्न आहे .शोषणाविरुद्ध निर्भीडपणे दाद मागण्याची स्त्रियांची मानसिकता तयार होईल अशी परिस्थिती तयार करणे महत्त्वाचे आहे. स्मृती ,पुराणे, रामायण ,महाभारत ,मनुस्मृती,निर्णयसिंधु ,धर्मसिंधु ,गुरुचरित्र ,भरतमुनींचे नाट्यशास्त्र यासारख्या अनेक ग्रंथात स्त्री-पुरुष विषमतेचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष समर्थन दिसून येते. परिणामी आमचा स्त्रीविषयक दृष्टिकोनच संकुचित बनत राहिला. ज्या भारतामध्ये एकेकाळी आदर्श मातृसत्ताक पद्धती होती त्याच भारतात हजारो वर्षे स्त्रीला पुरुषी अहंकाराखाली दडपण्याचे काम झाले. जोपर्यंत उत्पादन साधने आणि त्यावरील मालकी स्त्रियांकडे होती तोपर्यंत कुटुंबावर पर्यायाने समाजावर स्त्रियांचे वर्चस्व होते .नंतर बदलत्या परिस्थितीत विविध कारणांनी स्त्रियांकडून उत्पादन साधनांची मालकी काढून घेण्यात आली .आणि तिला दुय्यम स्थानावर ढकलण्यात पुरुषप्रधान मानसिकता यशस्वी झाली.परिणामी सर्व सत्ता पुरुषांच्या हाती एकवटली. या सर्व पार्श्वभूमीवर गेल्या दीड-दोन शतकांमध्ये स्त्रीमुक्तीचा विचार मांडला जाऊ लागला .महात्मा ज्योतिबा फुले यांनी स्त्री-पुरुष समतेचा विचार स्पष्टपणे ठाम वैचारिक भूमिका घेऊन सर्वप्रथम मांडला. त्यानंतर त्याबाबत लोकहितवादी ,आगरकर कर्वे ,ईश्वरचंद्र विद्यासागर ,महात्मा गांधी, डॉ.आंबेडकर आदी अनेकांचे मोठे योगदान राहिले आहे. डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटनेत स्त्री -पुरुष समतेची जाहीर नोंद करून ऐतिहासिक कामगिरी केली.घटनेतील अनेक कलमांत ही समता स्पष्ट दिसते.


भारतीय स्वातंत्र्य आंदोलनासह अनेक चळवळीत स्त्रियांचे योगदान फार मोठे आहे. आजच्या राजकारणाने बदनामी ,हिंसाचार, गुंडगिरी ,पैसा ,जातिवाद ,दहशतवाद, यासारख्या अनेक शत्रूंशी नाते जोडलेले आहे. राजकारण आणि गुन्हेगारी यांचे साटेलोटे वाढते आहे .या पार्श्वभूमीवर स्त्रियांचा राजकारणातील गुणात्मक सहभाग वाढणे गरजेचे आहे.जागतिक महिला दिनाचा तो अन्वयार्थ आपण ध्यानात घेतला पाहिजे.ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३२रोजी झाला .आणि १० मार्च १८९७ रोजी त्या कालवश झाल्या. त्यांचा १२७ वा स्मृतिदिन आहे.


सातारा जिल्ह्यातील शिरवळ जवळचे नायगाव हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील खंडोजी नवसे हे नायगावचे इनामदार होते.सावित्रीबाई नऊ वर्षाच्या असताना तेरा वर्षाच्या जोतिबांशी त्यांचे लग्न झाले . फुले दाम्पत्याने आपल्या कार्यातून पुढच्या अनेक पिढ्यांना, शतकांचा प्रेरणादायी ठरेल असे काम केले .महात्मा फुले यांचे कार्य व्यापक स्वरूपाचे आहे .या कार्यामध्ये त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या सावित्रीबाईंचे स्थानही फार महत्त्वाचे आहे. दीडशे वर्षापूर्वी स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारे हे दांपत्य या चळवळीचे आद्य प्रणेते आहे. स्त्रियांना आर्थिक ,सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. सावित्रीबाईंचे जीवन म्हणजे विचार व कृती यांचा सुरेख संगम आहे.महात्मा फुले यांच्या मावसभगिनी सगुणाबाई क्षीरसागर यांचा फुले दाम्पत्याला घडवण्यात मोठा वाटा होता .त्यांनी ज्योतिबांना स्वतःसह सावित्रीबाईनाही शिकवायला प्रवृत्त केले .ज्योतिरावांनी महारवाड्यात स्थापलेल्या शाळेत सगुणाबाई शिक्षिका झाल्या .तर सावित्रीबाई भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेत शिकवू  लागल्या. सर्व प्रकारच्या निंदानालस्तीला ,अपमानाला तोंड देत सावित्रीबाईनी  मोठ्या धीराने जिद्दीने काम केले .सावित्रीबाईंनी अनुभवाच्या आधारे शिक्षणविषयक  काही मूलभूत बाबी मांडल्या. त्यांनी ट्रेनिंग स्कूल काढले .


जोतिबांच्या सहाय्याने २८ जानेवारी १८५३ रोजी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच केंद्र होते.या गुहाची जाहिरातच अतिशय नेमकी होती. त्यात म्हटले होते ‘कोणा विधवेचे अजाणतेपणे वाकडे पाऊल पडून ती गरोदर राहिली असेल ,तर तिने या गृहात जाऊन गुपचूपपणे बाळंत होऊन जावे ‘.त्या काळात अशी जाहिरात करण्याचे व काम करण्याचे धाडस केवळ सावित्रीबाई दाखवू शकल्या हे वास्तव आहे.

सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले ‘आणि ‘सुबोध रत्नाकर’ हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितेतून त्यानी ऐक्याचा पुरस्कार केला .तर बेकीचा,विषमतेचा धिक्कार केला.  ‘उच्चवर्णीयांनी वेदांच्या साक्षीने स्त्रिया व शूद्रांचे माणूसपण नाकारले त्या मगरूरीचे हरण करण्यासाठीच बुद्ध जन्माला आले ‘असे त्यांनी कवितेतून म्हटले आहे.सावित्रीबाईनी गरोदर विधवेचा मुलगा दत्तक घेतला .त्या यशवंताचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले .विचाराप्रमाणे आचार ठेवण्याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. आज समताधिष्ठित समाज रचनेचे ध्येय गाठायचे असेल तर सावित्रीबाईंच्या विचारांची दखल घ्यावीच लागेल. महात्मा फुले यांच्यानंतर सावित्रीबाईनी सात वर्षे सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले. नातेवाईकांचा विरोध पत्करून जोतीबांच्या निधनानंतर त्यांचे उत्तर कार्य त्यांनी स्वतः केले. १८९७ साली पुणे शहरात प्लेगची साथ पसरली होती .पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला दवाखान्यात नेत असतानाच प्लेगने सावित्रीबाईंचा बळी घेतला. सेवा, त्याग, धाडस ,सहनशीलता या सद्गुणांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून सावित्रीबाईकडे पहावे लागेल. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंना मुलींना शिकवण्यासाठी दगड -धोंडे ,शेण -माती झेलावी  लागली त्याच पुण्यातील विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे अभिमानाने नाव द्यावे लागले यातच सारे काही आले .’जागतिक महिला दिन’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले  स्मृतिदिन’ संघर्षातूनच समता प्रस्थापित करता येते अशी प्रेरणा देणारा आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post