प्रेस मीडिया लाईव्ह :
इचलकरंजी ता.१ समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांना सामाजिक कार्यासाठी' थोर स्वातंत्र्य सैनिक दौलतराव निकम जीवन गौरव पुरस्कार 'जाहीर झाला आहे. स्वातंत्र्य सैनिक दौलतराव निकम हे ज्येष्ठ गांधीवादी नेते होते.सहकारापासून शिक्षण क्षेत्रापर्यंत त्यांनी समाज जीवनाच्या विविध क्षेत्रात भरीव स्वरूपाची कामगिरी केली होती. कागल तालुक्याचे आमदार म्हणूनही त्यांनी काम केले होते. साधी रहाणी व उच्च विचारसरणी असलेल्या दौलतरावर निकम यांच्या नावाचा जाहीर झालेला हा जीवनगौरव पुरस्कार अतिशय प्रेरणादायी व वाढत्या जबाबदारीची जाणीव करून देणार आहे असे मत प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले.
व्हन्नुर येथे पुरस्कार निवड समितीच्या बैठकीत हा पुरस्कार जाहीर करण्यात आला. पुरस्कार निवड समितीच्या बैठकीस संस्थाध्यक्ष सुनंदा निकम, सचिव यशवंतराव निकम ,मुख्याध्यापक विलास पवार आणि सर्व संचालक उपस्थित होते.शुक्रवार ता. ८ मार्च २०२४ रोजी सकाळी १० वाजता दौलतराव निकम माध्यमिक विद्यालय, व्हन्नुर येथे हा समारंभ होणार आहे .वैद्यकीय शिक्षण मंत्री व कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री ना. हसन मुश्रीफ यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे.सामाजिक कार्याबरोबरच क्रीडा, उद्योग, शैक्षणिक, शेती इत्यादी क्षेत्रातील आनंदराव पाटील (समन्यायी पाणी हक्क परिषद) रजनीताई मगदूम (कौन्सिल ऑफ एज्युकेशन सोसायटी अध्यक्ष), राम सारंग (राष्ट्रकुल पारितोषिक विजेते) बी.जी.कोरे (सेवानिवृत्त मुख्याध्यापक )नारायणराव जाधव व गणपतराव जाधव (यशस्वी उद्योजक) या सहा मान्यवरांनाही हा जीवनगौरव पुरस्कार प्रदान केला जाणार आहे.
प्रसाद कुलकर्णी हे समाजवादी प्रबोधिनीचे गेली ३९ वर्षे पूर्णवेळ कार्यकर्ते म्हणून काम करत आहेत. सामाजिक कार्यकर्ता,लेखक, संपादक ,कवी, गझलकार ,वक्ता ,मुलाखतकार, स्तंभ लेखक,वृत्तपत्र पत्रलेखक, ब्लॉगर , यू ट्यूबर , विविध उपक्रमांचा संयोजक अशा विविध अंगाने त्यांचा महाराष्ट्र व महाराष्ट्राबाहेरही सर्वदूर परिचय आहे. यापूर्वी त्यांना भाई माधवराव बागल पुरस्कार , महात्मा गांधी सद्भावना पुरस्कार,कैफी आझमी पुरस्कार, राष्ट्रवीरकार शामराव देसाई साहित्य पुरस्कार, कृष्णा साहित्य गौरव पुरस्कार , दीनबंधु दिनकरराव यादव जीवनगौरव पुरस्कार,कवयित्री शैला सायनाकर पुरस्कार, समाज भूषण पुरस्कार असे तीसहून अधिक पुरस्कार प्राप्त झाले आहेत.