विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्याकडून जनसामान्यांच्या तक्रारींचा निपटारा

 आकुर्डीत जनाधिकार जनता दरबारात शेकडो नागरिकांची उपस्थिती


प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी : विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचा राज्यव्यापी जनाधिकार जनता दरबार कार्यक्रम सोमवारी पिंपरी चिंचवडमध्ये आकुर्डी,  खंडोबा मंदीर सभामंडप येथे पार पडला. या कार्यक्रमात शेकडो नागरिकांनी उपस्थित राहून विविध तक्रारी मांडल्या. त्या संदर्भात तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना संपर्क साधून जनसामान्यांच्या या तक्रारींचा निपटारा केला.

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने आयोजित या जनाधिकार जनता दरबार कार्यक्रमात शेतकरी, शेतमजूर, नोकरदार, माथाडी कामगार, व्यापारी, व्यावसायिक, विद्यार्थी, निराधार व दिव्यांग नागरिकांनी उपस्थित राहून आपल्या निवेदनाव्दारे आणि प्रत्यक्ष अशा प्रकारे दोनशेपेक्षा अधिक तक्रारी अंबादास दानवे यांच्या समक्ष उपस्थित केल्या.

यावेळी पुणे जिल्हा संपर्कप्रमुख, आमदार सचिन आहेर, मावळ संघटक संजोग वाघेरे पाटील, माजी आमदार ॲड. गौतम चाबुकस्वार, पिंपरी चिंचवड मावळ संपर्क प्रमुख लतिका पाष्टे, पिंपरी चिंचवड शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष शहर प्रमुख ॲड. सचिन भोसले, ज्येष्ठ नेते एकनाथ पवार, जिल्हा संघटिका सुलभा उबाळे, अनिताताई तुतारे, शहर युवा अधिकारी चेतन पवार, उपजिल्हाप्रमुख वैशाली मराठे तसेच निलेश मुटके, धनंजय आल्हाट, तुषार नवले, अनंत कोऱ्हाळे, रोमी संधू, हाजी मणियार दस्तगीर, डॉ. वैशाली कुलथे, कल्पना शेटे, तुषार नवले, मिनल यादव आदींसह पक्षाचे उपशहरप्रमुख, संघटक, उपसंघटक, सर्व प्रमुख पदाधिकारी आणि शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी शासन आपल्या दारी या कार्यक्रमाचा समाचार घेतला. अंबादास दानवे म्हणाले की, "राज्यातील घटनाबाह्य महायुती सरकार शासन आपल्या दारी कार्यक्रमातून लाभार्थ्यांना विविध शासकीय योजनांचा लाभ देण्यात येत असल्याचा गाजावाजा करत आहे. प्रत्यक्षात या माध्यमातून महायुतीचे सरकार मोठ्या प्रमाणावर जाहिरातबाजी करून मार्केटिंग करण्यात व्यस्त आहे. नागरिकांच्या तिजोरीतून मोठ्या प्रमाणात खर्च केला जातो. शासन आपल्या दारी म्हणतात, पण ते कुठे जातात, हे काही समजत नाही. जनतेच्या प्रश्नांच्या विषयाकडे दुर्लक्ष केले जाते".

  या जनता दरबारात नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्यानंतर विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त शेखर सिंह यांची भेट घेतली. त्यांच्या समवेत बैठक घेत विविध विषयावर चर्चा करत महापालिकेच्या विविध विभागांशी संबंधित नागरिकांच्या तक्रारींचे निराकरण करण्याचे निर्देश त्यांनी दिले.

Post a Comment

Previous Post Next Post