नितेश राणेच्या बेताल बडबडीला सागर बंगल्यातील बाॅसचा आशीर्वाद .... हेच महाराष्ट्राचं भविष्य आहे का ? - संजय मोरे शहरप्रमुख शिवसेना पुणे .
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : ड्रग्ज प्रकरणात शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने पत्रकार भवन पुणे येथे पत्रकार परिषद घेण्यात आली यावेळी शहरप्रमुख शिवसेना पुणे संजय मोरे, गजानन थरकुडे, प्रसिद्धी प्रमुख अनंत घरत, मकरंद पेठकर उपस्थित होते .
याप्रकरणी संजय मोरे आणि अनंत घरत यांनी महाराष्ट्र शासनाचे मुख्य सचिव यांस पत्र लिहून महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पुणे प्रादेशिक अधिकारी यांचे तत्पर निलंबन करावे अशी मागणी केली .
पुणे हे खरंतर शिक्षणाचे माहेरघर पण आता ते एमडी ड्रग्जचे आंतरराष्ट्रीय हब तयार झाले आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवरील विद्यार्थी पुण्यात शिक्षण घेत आहेत त्यांना डोळ्यासमोर ठेवून पुण्यात ड्रग्जची निर्मिती होत आहे का ? असे वाटू लागले आहे. त्या विद्यार्थ्यांसोबत महाराष्ट्र राज्यातील विद्यार्थी ड्रग्जच्या विळख्यात अडकू लागले आहेत. ललित पाटील प्रकरण अजूनही ताजे असताना पुणे शहरात 1850 किलो एमडी ड्रग्स आणि पुण्यामधून देशाची राजधानी दिल्ली येथे पाठवलेले 970 किलो ड्रग्ज सापडले आहे. आणखीन किती राज्यांमध्ये पुण्यात तयार झालेले ड्रग्स पाठवले आहे हे लवकरच कळेल. आता पकडलेल्या ड्रग्जची किंमत जवळपास 4 हजार कोटीपेक्षा जास्त आहे. ही भारतातील सर्वात मोठी कारवाई आहे हीच का मोदी साहेबांची गॅरंटी ? खरंतर पुणे पोलीस आयुक्तांचं आणि पोलीस बांधवांचं या कामगिरीबाबत अभिनंदन !!.. परंतु यामध्ये प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होणे आवश्यक वाटते. या सर्व प्रकरणांमध्ये पालकमंत्री म्हणून अजित दादांचा वचक राहिलेला नाही असं प्रकर्षाने जाणवत आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्र राज्याला पर्यावरण मंत्री आहे की नाही हे शोधावं लागेल. कारखान्यांमध्ये काय उत्पादन होत आहे आणि या कारखान्यां मधील रासायनिक सांडपाणी नदीमध्ये आणि धरणांमध्ये सोडले जाते, त्यामुळे नदी प्रदूषण रोजच वाढत आहे. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे नाव बदलून महाराष्ट्र ड्रग वितरण मंडळ करावे असे म्हणावे लागेल. पालकमंत्री अजितदादा पुण्यात आल्यानंतर त्यांना भेटून नाहीतर गाडी अडवून याबाबत शिवसेनेच्या वतीने आम्ही नक्कीच विचारणा करणार आहोत.
ड्रग्ज विक्रीसाठी पुणे शहरातील सर्वात मोठे आणि सहजतेने उपलब्ध असलेले ठिकाण म्हणजे पुण्यातील वाढलेले पब व हुक्का पार्लर. तसेच इतर राज्यातील विद्यार्थी आणि आयटी नोकरदार हे ड्रग्ज रॅकेट वाल्यांचे मुख्य गिऱ्हाईक आहेत. पब मध्ये व हुक्का पार्लरमध्ये ड्रग्जचे वितरण सहजतेने होत असल्यामुळे पब मालकांना सहआरोपी करून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा अशी मागणी आम्ही या ठिकाणी करीत आहोत.
राज्य शासनाच्या नाकर्तेपणामुळे महाराष्ट्र राज्यातले रोजगार पर राज्यात गेले आणि तरुणांच्या हातात अमली पदार्थ सहजपणे येऊ लागले. तरुणांसाठी हाच रोजगार आता उपलब्ध आहे का ? तसेच पुणे शहरांमध्ये रोज 50 कोटींचा गुटखा विकला जातो यावर दोन वेळा आवाज उठवून झाला, परंतु यावर ना सरकारचा अंकुश, ना पालकमंत्र्यांचा, ना पोलिसांचा त्यामुळे पुणे हे नशेडी शहर म्हणून ओळखले जाईल का याची भीती वाटू लागली आहे. अमली पदार्थ विकून झटपट बक्कळ पैसा कमावण्याच्या नादात पुण्यातील गुन्हेगारी वाढली आहे.