अमीनजीं सारख्या विश्व विख्यात कलाकाराला मला भेटता आले या सारखे भाग्य नाही..

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

साधारण पन्नाशीच्या रसिकांना आठवत असेल, की दर बुधवारी संध्याकाळी बिनाका/ सिबाका गीतमाला ऐकण्यासाठी, रेडिओ सिलोनचे खरखरीत प्रक्षेपण कसेबसे ऐकण्यासाठी, वही पेन सरसावून, सूनने के लिये आपण कसे बेताब होत असू. गत सप्ताहात कुठले गीत कुठल्या पादानवर आणि या सप्ताहात कुठले गीत असेल याबद्दल संपूर्ण कुटुंब आडाखे बांधत असे. एवढ्यात निवेदिकेचा तो मादक स्वर, *ये श्रीलंका ब्रॉड कास्टिंग कॉर्पोरेशन का विदेश विभाग हैं, पच्चीस, एकतालीस औंर उंनांचास मीटर पर आप सून रहे है....बिनाका/सिबाका गी sss त माला* आणि घराघरातील चुळबुळ थांबत असे आणि बिनाका गीतमाला सुरू होताना...


कधी कधी, बहनो और भाईयो तर कधी

*"आवाज की दुनिया के दोस्तों" असे श्रोत्यांना संबोधित करून... कार्यक्रम सुरु करुन, नर्म विनोदी शैलीत चित्रपटासंबंधी, गीत निर्मिती संबंधी, कथानकातील गीताचे स्थान, रागदारी विषयी, शब्द सौंदर्य उलगडावे ते अमीनजीनीच.. श्रोते गोंधळत, मुळ गीतांचे सौंदर्य बघायचे की निवेदनाचे? अमीनजी ज्या नजाकतीने गीत, संगीत, कथानकासंबंधी, अभिनेत्यासंबंधी किस्से ऐकवित, ती शैली रसिक श्रोत्यांना खिळवून ठेवत असे.

बहरहाल बहनो और भाइयों.. आज के इस बिनाका गीतमाला कि अगली  पादान पर है, वो गीत जिसकी तर्ज बनायी  है  .. असे म्हणत आपल्या नर्मविनोदी शैलीत, अदबशीर रेशमी आवाजात अमीन सयानी हयांना ऐकणे हा एक आगळा वेगळा असा अपूर्व अनुभव होता.  एकेका गीताची विविध सौंदर्य स्थळे रसिकांना उलगडून दाखवणारे अत्यंत सुंदर अन् मधाळ, हिंदी उर्दू मिश्रित उत्स्फूर्त निवेदन कित्येकदा मुळ गीतापेक्षा देखील उजवे असायचे. एखाद्या सुरेख चित्राभोवतीची चौकट जणू त्या चित्रापेक्षा देखील सुंदर भासावी!  जणू प्रत्यक्षाहुन प्रतिमा उत्कट !!! रसिक जेवढे ते गीत ऐकायला उत्सुक असत, तेवढेच हे सुश्राव्य निवेदन ! हा रेशमी स्वर अजूनही तेवढाच ताजा तवाना आणि तरुण आहे. ह्या निवेदनाला पर्याय आर जे? असूच शकत नाही. 

मी,... राजील म्हणजे अमीनजींचे चिरंजीव, यांचेशी बोलून मुलाखतीची तारीख मुकर्रर केली. अमीनजींचे कार्यालय अत्यंत साधेसुधे होते. तसे अस्ताव्यस्त, ठिकठिकाणी, जागे अभावी विविध सिनेमांची स्मृती चिन्हे जणू कोंबून ठेवलेली. करणार काय? जणू श्रीमंत स्मृतीचे श्रीमंत क्षण, मिळालेले सन्मान, स्वतःच सन्मानीत झालेले.. गदगदीत होवून, ओसंडून वाहत होते. अस्ताव्यस्त पडलेले होते, नीटनेटकेपणा राहूच शकत नव्हता. 

अमीनजीनी स्वतः अगत्यपूर्ण देहबोलीने अदबशीर आवाजात मला खुर्चीवर बसायला सांगितले, आणि म्हणाले, *"कि फिल्म इंडस्ट्री का कोई ऐसा कलाकार नही होगा जो इस कुर्सी पर बैठा ना हो..* *?....* मला बसताना कसेसेच झाले.

व्यक्ती म्हणून अमिनजी एक. अफलातून मित्र भासले. त्यांचेशी संवाद साधणे एक अपूर्वानुभव होता. आपल्या संस्कृतीने ६४ कला ग्राह्य धरलेल्या आहेत त्यात निवेदन ही कला समाविष्ट असेल नसेल माहीत नाही, पण नसल्यास ही ६५ वी कला मानावीच लागेल. ज्या कलेच्या अनभिषिक्त सम्राटाशी माझा संवाद होत होता. अधून मधून हे स्वप्न तर नाही ना? मी स्वतःला चिमटा काढून खात्री करत होतो.

*राजील* सांगत होते, की एका प्रसंगी दस्तुर खुद्द अमिताभ बच्चन देखील इंतजार करून, करून परत गेले होते, अर्थात हा अमींनजींचा अहंभाव नव्हता, तो अतीव्यस्ततेमुळे दुर्दैवी प्रसंग घडला. अमिनजी  ढगळी पँट, त्यावर ढगळा शर्ट, पारशी पद्धतीने दोन्ही खांद्यावरून लवचिक बेल्ट परिधान केलेले होते. अमीनजी, थोडे पुढे वाकले होते. त्यातही नम्रता! मी नतमस्तक झालो. त्यांचे वय बोलत होते, शरीरयष्टी बोलत होती.

*"बडी सही तस्वीर बनायी आपने..."*  असे म्हणत, आणि लिहीत  *अमीन सायानी* ह्या विश्व पटलावर मान्यता प्राप्त कलाकाराने, त्यांच्या मी रेखाटलेल्या, त्या रेखाचित्रावर स्वाक्षरी केली. अश्या प्रकारच्या स्वयंस्फूर्त, तोंडी वा लिखित प्रतिक्रिया मिळाल्यानंतर   रेखाचित्र पूर्णत्वाला गेल्यासारखे वाटते..

पण अमीनजींना त्यांची लिखित स्वरूपातील त्यांची प्रतिक्रिया मौखिक करावीशी वाटली. त्यांनी ध्वनिमुद्रित करायची खूण केली.

"हुन हू  हु... मैं अमीन सयानी बोल रहा हुं.. "* अश्या अर्थीच्या शूभेच्छा मुद्रित करून दिल्या..

अलभ्य लाभ... मी सुखावलो... आंधळा मागतो एक डोळा... आणि देव देतो दोन..  मला गदगदित झाले.. त्यांच्या स्वरात मला उद्देशून दिलेल्या अनमोल शूभेच्छा मला आयुष्यभर पुरणार होत्या.

 मी अमीनजींचे चरणस्पर्श केले.. राजील  आपल्या नावा प्रमाणेच प्रेमळ होते. त्यांच्या रूपाने एक मित्रच मला भेटला.. अमीनजीं सारख्या विश्व विख्यात कलाकाराला मला भेटता आले या सारखे भाग्य नाही..

मिलिंद रथकंठीवार

९८५०४३८५७५


Post a Comment

Previous Post Next Post