प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर ;
पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वर्धापन दिन दि. १० फेब्रुवारी रोजी असतो. त्या दिवशी उत्कृष्ट महाविद्यालये, उत्कृष्ट प्राध्यापक, विद्यापीठाचे गुणवंत व उत्कृष्ट अधिकारी, तसेच कर्मचारी यांना पुरस्कार किंवा पारितोषिके दिली जातात. शिक्षकेतर- कर्मचारी व अधिकारी यांचे सेवा पुस्तक व गोपनीय अहवाल यांचे मधील वार्षिक कामगिरीचा आढावा घेतला जातो. तसेच संबंधित कर्मचारी किंवा अधिकाऱ्यांनी पाठविलेला अर्ज पारितोषिक निवड समितीकडे वर्ग केला जातो. मागील दहा वर्षाचा विद्यापीठाचा इतिहास पाहता एका प्रकरणात असे निदर्शनास आले आहे की विद्यापीठात दिले जाणारे पुरस्कार हे उत्कृष्ट कामगिरीबद्दल किंवा तिरस्कार याबद्दल आहेत का?
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील एका शिक्षकेतर कर्मचाऱ्याने विनावेतन रजा घेऊन पीएच.डी.पूर्ण केली. सदर पीएच.डी.संशोधन उपयुक्त नसल्याचा आहेर भेट म्हणून विद्यापीठ प्रशासनाने संबंधित कर्मचारी यांना दिला. तरीही या कर्मचाऱ्याने विद्यापीठातील सेवा करीत असताना नऊ पुस्तके स्वतः लिहून प्रकाशित केली.
या कर्मचाऱ्याची दोन पुस्तके महाराष्ट्रातील ०९ विद्यापीठे व ०४ स्वायत्त महाविद्यालये यांच्या बी.ए व एम. ए. अभ्यासक्रमांना संदर्भ पुस्तके म्हणून मान्यताप्राप्त आहेत. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या मान्यता प्राप्त रिसर्च जर्नल मध्ये आठ शोधनिबंध प्रकाशित केले. वर्तमानपत्रे, मासिके, साप्ताहिके यामध्ये सामान्य प्रशासन, निवडणूक, विद्यापीठ कायदे व प्रशासन या विषयांवर ६२ लेख प्रकाशित झाले आहेत . या कर्मचाऱ्याच्या संशोधनाची दखल घेऊन महाराष्ट्र शासनाने शासनाच्या तज्ज्ञांच्या समितीमध्ये निवड केली. सदर कर्मचाऱ्यास तामिळनाडू, पंजाब, राजस्थान, हरियाणा, दिल्ली, लंडन, शारजा इत्यादी राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय १४ शैक्षणिक पुरस्कार मिळाले आहेत. या कर्मचाऱ्याने दृष्टिहीन विद्यार्थ्यांकरता व पालकांकरिता जगातील विद्यापीठांच्या प्रशासकीय कामकाजाची माहिती असणारे ब्रेल-. इंग्रजी पुस्तक लिहिले व प्रकाशित केले आहे. या पुस्तकाची नोंद इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झालेली आहे. सदर कर्मचाऱ्याने विद्यापीठाच्या प्रशासन विभागास विद्यापीठाचा पुरस्कार मिळण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज विभाग प्रमुखांमार्फत पाठविला होता. परंतु त्याचा विचारच केला गेला नाही. एका वेळेस एका अधिसभा सदस्यांनी अधिसभेमध्ये या कर्मचाऱ्यास विशेष पुरस्कार मिळण्यासाठी प्रस्ताव सादर केला. अधिसभेमध्ये तो मंजूर होऊन व्यवस्थापन परिषदेकडे गेला. मा. व्यवस्थापन परिषदेने सदर प्रस्ताव विहीत स्रोतामार्फत पाठविला नसल्याने नाकारला.
कालांतराने विद्यापीठातील काही सेवकांनी (संघटनेचे नाही) या कर्मचाऱ्याला त्याने केलेल्या शैक्षणिक व संशोधनात्मक कामाच्या अनुषंगाने विद्यापीठाने पुरस्कार द्यावा असा लेखी स्वरूपाचा अर्ज कुलगुरूंकडे सादर केला. परंतु हा अर्ज विहित स्तोतामार्फत उपलब्ध नसल्याने नाकारण्यात आला. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील पुरस्कार किंवा पारितोषिक नेमक्या कोणत्या निकषानुसार दिले जातात? हा एक संशोधनाचा कि राजकारणाचा विषय असावा.
परंतु विद्यापीठातील काही व्यक्तींना तिरस्काराचे पुरस्कार दिले जातात असे अनुमान या प्रकरणावरून काढता येईल. परंतु या प्रकरणाची जमेची बाजू अशी की या कर्मचाऱ्याने या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष केले आणि कालांतराने या कर्मचाऱ्याच्या नावाची नोंद गिनीज बुक ऑफ रेकॉर्डमध्ये झाली. हे प्रकरण एवढ्यावरच थांबले नाही, तर सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या कर्मचाऱ्याची संशोधनात्मक व शैक्षणिक माहिती विद्यापीठाच्या वेबसाईटवर प्रकाशित केली आहे. याचा वापर NAAC मूल्यांकन, विद्यापीठाचे राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय रँकिंग करता देखील केलेला आहे.