'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो' च्या पूर्वतयारीची उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून पाहणी

 देशातील सर्वात मोठे आणि महाराष्ट्रातील पहिले डिफेन्स एक्स्पो- उद्योगमंत्री


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : संरक्षण उत्पादन क्षेत्रात महत्त्वपूर्ण योगदान देण्यासाठी राज्यातील सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योगांना सक्षम करणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या आणि महाराष्ट्रातील अशा प्रकारच्या पहिल्या 'महाराष्ट्र एमएसएमई डिफेन्स एक्स्पो'तून देशाची संरक्षण दले, संरक्षण उपकरणे निर्मितीतील सार्वजनिक उपक्रम तसेच यातील खासगी उद्योग, नवीन स्टार्टअप यांची उत्पादने, नवसंकल्पना पाहता येणार असल्याने महाविद्यालयीन विद्यार्थी, उद्योजक आणि नागरिकांनी भेट द्यावी, असे आवाहन राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केले.

इंटरनॅशनल एक्झिबिशन ॲण्ड कन्व्हेनशन सेंटर, मोशी येथे होत असलेल्या या प्रदर्शनात मांडण्यात येत असलेली शस्त्रास्त्रांची पाहणी करून माहिती घेतली. तसेच प्रदर्शन दालनांना भेट देऊन उर्वरित कामे गतीने पूर्ण करण्याचे निर्देश दिले. उद्योग विभागाचे प्रधान सचिव हर्षदीप कांबळे, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंह, पीएमआरडीएचे आयुक्त राहुल महिवाल, उपमुख्यमंत्री महोदयांचे विशेष कार्य अधिकारी कौस्तुभ धवसे, प्रदर्शनाचे नॉलेज पार्टनर गणेश निबे, महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाचे सह मुख्य कार्यकारी अधिकारी विजय राठोड, मुख्य अभियंता प्रकाश चव्हाण आदी उपस्थित होते. 

जाहिरात : 


तीन दिवस प्रदर्शन पाहता येणार

श्री. सामंत म्हणाले, २४ फेब्रुवारी पासून सुरू होणाऱ्या या प्रदर्शनात भारतीय नौसेना, लष्कर आणि वायुसेना या तिन्ही सुरक्षा दलांचा महत्वाचा सहभाग आहे. प्रदर्शन २६ फेब्रुवारीपर्यंत ३ दिवस सुरू राहणार असून त्यासाठी २० दालने तयार करण्यात आली आहेत. तसेच खुल्या जागेत हेलिकॉप्टर, रणगाडे, जड संरक्षण वाहने, तोफा आदी पाहता येतील.

या प्रदर्शनातील विविध सत्रात भारताची संरक्षण सिद्धता, विविध शस्त्रास्त्रांची निर्मिती, संरक्षण क्षेत्रातील संधी याविषयी अभियांत्रिकी तसेच अन्य शाखेच्या विद्यार्थ्यांना उपयुक्त माहिती मिळणार असून सैन्यदलात दाखल होण्याची प्रेरणा मिळेल. याशिवाय या क्षेत्रातील तंत्रज्ञान सर्वसामान्यांना अनुभवता येणार आहे, शस्त्रास्त्रांना प्रत्यक्ष स्पर्श करून रोमांचक अनुभव घेता येणार आहे, असेही ते म्हणाले.

प्रदर्शनातील चार भव्य  दालनांना शिवनेरी, सिंधुदुर्ग, रायगड आणि पन्हाळा असे नाव देण्यात येणार आहे. संपूर्ण परिसरात छत्रपती शिवाजी महाराजांच्या गडकिल्ल्यांच्या संरक्षण सिद्धतेची संकल्पना प्रदर्शित करण्यात येणार आहे, असे श्री.सामंत यांनी सांगितले.

बैठकीस विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post