प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या मुळा आणि मुठा या दोन नद्या प्रदूषणामुळे दूषित झाल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून 42 किलोमीटरचा प्रवास करणाऱ्या या दोन्ही नद्यांच्या प्रदूषित स्तराकडे पुणे महानगरपालिकेचे तसेच पर्यावरण विभागाचे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप आम आदमी पक्षाच्या वतीने केला गेला.
आम आदमी पक्षाच्या वतीने आज मुळा मुठा या नद्यांची पाहणी करण्याचे नियोजन करण्यात आले होते. पक्षाच्या वतीने सिद्धेश्वर घाट येथे नदीपात्रात उतरून नदीच्या पाण्याचे नमुने घेण्यात आले असून हे नमुने महापालिका आयुक्त, पुण्याचे पालकमंत्री आणि महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री यांना सीलबंद बाटलीतून पोस्टामार्फत पाठवण्यात येणार आहेत. *पुण्याच्या कारभाऱ्यांना नदीच्या स्वच्छतेबद्दल काहीही घेणे देणे नसून केवळ नदीकाठ सुधार प्रकल्पासारख्या गरज नसलेल्या संकल्पना या नागरिकांवर लादल्या जात असून त्यायोगे नागरिकांच्या कराचे हजारो कोटी रुपये वाया घालवले जात असल्याचा आरोप आम आदमी पक्षाचे अध्यक्ष सुदर्शन जगदाळे यांनी यावेळी केला.*
खरे तर नदीकाठ सुधार प्रकल्पापेक्षा नदी स्वच्छता प्रकल्प हा जास्त गरजेचा होता त्यासाठी जायका या आंतरराष्ट्रीय संस्थेने देखील मदत देण्याचे मान्य केले होते. परंतु इतक्या वर्षानंतर देखील नदीच्या प्रदूषण पातळीत कोणतीही सुधारणा झालेली नाही. पुणे महापालिकेच्या कारभाऱ्यांनी पत्रकार परिषद घेऊन मुळा आणि मुठा या दोन्ही नद्यांच्या स्वच्छतेविषयी त्यांचे धोरण काय असणार आहे? याची माहिती नागरिकांना द्यावी या मागणी करता आज आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी पुणे महानगरपालिकेला भेट दिली. यावेळेस पुणे महानगरपालिकेच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना एक तास थांबून ठेवत आयुक्त व्यस्त असल्याने त्यांनी भेट नाकारल्याचे सांगितले. नागरिकांचे प्रश्न मांडण्यासाठी आयुक्तांची वेळ घेऊन या अशा प्रकारचा हुकूमशाही उपदेश देखील यावेळी आम आदमी पक्षाच्या कार्यकर्त्यांना दिला गेला त्यामुळे कार्यकर्ते व सुरक्षा अधिकारी यांच्यात वाद निर्माण झाला.
यावर आम आदमी पक्षाचे महासचिव सतीश यादव म्हणाले, "महापालिका आयुक्त हे आडमुठेपणाचे धोरण अवलंबत आहेत. आज आम्ही केवळ महापालिकेने नदी स्वच्छते बद्दल त्यांचे धोरण येत्या सात दिवसात पत्रकार परिषद घेत नागरिकांना माहिती करून द्यावे ही मागणी घेऊन आलो आहोत परंतु महापालिकेच्या दाराला कुलूप लावून आमची अडवणूक केली जात आहे.
महापालिका प्रशासनातील अधिकाऱ्यांना ते जनतेचे सेवक आहेत आणि जनतेच्या प्रश्नांप्रति ते उत्तरदायी आहेत या गोष्टीची जाणीव करून देण्यासाठी आम आदमी पक्षाच्या वतीने येत्या गुरुवारी आयुक्तांची भेट घेण्याचे ठरले आहे. या भेटीदरम्यान जर नदी स्वच्छता प्रकल्पाबाबत समाधानकारक उत्तर मिळाली नाहीत तर भविष्यात आम आदमी पक्षाच्या वतीने मोठ्या प्रमाणात आंदोलने केली जातील अशी भूमिका यावेळी आपच्या कार्यकर्त्यांनी घेतली.
येत्या आठवडाभरात पुणे महानगरपालिका प्रशासनाने पत्रकार परिषद घेऊन त्यांची भूमिका मांडली नाही तर हेच पाणी टँकर मध्ये भरून प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या निवासस्थानी सोडण्यात येईल - अक्षय शिंदे
आम आदमी पक्षाच्या वतीने आज निवेदन देण्याकरिता शहर अध्यक्ष सुदर्शन जगदाळे, महासचिव सतीश यादव, अक्षय शिंदे, मीडिया संयोजक ॲड.अमोल काळे, अनुसूचित जाती अध्यक्ष प्रशांत कांबळे, सचिव अमोल मोरे, सहसचिव किरण कांबळे, शंकर थोरात, रिक्षा संघटना उपाध्यक्ष उमेश बागडे, सोशल मीडिया सहसंयोजक बालाजी कंठेकर, संघटन मंत्री कुमार धोंगडे, आणि युवा आघाडी संघटन मंत्री ऋषिकेश मारणे, सुनील भोसले व शुभम बिराजदार हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते