कोथरुड येथील थोरात उद्यानात मूलभूत सुविधांचा अभाव असताना मोनोरेलचा अट्टाहास; "आप" ने केला निषेध


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : आम आदमी पक्षाच्या वतीने आज कोथरूड मधील कै.तात्यासाहेब थोरात उद्यानाबाहेर पुणे महानगरपालिकेकडून प्रस्तावित केल्या जाणाऱ्या मोनोरेल प्रकल्पाचा निषेध करत आंदोलन केले गेले. पुणे महानगरपालिकेचे उद्यानातील मूलभूत सुविधांकडे दुर्लक्ष होत असतानाच मोनोरेल प्रकल्पाचा घाट का घातला जात आहे? असा प्रश्न नागरिक विचारत असताना देखील सत्ताधारी भाजपातील काही माननीय यांच्या दबावामुळे नागरिकांच्या दबावाला न जुमानता मोनोरेलचा प्रकल्प रेटला जात असल्याचा आरोप यावेळी आम आदमी पक्षाच्या वतीने केला गेला. या मनोरेल साठी थोरात उद्यानामध्ये तब्बल सत्तर खांब उभे केले जाणार असून त्याच्यामुळे उद्यानात फिरण्यासाठी येणाऱ्या नागरिकांची खूप मोठी अडचण होणार असून उद्यान प्रेमी नागरिकांचा याला तीव्र विरोध आहे.

कोथरूडच्या बागेत प्रवेशद्वारा जवळ असलेला धबधबा बंदा अवस्थेत आहे. लहान मुलांसाठी असलेल्या घसरगुंड्या ची दुरावस्था होत चालली आहे. शुद्ध पिण्याचे पाणी बागेत उपलब्ध झाले यासाठी सौर उर्जेवर चालणारी यंत्रणा देखील बंद अवस्थेत आहे. डायनासोर पार्क ची स्थिती ही अत्यंत वाईट झाली आहे, त्यामध्ये रानटी गवत वाढले असून डायनासोर ची हालचाल तसेच आवाज करणारी यंत्रणा बंद आहे. कुठलेही कारंजे सुरू नाही. बागेत काही वर्षांपूर्वी मगर ठेवण्यासाठी जे तळे बनवले होते ते तळे वापराविना पडले असून त्याचा कोणत्याही प्रकारे उपयोग केला जात नाही, सदर तळ्याचा उपयोग हा लहानग्यांसाठी स्केटिंग रिंग बनवण्यासाठी केला जावा अशी नागरिक मागणी करत आहेत परंतु या मागणीकडेही उद्यान विभागाकडून दुर्लक्ष केले जात आहे. 

आम आदमी पक्ष कोथरूड मधील प्रस्तावित मोनोरेलला पूर्ण ताकदीनिशी विरोध करेल, कारण हा प्रस्ताव म्हणजे नागरिकांच्या कररूपी पैशाची उधळपट्टी आहे असे आम आदमी पक्षाचे शहर अध्यक्ष *सुदर्शन जगदाळे* यांनी बोलताना सांगितले. 

डॉ.अभिजीत मोरे  म्हणाले, केवळ ठेकेदारांना फायदा मिळवून देण्याकरता मनोरेलचा घाट भाजपकडून घातला जात आहे. याआधीही अशाच प्रकारे बाळासाहेब ठाकरे उद्यानात 90 लाख रुपये किमतीची तीन बोलकी झाडे लावण्याचा प्रयत्न भाजपाकडून करण्यात आला होता परंतु आम आदमी पक्षाच्या विरोधामुळे भाजपाला हा प्रस्ताव गुंडाळावा लागला होता.

ॲड.अमोल काळे  म्हणाले, खरे तर लोकप्रतिनिधींनी नागरिकांच्या गरजेप्रमाणे सुविधा निर्माण करायला हव्यात परंतु तसे न होता लोकप्रतिनिधींना ज्या गोष्टी योग्य वाटतात त्याच नागरिकांना दिल्या जातात ही लोकशाहीची शोकांतिका आहे.

आम आदमी पक्षातर्फे या आंदोलनात सुदर्शन जगदाळे, सुरेखा भोसले, प्रशांत कांबळे, रामभाऊ इंगळे, अंजली इंगळे, ऋषिकेश मारणे, प्रदीप उदागे, आरती करंजवणे, उमेश बागडे, रोहन रोकडे, अमोल मोरे, शेखर ढगे, शंकर थोरात, शंकर वीर,ॲड. गणेश थरकुडे, मंजुनाथ मानुरे, सेंन्थिल अय्यर, संदीप घाडगे, किरण कांबळे, जीवन रामतीर्थे, ॲड. दत्तात्रय भांगे, एस एम अली सय्यद आणि सुनील भोसले हे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post