प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
पुणे : सहा महिन्यांपूर्वी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांना एका नागरिकाने विद्यापीठातील चार अधिकाऱ्यांचा फोटो ई- मेल द्वारे पाठविला होता. या फोटो सोबत एक निवेदन सादर केले होते.
विद्यापीठाची जेवणाची सुट्टी दुपारी १.४५ ते २.१५ या कालावधीत असते. बरेचसे कर्मचारी या वेळेतच जेवण व पाच दहा मिनिटांचा फेरफटका मारून किंवा टेबलवरच वामकुक्षी घेऊन दोन वाजून पंधरा मिनिटांनी कामास सुरुवात करतात. परंतु निवेदनात नमूद केलेले चार अधिकारी जेवणानंतर दुपारी २.२० ते २.५० या कालावधीमध्ये परीक्षा विभागाशेजारील आदर्श कँटीन ते शिक्षक वसाहत येथे फेरफटका मारतात व काही ठिकाणी उभे राहून पंधरा मिनिटे गप्पा मारतात व त्यानंतर २ वाजून ५० मिनिटांनी आपापल्या कार्यालयात जातात.
कर्मचारी जागेवर वेळेत नसल्यास त्यांची कान उघडणी केली जाते. परंतु या चार अधिकाऱ्यांच्या विरुद्ध माहिती देऊनही कार्यालय प्रमुख कोणतीही कारवाई करत नसेल तर विद्यापीठातील या अधिकाऱ्यांना सुरक्षेचे कवच असल्याचा अनुभव येतो. कर्मचाऱ्यांना कार्यालयाने वेळेव्यतिरिक्त वेळेत ज्यादा काम केल्यास ओव्हर टाईम भत्ता मिळतो. परंतु विद्यापीठातील काही अधिकाऱ्यांनी फक्त कार्यालयीन वेळेत (म्हणजे सकाळी १०.२० ते सायंकाळी ६.००)काम केल्यास त्यांना पर्यवेक्षण भत्ता म्हणून तेराव्या महिन्याचा पूर्ण पगार दिला जातो. याकरिता त्यांना कार्यालयीन वेळे व्यतिरिक्त ज्यादा वेळेत काम करण्याची गरज नाही.