प्रेस मीडिया लाईव्ह :
फिरोज मुल्ला सर
विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांचेकडे विद्यापीठाच्या रँकिंग संदर्भात फेर तपासणी करण्यासाठी माहिती मागविली आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांच्याकडे तक्रार प्राप्त झाली आहे. तक्रारदाराने "सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या रँकिंगची फेर तपासणी करण्यात यावी" अशी विनंती केली आहे. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोगास सादर केलेल्या रिसर्च पेपर, पब्लिकेशन्स, आर्टिकल, तसेच संशोधनाची आकडेवारी, रिसर्च पब्लिकेशन व संशोधनासाठी केलेला खर्च यामध्ये तफावत असल्याचे तक्रारदाराने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचे निदर्शनास आणले आहे. यासंदर्भात विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांनी सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू व कुलसचिव यांच्याकडे दि. २० सप्टेंबर २०२३ व दि. १ फेब्रुवारी २०२४ रोजी तात्काळ माहिती मागविणारा ई-मेल पाठविला आहे.
या संदर्भात तक्रारदाराने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठास मूळ तक्रार दिनांक 10 जून 2023 रोजी पाठविली होती. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने या संदर्भात तक्रारदारास उत्तर न दिल्याने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांचेकडे तक्रारदाराने तक्रार पाठविली. परंतु आज या प्रकरणास तब्बल सात महिने होऊनही सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना व तक्रारदारास रँकिंग बाबतच्या माहितीचा खुलासा केलेला नाही. विद्यापीठ सदर खुलासा पाठविण्यास दिरंगाई का करीत आहे? यामुळे विद्यापीठाचे पितळ उघडे पडते की काय? अशी भीती विद्यापीठ प्रशासनास वाटत असावी. त्यामुळे विद्यापीठाचे मानांकन किंवा रँकिंग यावर पुन:श्च परिणाम होतो की काय? असाही प्रश्न उपस्थित होतो. परंतु यामुळे आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या पाठीशी कोण आहे? ज्याचा आधार घेऊन विद्यापीठ अनुदान आयोग, नवी दिल्ली यांना देखील अहवाल अथवा माहिती न पाठविण्याचे धाडस करते किंवा त्यांच्या आदेशासही जुमानत नाही.