सर्वोच्च न्यायालयात रिट याचिका
प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे :'ईव्हीएम मशीनच्या व्हीव्हीपॅट स्लिपवर मतदानाची वेळ,दिनांक छापली जावी 'या मागणीसाठी काँग्रेस नेते एड.अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी सर्वोच्च नायालयात याचिका दाखल केली आहे. सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड ,न्या.जे.बी.पारडीवाला,न्या.मनोज मिश्रा यांच्या पीठासमोर २ फेब्रुवारी ही याचिका दाखल झाली असून ७ फेब्रुवारी रोजी ही याचिका सुनावणीसाठी येणार आहे.
यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला , केंद्र सरकारला नोटीस काढण्यात आली असून ७ फेब्रुवारी रोजी त्यांचे म्हणणे मांडण्यास सांगण्यात आले आहे . काँग्रेस नेते एड.अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांच्या वतीने एड.अभय अनिल अंतुरकर ,एड.सुरभी कपूर आणि एड.असीम सरोदे सर्वोच्च न्यायालयात बाजू मांडत आहेत.
काँग्रेस नेते एड.अभय छाजेड आणि रमेश अय्यर यांनी आज पुण्यात प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात आली आहे.
निवडणुकांमध्ये वापरले जाणारे ईव्हीएम मशीन मध्ये ज्या व्हीव्हीपॅट स्लिप येतात,त्या वर झालेल्या प्रत्येक मतदानाची वेळ आणि तारीख छापून यावी,अशी याचिकाकर्त्यांची प्रमुख मागणी आहे.२०१९ च्या निवडणुकीत स्लिपवर वेळ आणि तारीख छापली जात नव्हती.अलीकडेच झालेल्या कसबा विधानसभा पोटनिवडणुकीत काँग्रेस उमेदवार रवींद्र धंगेकर यांनी निवडणूक आयोगाकडे मागणी करूनही ती मान्य झाली नव्हती.निवडणूक आयोगाच्या तज्ज्ञ समितीने मतदानाच्या तारीख,वेळेसह स्लिप छापून मिळावी,अशी शिफारस केलेली असतानाही त्यावर वेळोवेळी अंमलबजावणी झालेली नसल्याचे याचिकाकर्त्यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या निदर्शनास आणले आहे. २०२४ च्या लोकसभा निवडणुकीत सरकार आणि निवडणूक आयोगाने ताळमेळ राखत तज्ज्ञ समितीच्या शिफारशींची अंमलबजावणी केली पाहिजे, अशी मागणी याचिकेत करण्यात आली आहे.
मतदान केलेली तारीख आणि वेळ नमूद करून स्लिप मिळणे हा मतदाराचा अधिकार आहे.मुक्त आणि पारदर्शक वातावरणात निवडणूक होण्यासाठी ईव्हीएम मशीन आणि व्हीव्हीपॅट स्लिप चे कार्य विश्वासार्ह असले पाहिजे, त्यात सुधारणा झाली पाहिजे,असे याचिकाकर्त्यांनी याचिकेत म्हटले आहे .