बीग ब्रेकिंग : पोलीस स्टेशन की लाचखोरांचा अड्डा ?

 सहा महिन्यांतील सातवी घटना, खाकी वर्दीची बदनामी 

प्रेस मीडिया लाईव्ह :

 पिंपरी : २० लाखाची लाच  मागणाऱ्या देहूरोड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना तात्काळ अटक करून , निलंबित करा - अपना वतन संघटनेची मागणी 

२० लाखाची लाच  मागणाऱ्या देहूरोड स्टेशनमधील पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करून , तात्काळ निलंबित करण्याची मागणी अपना वतन संघटनेने पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केली आहे.

 अपना वतन संघटनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे कि, पोलीस हे कायदा व सुव्यस्था अबाधित राखण्यासाठी २४ तास अहोरात्र झटत असतात.  " सद्रक्षणाय खलनिग्रहणाय " हे पोलिसांचे ब्रीदवाक्य आहे . परंतु देहूरोड पोलीस स्टेशन हद्दीत मागील अनेक दिवसांपासून नागरिकांच्या अनेक तक्रारी येत आहेत . ज्यामध्ये पोलिसांच्या संगनमताने अवैध धंदे चालवणे  , खोटे गुन्हे दाखल करणे , सामान्य नागरिकांची तक्रार न घेणे , सामान्य नागरिकांशी उद्धट वागणे व अपमानजनक वागवणूक देणे . केवळ राजकीय दबाव व काही आर्थिक स्वार्थासाठी जबाबदारी ची जाणीव असताना जाणीवपूर्वक कर्तव्यात कसूर करून बेकायदेशीर कृत्य करणे व अशा कृत्यांना अभय देणे . यासंदर्भात अपना वतन संघटनेने वरिष्ठ अधिकारी चुकीच्या गोष्टींना पाठीशी घालणार नाहीत . चुकीच्या पोलीस कर्मचाऱ्यांना वेळीच लगाम घालतील अशा अपेक्षेने अनेकवेळा पत्रव्यवहार केलेला आहे . परंतु आजतागायत ठोस कारवाई होताना दिसत नाही . त्यामुळे जनतेचा पोलिसांवरील विश्वास कमी होण्याची शक्यता निर्माण झालेली आहे. देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये एका नागरिकांकडून २५ लाख रुपयाचे चेक लिहून घेतलेले प्रकरण ताजे असतानाच आज वृत्तपत्रांच्या माध्यमातून देहूरोड पोलीस स्टेशन मधील कर्मचाऱ्यांनी २० लाख रुपयाची मागणी करीत खोट्या गुन्ह्यात फसवण्याची धमकी दिल्याबाबत धक्कदायक बातमी शहरभर पसरलेली आहे. यामुळे पोलीस दल प्रचंड बदनाम होत आहे. 

               घडलेली घटना अशी कि, दिनांक १५/०२/२०२४ रोजी देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये महाविद्यालयीन तरुणाला गांजाच्या गुन्ह्यामध्ये अडकवण्याची धमकी देत २० लाख रुपयाची लाच मागण्यात आली . याबाबत गुन्हा क्रमांक ७९/२०२४ दाखल करण्यात आलेला आहे. यामध्ये वैभवसिंग मनीषकुमार सिंग ( वय १९ , रा . किवळे , पुणे ) यांनी दिलेल्या फिर्यादी मध्ये म्हटल्याप्रमाणे , देहूरोड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी व इतर ६ जणांनी  फिर्यादी वैभव सिंग यांच्याकडून पैसे उकळण्याचा  कट रचला . त्यानुसार आरोपींनी १० फेब्रुवारी २०२४ रोजी दुपारी सव्वा बारा वाजता  किवळे येथील एका कॅफेमधून वैभव सिंग यांचे अपहरण केले. तेथून मायाज लॉज , गहुंजे स्टेडियम , आणि तेथून देहूरोड पोलीस स्टेशन मध्ये नेह्ण्यात आले . वैभव सिंग याला गांजाचा खोट्या गुन्ह्यात अडकवून जेलमध्ये टाकण्याची धमकी देण्यात आली . देहूरोड पोलीस स्टेशनमधील पोलीस कर्मचारी व इतर आरोपींची वैभवसिंग यांना घाबरवून, धमकावून त्यांच्याकडून गूगल पे आणि नेट बँकिंग द्वारे ४ लाख ९८ हजार रुपये घेतलॆ आहेत असे फिर्यादी मध्ये नमूद आहे. 

           सदर घटना पोलीस दलासाठी अतिशय शरमेची बाब आहे .अशा पोलिसांमुळे संपूर्ण पोलीस दलाकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलत आहे. अशा *पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वारंवार वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रारी करूनसुद्धा पोलीस आयुक्त , पोलीस उपायुक्त असे वरिष्ठ अधिकारी अशा प्रकरणाची चौकशी करून अशा भ्रष्ट आणि बेजबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई का करत नाहीत ? 

असा प्रश्न सामान्य जनतेला पडलेला आहे. देहूरोड पोलीस स्टेशन मधील सदर पोलीस कर्मचारी व त्यांच्या माघे आडून त्यांना हे करायला लावणारे वरिष्ठ अधिकारी यांची चौकशी करावी . कारण वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या संमतीशिवाय एवढे गंभीर प्रकरण कनिष्ठ कर्मचारी हाताळत असतील असे वाटत नाही. त्यामुळे सदर प्रकरणाची गंभीर दखल घेऊन आपण तात्काळ दोषी पोलिसाना अटक करून त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करावी अशी मागणी अपना वतन संघटनेच्या वतीने मा. पोलीस आयुक्त विनयकुमार चौबे यांच्याकडे केलेली आहे . सदर बाबत कारवाई झाली नाहीतर आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आलेला आहे.


अपना वतन संघटना - सर्वसामान्यांच्या न्याय व  हक्कांसाठी लढणारी राष्ट्रप्रेमी संघटना


Post a Comment

Previous Post Next Post