प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई - आपल्या प्रेक्षकांसाठी जाणीवपूर्वक अर्थपूर्ण कंटेंट घेऊन येणारी सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजन ही वाहिनी आता घेऊन येत आहे, ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ ही नवीन मालिका. या वेधक मालिकेत एक घरगुती, उत्साही आणि जबाबदार नंदिनी आपल्या देशात रुजलेल्या हुंडा प्रथेला आव्हान देताना दिसते. परंपरेचा मुलामा चढवलेला हुंडा म्हणजे एका स्त्रीच्या प्रतिष्ठेची किंमत असते आणि ‘मला माझा हुंडा परत हवा आहे’ ही नंदिनीची निर्भीड मागणी या मालिकेचे कथानक पुढे घेऊन जाते. ‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिकेच्या केंद्रस्थानी नंदिनी आहे, जी साकारली आहे मीरा देवस्थळे या अभिनेत्रीने. ही व्यक्तिरेखा ताकदीचे प्रतीक आहे आणि स्त्रीचा आत्मसन्मान पणाला लावणाऱ्या जुनाट हुंडा प्रथेला आव्हान देणारी ही नायिका आहे.
गुजरात प्रांतात घडणाऱ्या या कथेत नंदिनीचे पालनपोषण तिच्या मामा-मामीने केले आहे, ज्यांच्या भूमिका अनुक्रमे जगत रावत आणि सेजल झा यांनी केल्या आहेत. नंदिनी परंपरेची बूज राखणारी आहे, ती वाडीलधाऱ्यांना मान देते, ती बहुश्रुत आहे आणि पुरोगामी विचारांची आहे. आपल्याला जे समजले नाही, त्याबद्दल प्रश्न विचारण्याची शिकवण तिच्या मामाने तिला दिली आहे आणि ते ती बेधडक करते. अभिनेता झान खान याने नंदिनीचा पती, नरेन रतनशी याची भूमिका केली आहे, तर अभिनेता धर्मेश व्यास आणि खुशी राजपूत यांनी अनुक्रमे हेमराज रतनशी आणि चंचल रतनशी या तिच्या सासऱ्याची आणि सासूची भूमिका केली आहे. समाधानी वैवाहिक जीवन लाभलेली नंदिनी आपल्या सासू-सासऱ्यांच्या आणि हुंडा प्रथेच्या विरोधात हिंमतीने उभी ठाकते आणि यातून एक दृढनिर्धाराची, लवचिकतेची आणि सामर्थ्याची हृदयस्पर्शी कथा जन्म घेते.
‘कुछ रीत जगत की ऐसी है’ मालिका सुरू होत आहे 19 फेब्रुवारी रोजी आणि दर सोमवार ते शुक्रवार रात्री 8.30 वाजता ती प्रसारित करण्यात येईल, फक्त सोनी एन्टरटेन्मेंट टेलिव्हिजनवरून.
टिप्पण्या
जे डी मजेठिया, हॅट्स ऑफ प्रॉडक्शन्स
“हुंडा प्रथा आजही केवळ ग्रामीण भारतातच नाही, तर महानगरांमधील देखील वास्तविकता आहे. फक्त आता हुंडा वेगळ्या भाषेत मागितला जातो, “आम्हाला काहीच नको. तुम्हाला आपल्या मुलीला आनंदाने जे द्यायचे असेल, ते द्या.’ आपण एका स्त्रीच्या जीवनाचे, अस्तित्वाचे मूल्य तिने लग्नात आणलेल्या सोन्यावरून, भेटवस्तूंवरून आणि पैशावरून का करतो? असे प्रश्न वारंवार उठले पाहिजेत आणि आमच्या मालिकेचा उद्देश आपल्या समाजात परंपरेच्या बुरख्याखाली दडलेल्या अशाच काही अनिष्ट प्रथांवर प्रकाश टाकण्याचा आहे. उत्कृष्ट अभिनेते, प्रख्यात लेखक यांच्याशी भागीदारी करताना आम्हाला खूप आनंद होत आहे. त्यांनी सादर केलेले हे कथानक देशभरातील प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेईल अशी आम्हाला खात्री वाटते.”
मीरा देवस्थळे, अभिनेत्री
“मी नेहमी भारतीय टेलिव्हिजनवरील अपारंपरिक भूमिका निवडल्या आहेत. यावेळी स्वतःला न पटणाऱ्या, चुकीच्या गोष्टींविरुद्ध आवाज उठवणाऱ्या नंदिनीची व्यक्तिरेखा साकारण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. आज देखील हुंडा म्हणजे समाजाला पोखरणारी वाळवी आहे. या अनिष्ठ प्रथेत आपण एका मुलीचे मूल्य ती आपल्या सासरी जे सोने-नाणे घेऊन येते त्यावरून करतो. ही नंदिनीची गोष्ट आहे, आपला हुंडा परत मागून ती एक असे पाऊल उचलते, जे याआधी आपण पाहिलेले वा ऐकलेले नाही. मला आशा आहे की, या मालिकेच्या माध्यमातून हा संदेश आम्ही पसरवू शकू की, हुंडा ही रीत नाही; रोग आहे.”