नोंदीत बांधकाम कामगारांना गृहपयोगी वस्तू संच वाटपाचा कोल्हापूर जिल्हयात हसन मुश्रीफ यांच्या हस्ते शुभारंभ
राज्यातील साडे चार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल करण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांचे प्रतिपादन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : जिल्हयातील कामगार विभागामार्फत 1.15 लाख कामगारांना मागणीनूसार गृहपयोगी वस्तू संच वाटप होणार आहे. या कार्यक्रमाचा शुभारंभ मंत्री वैद्यकिय शिक्षण व विशेष सहाय्य तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते झाला.
यावेळी बोलताना ते म्हणाले, येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून महाराष्ट्र राज्यात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या साडेचार कोटी कामगारांच्या जीवनमानात बदल घडवून आणण्यासाठी शासन प्रयत्न करणार आहे. साडे चार कोटींपैकी काहीच नोंदीत कामगार आहेत. उर्वरीत शेत कामगार, कापड उद्योग कामगार, हॉटेल व्यवसायातील कामगार, ट्रक चालक, रिक्षा चालक तसेच इतर मोठ्या प्रमाणात काम करणाऱ्यांसाठी मंडळे स्थापन करून त्यांचेही जीवनमान सुधारण्यासाठी प्रयत्न करता येईल. भारत देश महासत्ता बनविण्याचे स्वप्न पुर्ण करण्यासाठी व देशाची अर्थव्यवस्था जगात पहिल्या तीनमधे आणण्यासाठी सर्वसामान्यांचे जीवनमान सुधारणे आवश्यक
आहे. त्यासाठीच येत्या काळात कामगारांसाठी प्राधान्याने शासनाकडून विविध योजना आणण्याचे प्रयत्न करणार असल्याचे ते यावेळी म्हणाले. या कार्यक्रमाला जिल्हाधिकारी अमोल येडगे, कोल्हापूर सहायक कामगार आयुक्त विशाल घोडके, इचलकरंजी सहाय्यक कामगार आयुक्त जानकी भोईटे, निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांचे सह मोठ्या संख्येने नोंदीत बांधकाम कामगार उपस्थित होते.
या कार्यक्रमात प्रातिनिधीक स्वरूपात 10 नोंदीत कामगारांना कामगार विभागांतर्गत येणाऱ्या विविध योजनांचे लाभ वितरीत करण्यात आले. पालकमंत्री मुश्रीफ यांचे स्वागत तृणधान्याचे बकेट देवून सहायक कामगार आयुक्त घोडके यांनी केले. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी कामगारांना शासकीय योजनांचे चांगल्या प्रकारे लाभ घेण्याचे आवाहन केले. ते म्हणाले, कामगार विभागात कामगार मुलांच्या शिक्षणासाठी, पत्नी किंवा तीच्या गरोदरपणात अर्थिक मदत, आरोग्यासाठी ५ लाखांचा विमा, मृत्यू पश्चात अर्थिक मदत अशा अनेक योजनांमधून महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मदत देत आहे. कामगारांच्या जीवनात आनंद देण्याचे कार्य शासन करीत असून येत्या काळात विविध मंडळे स्थापन करून उर्वरीत कामगारांनासुद्धा या योजनांमधे आणण्यासाठी प्रयत्न होतील. मात्र हे करीत असताना यामधे कामगारांची नोंदणी करताना बोगस कामगारांची नोंदणी होवू नये यासाठी संबंधित विभागाने काम करावे. सद्या राज्य शासनाकडे 15 हजार कोटी रूपये या मंडळाकडे बँकेत असून त्यावरील मिळणाऱ्या व्याजातून ही योजना कार्यन्वित करण्यात आली आहे. कोणत्याही प्रकारच्या बांधकामावेळी त्या कामाच्या किंमतीमधून 1 टक्का कामगार सेस या रकमेत जमा होतो असे त्यांनी यावेळी सांगितले. त्यांच्या हस्ते शुभारंभ केलेल्या गृहपयोगी संचामधे किचनमधे आवश्यक साहित्य यात थाळ्या, वाटया, ग्लास, प्रेशर कुकर, पाण्याचा पिंप आदी साहित्याचा समावेश आहे.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक सहाय्यक कामगार आयुक्त विशाल घोडके यांनी केले. ते म्हणाले, कामगारांचे जीवन सुसह्य होण्यासाठी शासनाकडून मोठ्या प्रमाणात विविध योजना सुरू करून विभागाला अधिकचे बळ दिले. कोल्हापूर जिल्हा राज्यात नोंदीत कामगरांच्या कामात अग्रेसर असून 3 लाखहून अधिक कामगारांची नोंदणी झाली आहे. त्यातील 1.15 लक्ष जीवीत नोंद कामगार आहेत. आता गृहपयोगी वस्तू संच वाटपाला जिल्हयात सुरूवात होत आहे. सर्वांना त्याचे वाटप होणार असून पुढिल दोन वर्षे ही योजना सुरू राहणार आहे. त्यामुळे कामगारांनी घाई न करता या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचे आभार सहाय्यक कामगार आयुक्त इचलकरंजी जानकी भोईटे यांनी मानले तर सुत्रसंचलन सीमा मकोटे यांनी केले. यावेळी या योजनेतील लाभार्थी वैभव जौंधाळ यांनी आपल्या वडिलांना मिळालेल्या लाभामुळे जीवनमान सुधारल्याचे सांगितले. ते म्हणाले, मी आज कृषि सहायक म्हणून काम करतोय याचे श्रेय ही योजना आहे.
*नोंदीत कामगारांनी गृहपयोगी संच मिळविण्यासाठी हे करा*
कोल्हापूर जिल्हयात 1.15 लाख नोंदीत कामगार यासाठी पात्र आहेत. ही योजना दोन वर्षे सुरू राहणार असून एका कुटुंबातील एकालाच या योजनेचा लाभ घेता येणार आहे. त्यामुळे संच मिळविण्यासाठी घाई न करता, कामगारांनी 9307059989 या मोबाईल क्रमांकावर संच मिळण्यासाठी नोंदणी करावी. किंवा प्रत्यक्ष येवून मुस्कान लॉन, कोल्हापूर येथे टोकन घ्यावे. नोंदणी झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी संच वाटप होईल. या प्रक्रियेत त्याचे बायोमेट्रीकही तपासले जाणार आहे. दर दिवशी 500 संच वितरीत केले जाणार आहेत. त्यामुळे कामगार विभागाने गर्दी न करण्याचे आवाहन केले आहे.