वाहतूक पोलिसाच्या दक्षतेमुळे दुचाकी चोरटा जाळ्यात.

  ट्रॅफिकच्या कर्मचाऱ्यांचा सन्मान

प्रेस मीडिया लाईव्ह : 

मुरलीधर कांबळे :

कोल्हापूर : कोल्हापूर शहरात वाहतुकीला शिस्त लावण्यासाठी अहोरात्र रस्त्यावर उभे असलेले ट्रॅफिक विभागाचे कर्मचारी आपले काम सजगतेने करीत असतात. सजगता, चौकस बुद्धीमुळे त्यांनी सात दुचाकी चोरट्यांना अटक केली आहे. पोलिसांच्या या कामगिरीबद्दल पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी क्राईम आढावा बैठकीत चांगले काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा सन्मान केला.

शहर वाहतूक नियंत्रण शाखेकडून प्रामुख्याने वाहतुकीचे नियमन आणि वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या वाहनचालकांवर कारवाया केल्या जातात; मात्र यापुढे जाऊन चोरीतील वाहनांचा शोध घेणे आणि चोरीचे गुन्हे रोखण्यातही वाहतूक पोलिसांचे योगदान वाढत आहे. रस्त्यावर थांबून वाहतूक नियमन करताना संशयास्पद हालचालींवरून ताब्यात घेतलेल्या व्यक्तींकडे चोरीतील सात दुचाकी मिळाल्या. कॉन्स्टेबल फय्याज अत्तार आणि रमेश खोपकर यांनी मध्यवर्ती बसस्थानक परिसरातून मोबाईल चोरणाऱ्या महिलेस रंगेहात पकडले.

सहायक फौजदार अशोक चव्हाण आणि शशिकांत पोरे यांनी दुचाकींमधील पेट्रोल चोरणाऱ्या तरुणास पकडून शाहूपुरी पोलिसांच्या ताब्यात दिले. अंमलदार संदीप कापसे, विजयकुमार जाधव, प्रदीप कांबळे, सचिन जांभळे, स्नेहल कोरगावकर, अमर उबाळे, विक्रम वेदांते, सुनील गायकवाड आणि शहाजी पाटील यांनी चोरीतील सात दुचाकींची शोध घेतला. पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी याबद्दल प्रशस्तिपत्र देऊन वाहतूक पोलिसांचे कौतुक केले.


Post a Comment

Previous Post Next Post