महासंस्कृती महोत्सव २०२४ ची पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत सांगता
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : राज्य शासन आणि जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित केलेल्या शाहू मिल येथील महासंस्कृती महोत्सव २०२४ मधून कोल्हापूर जिल्ह्याला लाभलेली ऐतिहासिक, सांस्कृतिक परंपरा सर्वदूर जाईल असे प्रतिपादन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
महासंस्कृती महोत्सव ३१ जानेवारी पासून कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला होता याची सांगता रविवारी सायंकाळी झाली. यावेळी ते म्हणाले, पाच दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी झाली. यात शिवकालीन शस्त्र, हस्तकला, खाद्य संस्कृती आणि अनेक दर्जेदार सांस्कृतिक कार्यक्रमातून महोत्सव अंमलबजावणीचा उद्देश यशस्वी झाला. तसेच पालकमंत्री मुश्रीफ यांनी ऐतिहासिक शस्र प्रदर्शनालाही यावेळी भेट दिली. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के. मंजुलक्ष्मी, अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त केशव जाधव, उपजिल्हाधिकारी संपत खिलारी, उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसिलदार स्वप्नील रावडे यांचेसह इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी समारोपीय कार्यक्रमात पालकमंत्री मुश्रीफ म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराज आणि शाहू महाराज यांनी जनतेचं, रयतेचं राज्य राबवून समाजातील प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला. म्हणूनच आजही आपण त्यांच्या पालख्या अभिमानाने वाहतो. त्यांच्या पदपावनस्पर्शाने पावन झालेल्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक भूमीतील वारसा अशा सांस्कृतिक महोत्सवातून पुढील पिढीकडे जायला हवा. कोल्हापूर जिल्ह्याला अगळं वेगळं ऐतिहासिक महत्त्व आहे. येथील श्री.अंबाबाई, दख्खनचा राजा, दत्त महाराज, खिद्रापूर, अदमापुर अशा अनेक तीर्थक्षेत्रांतून ऐतिहासिक महत्त्व आजही सर्वदूर आहे. शाहू महाराजांनी शेतकरी, महिला, विद्यार्थी यांच्यासाठी अनेक योजना राबविल्या. खऱ्या अर्थाने रयतेचं राज्य निर्माण केलं. अशा या थोर श्री शाहू छत्रपती महाराजांचे आंतरराष्ट्रीय स्मारक याच शाहू मिल येथे येत्या काळात पूर्ण करू. यासाठी वस्त्रोद्योग विभागाकडे जागेसाठी पाठपूरवा करून जागा हस्तांतरित केली जाईल असे ते पुढे म्हणाले.
जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. ते म्हणाले, राज्य शासन आणि जिल्हा प्रशासन यात सर्वच शासकीय विभागांनी योगदान देऊन हा कार्यक्रम यशस्वी केला. अशा प्रकारच्या कार्यक्रमातून आपली परंपरा, आपली संस्कृती पुढील पिढीकडे जाते. असे कार्यक्रम पुन्हा पुन्हा राबविण्यासाठी राज्य शासन व जिल्हा प्रशासन भविष्यातही प्रयत्न करेल. शाहू मिल येथे कलाकार, कारागीर यांनी आपली संस्कृती, आपली हस्तकला आपल्या कलेतून सर्वांसमोर मांडली. कार्यक्रमाचे आभार उपजिल्हाधिकारी संपत खिलारी यांनी मानले. तसेच यावेळी महोत्सवाचे आयोजन करण्यासाठी नेमलेल्या अधिकारी कर्मचारी व अशासकीय सदस्यांना सन्मानित करण्यात आले. यामध्ये उपविभागीय अधिकारी हरीश धार्मिक, तहसीलदार स्वप्नील रावडे, प्रमोद पाटील, प्रसाद संकपाळ, ऋषिकेश केसकर, चंद्रकांत पाटील, शेखर वळीवडेकर, तेजस खैरमोडे, निरांत, गजानन, अनिकेत, उदय पाटील आदी जणांचा समावेश होता.
स्वराज्य संस्थापक श्रीमंतयोगी कार्यक्रमाने सांगता
समारोपीय कार्यक्रमात रविवारी स्वराज्य संस्थापक श्रीमंतयोगी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या गौरवशाली इतिहासावर आधारित कार्यक्रमाने सांगता झाली. यावेळी सुट्टीच्या दिवसामुळे प्रचंड गर्दीत कार्यक्रम पार पडला. कार्यक्रमात वेगवेगळ्या प्रसंगात सादर केलेली कला, संगीत व दमदार आवाज यातून उपस्थितांनी टाळ्यांच्या कडकडाटाने दाद दिली. तसेच प्रदर्शनीय कलादालनात नागरिकांनी ऐतिहासिक व सांस्कृतिक प्रदर्शनाचा लाभ घेतला.