स्वतःचा मेंदू व स्वत्व शाबूत आहे त्यांनी विवेकाने विचार करावा

प्रसाद कुलकर्णी यांचे प्रतिपादन

प्रेस मीडिया लाईव्ह :

किर्लोस्करवाडी ता.१६ भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव झाला. भारतीय राज्यघटनेचा अमृत महोत्सव सुरू आहे. अशा काळात शब्दबंबाळ भाषणबाजी आणि त्याच वेळी जाती धर्मावर आधारित व गरीब व श्रीमंत यांच्यातील दरी रुंदावणारी विषारी आणि विखारी कृती  केली जात आहे. शेतकरी,कष्टकऱ्यांवर हल्ले होत आहेत.सरकारी शाळा बंद पडल्या जात आहेत ,रोजगार आक्रसत चालला आहे, महागाई गगनाला भिडते आहे, बळीराजाच्या गळ्याभोवती दोरी आवळली जात आहे. मात्र त्याचवेळी जगण्याच्या मूलभूत प्रश्नांपासून लक्ष हटविण्यासाठी समाजाला धर्म आणि धर्मस्थळांच्या भुलीचा डोस दिला जात आहे. सत्य बोलणाऱ्यांवर हल्ले होत आहेत आणि खोटेपणाचा बडेजाव माजवला जात आहे हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे.या पार्श्वभूमीवर ज्यांच्या धडावर अजून स्वतःचे डोके शाबूत आहे आणि मेंदू , कान, डोळे कार्यरत आहेत अशा माणसांनी या परिस्थितीचा विवेकाने विचार केला पाहिजे,असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद माधव कुलकर्णी यांनी आचार्य शांताराम बापू गरुड प्रबोधन व्याख्यानमालेत पहिले पुष्प गुंफ ताना ' भारताचे अस्वस्थ वर्तमान ' या विषयावर व्यक्त केले. आमदार अरुणअण्णा लाड यांची प्रमुख उपस्थिती होती. अध्यक्षस्थानी व्ही. वाय.आबा पाटील होते. स्वागत व प्रास्ताविक आदम पठाण यांनी केले.

रामानंदनगरच्या सरपंच सुमैया जहांगीर कोल्हापुरे यांच्या हस्ते कालवश आचार्य शांताराम गरुड यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून व्याख्यानमालेचे उद्घाटन करण्यात आले.समाजवादी प्रबोधिनी, व्ही.वाय. आबा पाटील समाज प्रबोधन अकॅडमी , गुरुकृपा ज्येष्ठ नागरिक संघ आणि पलूस तालुका परिवर्तनवादी संघटनांच्या वतीने प्रबोधकांचे प्रबोधक आचार्य शांताराम बापू गरुड , लोकचळवळीचे आधारवड कालवश प्रा.डॉ.एन.डी. पाटील व शहिद कॉम्रेड गोविंद पानसरे यांची आठवण म्हणून ही व्याख्यानमाला आयोजित केली जाते. व्याख्यानमालेचे हे बारावे वर्ष आहे.

प्रसाद कुलकर्णी म्हणाले,संविधानिक मूल्यांवर मोठ्या प्रमाणात आक्रमण केले जात आहे. राजकिय पक्षाच्या चौकटीत संविधानाला घालण्याचा कृतीकार्यक्रम आखला जात आहे. कोणत्याही ध्वजापेक्षा भारतीय राष्ट्रध्वज हा सर्वश्रेष्ठ आणि कोणत्याही राजकीय पक्षापेक्षा भारतीय राज्यघटना सर्वश्रेष्ठ आहे.भारतीय तिरंग्यातील केशरी रंग त्याग व धैर्य, पांढरा रंग शांती आणि सत्य आणि हिरवा रंग श्रद्धा आणि संपन्नता अधोरेखित करणार आहे.तसेच त्यातील अशोक चक्राच्या चोवीस आऱ्या बंधुत्व, आरोग्य ,संघटन आदी महत्वाची मानवी मूल्ये सांगतात. स्वातंत्र्य सैनिकाच्या रक्तातून आणि बलिदानातून मिळालेले स्वातंत्र्य आणि त्यानंतर समग्र भारतीय संस्कृतीचे भान ठेवून तयार केलेली भारतीय राज्यघटना जपायची असेल तर आपल्या तिरंग्याचे महत्त्व पुन्हा पुन्हा प्रस्थापित करणे हाच खरा अमृत काळाचा संदेश आहे. प्रसाद कुलकर्णी यांनी आपल्या ओघवत्या शैलीतील भाषणात वर्तमान भारतीय राजकारण, समाजकारण ,अर्थकारण, संस्कृतीकारण, धर्मकारण या साऱ्याचा वापर करून भविष्य उज्वल करायचे असेल तर या सगळ्याकडे गंभीरतेने पाहिले पाहिजे हे स्पष्ट केले. तसेच सत्य आणि असत्य,वाचाळता आणि विवेक, विज्ञान आणि छद्म विज्ञान, विकास मुठभरांचा की सर्वांगिण, हिंसा आणि अहिंसा, मानवधर्म की धर्मांधता, लोकशाही की हुकूमशाही, समाजवाद की माफिया भांडवलशाही, संघराज्य की एकचालुकानीवर्तित्व , मतदार केंद्रितता की व्यक्ती केंद्रितता अशा अनेक मुद्द्यांचा उहापोह केला. आणि जगाच्या इतिहासात अनेकदा लोकशक्तीनेच अस्वस्थ वर्तमान बदलून इतिहास घडवलेला आहे. कारण अंतिम सत्ता लोकांची असते. काही लोकांना काही काळ फसवता येतं , काही काळ सर्व लोकांना फसवता येतं, पण सर्व काळ सर्व लोकांना फसवता येत नाही. कारण लोकांचा सामुदायिक शहाणपणावर जगाची आणि भारताची ही वाटचाल झालेली आहे आणि होत राहील असा आशावाद व्यक्त केला.

प्रमुख पाहुणे आमदार अरुणअण्णा लाड म्हणाले, शिक्षणापासून उद्योग क्षेत्रापर्यंत सर्व क्षेत्रात अतिशय चुकीच्या पद्धतीने निर्णय घेतले जात आहेत.खोटी आश्वासने दिली जात आहेत. सर्व क्षेत्रात मोठ्या प्रमाणामध्ये खाजगीकरण सुरू आहे. केवळ शेतीवर जगणारे करोडो लोक या देशात असूनसुद्धा शेती क्षेत्राकडे गांभीर्याने पाहिले जात नाही. उलट अन्नधान्याच्या आयातीचे पुढील अनेक वर्षाचे करार केले जात आहेत.रोजगार देण्या ऐवजी भिक दिली जात आहे. तसेच हे राज्य कायद्याचे आहे का ?अशी शंका यावी अशी वक्तव्ये व कृती खुलेआम  घडत आहे.हे आजचे अस्वस्थ वर्तमान आहे. ते बदलायचे असेल तर लोकांनी त्याविरुद्ध एकत्रितपणे आवाज उठवला पाहिजे.

अध्यक्षस्थानावरून बोलताना व्ही.वाय.पाटील म्हणाले, आजचे वर्तमान अस्वस्थ आहे यात शंका नाही.समाज जीवनातील सर्व क्षेत्रातील प्रश्न बिकट होत आहेत. सत्ताधाऱ्यांनी फार मोठ्या प्रमाणात अस्वस्थता आपल्या धोरणातून पसरवलेली आहे. भविष्याची योग्य दिशेने वाटचाल करायची असेल तर प्रत्येकाने या वर्तमानाची गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.किर्लोस्करवाडी येथील ग्रामपंचायत सभागृहात होत असलेल्या या व्याख्यानास मोठ्या संख्येने लोकांची उपस्थिती होती. मारुती शिरतोडे यांनी आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post