प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
" प्रतीत होत असलेलं सत्य आणि सौंदर्य बेडरपणे व्यक्त करणे आणि तसं करताना कायदेकानू वगैरे आडवे येत असतील तर ते मोडणं हीच लेखकाची कमिटमेंट. आणि हे सारं करताना त्यांन स्वतःच्या लाभाचा विचार करता कामा नये. स्वार्थ नसला की शान येते." असे लेखकाच्या बांधिलकीबद्दल ठाम मत व्यक्त करणाऱ्या ज्ञानतपस्विनी दुर्गा भागवत यांचा १० फेब्रुवारी हा जन्मदिन. त्यांचा जन्म १० फेब्रुवारी १९१० रोजी इंदूरमध्ये झाला. आणि ७ मे २००२ रोजी त्या कालवश झाल्या. दुर्गा भागवत यांची ओळख आणीबाणी विरोधात विचार आणि लेखन स्वातंत्र्याच्या बाजूने ठामपणे उभा राहणाऱ्या लढाऊ लेखिका म्हणून तर आहेच आहे. तसेच लोकसाहित्य ,समाजशास्त्र ,बौद्ध वांग्मय आदींच्या ख्यातनाम अभ्यासक ,ललित लेखिका म्हणूनही त्यांचें मोठे कार्य आहे. दुर्गा भागवतया बहुभाषाकोविद होत्या.त्यांना संस्कृत, मराठी, प्राकृत, पाली अर्धमागधी,छत्तीसगढी, गोंडी, गुजराती, फ्रेंच, जर्मन, हिंदी अनेक भाषा येत होत्या.त्यांनी एक ठिकाणी म्हटले आहे की ," मला हवी असलेली माहिती अमुक ग्रंथात मिळेल असे मला कळले आणि त्या ग्रंथाची भाषा जर मला येत नसेल तर ती मी प्रयत्नपूर्वक शिकून घेते, समजून घेते,मग सगळे वाचून काढते ,त्यावर खूप चिंतन मनन करते. " हे वाचल्यावर संशोधनासाठी, व्यासंगासाठी त्या किती कष्ट घेत होत्या हे दिसून येते आणि आपोआपच नतमस्तक व्हायला होते.
नगर,धारवाड ,नाशिक ,पुणे अशा विविध शहरात प्राथमिक, माध्यमिक शिक्षण घेऊन त्यांनी मुंबईत पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण घेतले .दुर्गाबईनी मराठी आणि इंग्रजीतून प्रामुख्याने प्रचंड लेखन केले. त्यांची शंभरावर पुस्तके प्रसिद्ध आहेत. त्यांच्या लेखनातील विविधता आणि विद्वत्ता अफलातून आहे.जबरदस्त ज्ञानलालसा आणि प्रचंड अनुभवसंपन्नता यामुळे त्यांचे लेखन वेगळ्या जातकुळीचे ठरते. त्यांच्या ललित लेखनाने मराठी लघु निबंधाचे स्वरूप बदलून टाकले. लघुनिबंधात वास्तवता, अनुभव संपन्नता चैतन्यताआणण्याचे श्रेय त्यांच्याकडे जाते.यांच्या' पैस 'या ललित लेखांच्या पुस्तकाला १९७० साली साहित्य अकादमीचे पारितोषिक मिळाले होते. या पुस्तकाच्या पहिल्याच लेखात त्यांनी आपल्या लेखन निर्मितीची प्रक्रिया उडून दाखवलेली आहे.या संग्रहाबाबत असे म्हटले गेले आहे की, " पैस मधील विविध लेखातून वारकरी पंथ,बौद्ध धर्म , ख्रीश्चन धर्म, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक स्थळांविषयीच्या आख्यायिका,साहित्याचे संदर्भ ,मानवी मन, मानवी भावबंद याविषयीची निरीक्षणे असे अथांग मुक्तचिंतन प्रसरण पावत जाताना दिसते. दुर्गाबाईना असणारे जीवनाच्या गुढतेबद्दलचे कुतूहल, त्यांचा व्यासंग , निसर्गाविषयीची ओढ , रसिकता ,लोकसाहित्य आणि लोक परंपरा याविषयीची जाण या साऱ्या गोष्टींचा विलक्षण मेळ या ललित लेखात दिसतो. त्यांची प्रसन्न ,भारदस्त ,डौलदार भाषाशैली त्यातील काव्यात्मकता ,सर्वच लेखातून प्रतिबिंबित होणारी चिंतनशील वृत्ती यामुळे या ललित लेखनाला एक वेगळे पोत लाभलेले आहे. अर्थात दुर्गाबाईंच्या ऋतुचक्र, व्यास्पपर्व,भावमुद्रा, डूब आदी ललित लेखांच्या पुस्तकांतून आणि लोकसाहित्याची रूपरेषा, शासन साहित्य आणि बांधिलकी, मुक्ता, जनतेचा सवाल आदी वैचारिक निबंधांच्या पुस्तकातून ,विविध अनुवादातून आणि भाषांतरातून त्यांचे हे वेगळेपण स्पष्ट होते.
लोकसाहीत्याची रूपरेषा हा त्यांचा अतिशय महत्त्वाचा ग्रंथ आहे .त्यांनी भारतातील विविध भाषेतील, प्रदेशातील लोककथा मराठीत आणल्या. भाषाविषयक यांची भूमिका अतिशय व्यापक होती.तसेच भाषांतरही त्यांना महत्त्वाचे वाटत होते .म्हणून तर त्यांनी हेन्री डेव्हिड थोरोच्या पुस्तकापासून बाणाच्या कादंबरीपर्यंत आणि सिद्धार्थ जातकाच्या सात खंडापासून अनेक लोककथांचे समर्थपणे. मराठी अनुवाद केले .त्यांचे हे काम फार महत्त्वाचे होते आणि आहे.
लेखकाच्या स्वातंत्र्याबाबत त्या ठाम होत्या. त्यांचे सामाजिक भान मोठे लक्षणीय होते. नैतिक मूल्यांवर अपार श्रद्धा आणि स्वातंत्र्यावर प्रखर निष्ठा असल्यामुळे त्यांनी आणीबाणीविरोधात आवाज उठवला.तुरूंग वासही पत्करला होता.जीवनातील विसंवादावर भाष्य करता येण्यासाठी लेखकांना मुक्त विचारस्वातंत्र्याची गरज असते. हे त्यांनी ठामपणे मांडले. त्या म्हणाल्या होत्या, " स्वतःच्या इमानाला जपणाऱ्या विचारवंतांची संभावना लोकांचा पाठिंबा नसलेल्या मुठभर विद्वानांना विचारतो कोण ? अशा उपहासाने केली जात असली तरी या मूठभरांचाच वचक सत्ताधाऱ्यांना वाटतो म्हणूनच त्यांच्यावर सेन्सॉर शिपची कडक नियंत्रणे आणली जातात." विचार -लेखन स्वातंत्र्यासाठी बर्तोल्ड रसेल या जगप्रसिद्ध तत्त्वचिंतकाने उतारवयात तुरुंगवास भोगला. कार्ल मार्क्सने स्वतःच्या मायभूमीतून झालेली स्वतःची हकालपट्टी सहन केली. अर्थात अनेकांनी यासाठी देहदंडाच्या शिक्षेपासून भ्याडांचा गोळीबारही सहन केलेला आहे. म्हणूनच प्रत्येक लेखकाने आपले स्वातंत्र्य कमावता कामा नये.
आणीबाणीचा निषेध आणि मुक्त विचारांची गरज त्यानी स्पष्ट केली होती. त्याचे महत्त्व आजही फार आहे.कारण आज विचार मांडणाऱ्या आणि लिहिणाऱ्यांवर हल्ले होताना दिसत आहेत.अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा गळा धटिंगणशाहीने घोटला जाण्याचे प्रकार वाढत आहेत. माध्यमांवर आणि लेखकांवर हल्ले होत आहेत.दुर्गाबाईंनी आणीबाणीला मरणासमान परिस्थिती असे संबोधले होते.आपण मेलो आहोत असे समजूनच आपल्याला न्याय्य वाटते ते बोलून,-करूनच परिस्थितीचे आव्हान का स्वीकारू नये ? या परिस्थितीत जगण्यासाठी काही राहिलेली नाही मग भ्यायचे कशाला ? असा रोकडा सवाल त्यांनी केला होता.म्हणूनच त्यांनी मोठ्या आवेशपूर्णतेने आणि तीव्रतेने लेखनावरच्या बंधनाचा धिक्कार केला होता. मुक्त विचार ही एक श्रेष्ठ आणि पवित्र शक्ती आहे असे स्पष्ट करून त्या म्हणाल्या की कोणत्याही बंधनाने बांधले जाणे हे सर्वस्वी त्याज्यच समजले पाहिजे.
सत्ताधीशांनी निर्माण केलेल्या शृंखला या अखेर सर्वंकष ठरतात. प्रथम प्रेमबंधन म्हणून स्वीकारल्या तरी त्या जाचक ठरतात. कालांतराने हे बंधन विनाशबंधन ठरते. म्हणून बुद्धिमंतानी आणि पंडितांनी प्रेमबंध म्हणून सुद्धा या शृंखला स्वीकार नयेत .लेखनावर एकदा बंधन आले की लेखन मरते. लेखन मेले की विचार मरतो.आणि विचार मेले की संस्कृती धोक्यात येते आणि विकृतीला प्रारंभ होतो. म्हणून सामाजिक आणि सांस्कृतिक आरोग्यासाठी विचार, मुक्त विचार हे अपरिहार्य आहेत. पिनल कोड प्रमाणे साहित्याला नियमबद्ध करणे नुसते हास्यास्पद नव्हे तर धोकादायक असते हे त्यांनी स्पष्टपणे बजावलेले होते.
अशा या स्वातंत्र्यासाठी झटणाऱ्या लेखिकेने भरतकाम,विणकाम, पाककला, वन्यजीवन, प्राणीजीवन,वनस्पतीशास्त्र असे विविध विषयांमध्ये मूलभूत स्वरूपाचे लेखन केले आहे. साहित्य आणि वाचकांविषयी त्यांची ठाम भूमिका होती. त्या म्हणाल्या होत्या साहित्यातल्या आशयाला असणारे अनेक स्तर, अनेक पदर ,त्याची अनेकविध स्पंदने वाचकाशी त्याच्या त्याच्या भाषेत ,त्याच्या त्याच्या भावनात बोलत असतात. त्याला सजाण करत असतात. त्याला आतून घडवतात.लेखकाची भूमिका विचारवंतापेक्षा आणि कलावंतापेक्षा रंजकाची होऊ लागली आहे त्याचा त्यांना विषाद वाटत असे. आज तर ते फार प्रकर्षाने दिसू लागले आहे. पन्नास वर्षांपूर्वी त्यांनी नोंदवलेले हे निरीक्षण ध्यानात घेतले की त्यांचे द्रष्टेपण लक्षात येते.
त्या म्हणाल्या होत्या आता लेखकांच्या पुस्तकांपेक्षाही रेडिओ, टीव्ही, आणि वर्तमानपत्र यातून होणारे त्याचे दर्शन अधिक महत्त्वाचे गणले जाऊ लागले आहे .ही सार्वजनिक माध्यमे आहेत .त्याचे तंत्र लेखकाला आत्मसात करायला लावित आहेत.तात्काळ धनप्राप्ती, प्रसिद्धी आणि प्रसार यांना लेखकही वश होतो आहे. आणि निखळ लेखनाचे जुने तंत्र ठेवून तो इतर प्रसंगही त्या तंत्राच्या चौकटीतच फार खोलवर न जाता, त्याच्या विषयाच्या व आशयाच्या मर्यादा, जणू त्याच दूरवर परिणाम करणाऱ्या आहेत असा समाज करून घेतो आहे.व चुरचुरीत भाषा, थोडी करुणा ,थोडा विनोद, माहितीचे अपुरे तुकडे वगैरेंचा रंगीत आकृतीबंध निर्माण करून लोकांचे रंजन करतो आहे. अशी ठाम वैचारिक मते असलेल्या आणि बहुविधता व विद्वतेचे दुर्मिळ उदाहरण असलेल्या दुर्गाबाई म्हणायच्या 'मी उभ्या आयुष्यात जर खरोखरी कुठला काळ एन्जॉय केला असेल तर ते सध्याचे म्हातारपण '. या प्रतिभासंपन्न वास्तववादी थोर विदुषीला विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)