२६ जुगारी ताब्यात, लाखोंची रोकड आलिशान गाड्या जप्त.
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील आहे
कर्जत शहरात फार्महाऊसवर सुरू असलेल्या एका जुगार अड्डय़ावर पोलिसांनी धाड टाकून जुगार खेळणाऱ्या तब्बल २६ जणांवर गुन्हे दाखल केले आहे. तर या धाडी दरम्यान पोलिसांनी नऊ लाखांची रोकड जप्त केली असून धाडीत सहा गाड्या असा एकूण ४५ लाख रुपयांचा ऐवज ताब्यात घेण्यात आला आहे. जुगार खेळणारे सर्वजण हे मुंबई ,ठाणे ,पुणे ,गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून त्याना पोलिसांनी रात्री सोडून दिले असून सोमवारी कोर्टात हजर करणार असल्याचे सांगितले आहे .
पोलीस सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार रविवार दिनांक ४ फेब्रुवारी रोजी पहाटे अडीच वाजण्याच्या सुमारास कर्जत नानामास्तर नगर येथील ककु फार्म हाउस येथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी या ठिकाणी पहाटेच्या सुमारास धाड टाकली असता तिथे मोठ्या प्रमाणात जुगार सुरू असल्याचे दिसून आले. पोलिसांची धाड पडल्यानंतर तिथे जुगार खेळत असणारे काहीजण पळून जाण्यात यशस्वी झाले तर एकूण सव्वीस जणांना पोलिसांनी ताब्यात घेवून प्रतिबंधात्मक नोटीस देवून सोडण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे .यावेळी पोलिसांनी नऊ लाख अठरा हज़ार एकशे सत्तरा रुपये रोकड तर सहा मोठ्या गाड्या जप्त केल्या असून ऐकून ४५ लाख रुपये एवढा ऐवज पोलिसांनी ताब्यात घेतला. प्रामुख्याने कारवाई करण्यात आलेले आरोपी हे मुंबई ,ठाणे ,पुणे ,गुजरात येथील उच्चभ्रू सोसायटीतील राहणारे असून ते जुगार खेळण्यासाठी म्हणून कर्जत येथे आले होते. कर्जतमध्ये मोठ्या जुगाराची कुणकुण पोलिसांना लागली होती. त्यामुळे गुप्त बातमीदारांमार्फत पोलिसांनी माहिती गोळा करत धडक कारवाई केली आहे.
दरम्यान कर्जत पोलिसांनी टाकलेल्या या धाडीच्या ठिकाणी कर्जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेंद्र गरड यांनी भेट दिली असून पुढील तपास महिला पोलीस उपनिरीक्षक संगीत गावडे ह्या करत आहेत. तर कर्जत पोलिसांनी टाकलेल्या या धाडीत मोठा मुद्देमाल मिळाल्याने यावरून कर्जत शहरात एवढा मोठा जुगार खेळला जात असल्याचे समोर आल्याने शहरात चर्चाना उधाण आले आहे.