घोडावत विद्यापीठात 'भारत @2047' व्याख्यानाचे आयोजन
प्रेस मीडिया लाईव्ह :
पश्चिम महाराष्ट्र प्रतिनिधी : भरत शिंदे
अतिग्रे: येणाऱ्या काळात भारताचे भविष्य हे युवकांच्या हातामध्ये आहे. देशाला विकसित भारत बनवायचा असेल तर युवकांनी अपार कष्ट करणे गरजेचे आहे. देश उभा राहतो ते बुद्धिमान आणि नाविन्याचा शोध घेणाऱ्या युवकांमुळे असे उद्गार ज्येष्ठ विचारवंत,माजी संपादक डॉ.उदय निरगुडकर यांनी काढले.
संजय घोडावत विद्यापीठात आयोजित भारत @२०४७ या विषयावरील व्याख्यानात ते बोलत होते. डॉ.निरगुडकर पुढे म्हणाले, विद्यार्थ्यांनी सातत्याने नाविन्याचा शोध घ्यायला हवा त्यासाठी दृष्टी विकसित करायला हवी.स्वतःची स्पर्धा ही आपल्या सोबत असणाऱ्या बरोबर नसून ती जगातील इतर विद्यार्थ्यांबरोबर आहे. त्यासाठी कोणत्याही परिस्थितीची तक्रार न करता सकारात्मक ऊर्जेने काम करा.नव माध्यमाचा उपयोग करून विद्यार्थ्यांनी सामाजिक जाणीव ठेवून स्वतःची वेगळी ओळख निर्माण करावी तरच देश प्रगतीपथावर जाईल. यावेळी त्यांनी काही विद्यार्थ्यांचे youtube वरील सामाजिक व उद्योजकता विषयक प्रेरणादायी व्हिडिओ दाखविले.
कार्यक्रमाचे अध्यक्ष विश्वस्त विनायक भोसले यांनी आपल्या मनोगतात येणाऱ्या काळात विद्यार्थ्यांसमोरील आणि संस्थाचालकांसमोरील आव्हाने काय असणार आहेत याची जाणीव करून दिली. संजय घोडावत यांच्या दूरदृष्टीमुळे निर्माण झालेल्या या शैक्षणिक संस्थेचा उद्देश विद्यार्थ्यांना जागतिक पातळीवरील कौशल्य देण्याचा आहे असा उल्लेख हि केला.
कार्यक्रमाची प्रस्तावना कुलसचिव डॉ. विवेक कायंदे यांनी केली. यावेळी कुलगुरू प्रोफेसर उद्धव भोसले, महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, सदस्य रमेश आरवाडे, शिवाजी विद्यापीठ सिनेट सदस्य विशाल गायकवाड, सर्व डीन, प्राध्यापक, विद्यार्थी उपस्थित होते.सूत्रसंचालन व आभार जयप्रकाश पाटील यांनी मानले.