प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील
केंद्र सरकारने नुकताच मोटार वाहन कायदा हा पारित केला आहे. पण याच कायद्यामुळे आता राज्यासह देशभरात कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालं आहे.कारण याच कायद्याला विरोध करण्यासाठी रस्त्यावर उतरलेल्या ट्रक चालकांनी नवी मुंबईत थेट पोलिसांना बेदम मारहाण केल्याची धक्कादायक घटना नुकतीच समोर आली आहे.
केंद्र सरकारने नुकताच नवा मोटार वाहन कायदा हा पारित केला आहे. ज्यामध्ये हिट अँड रनला (Hit And Run Law) आळा बसावा यासाठी अत्यंत कठोर अशा तरतुदी करण्यात आल्या आहेत. याच कायद्याला विरोध म्हणून महाराष्ट्रासह देशभरातील ट्रकचालक हे आजपासून (1 जानेवारी) संपावर गेले आहेत. पुढील तीन दिवसांसाठी हा संप पुकारण्यात आला आहे. त्यामुळे ट्रक चालक हे रस्त्यावर उतरले आहेत आणि त्यांनी ठिकठिकाणी रस्ता-रोको देखील केला आहे.
नवी मुंबईतील उलवे येथे बेलापूर महामार्गावर हा रस्ता रोको करण्यात आला होता. यावेळी रस्त्यावर उतरलेले ट्रक चालक हे फारच आक्रमक झाल्याचं यावेळी पाहायला मिळालं. या ट्रक चालकांनी थेट पोलिसांवर हल्ला चढवत त्यांना बेदम मारहाण केल्याचं पाहायला मिळत आहे.
यावेळी काही आंदोलक थेट पोलिसांना ठार मारा अशा प्रकारची भाषा करत असल्याचंही आता समोर आलं आहे. त्यामुळे नवी मुंबई हायवे परिसरातील वातावरण हे चिघळलं असून अनेक ठिकाणी ट्रॅफिक देखील जाम झालं आहे. उलवे नवी मुंबईतील बेलापूर महामार्ग रोखण्याचा ट्रक चालकांनी प्रयत्न केला. ज्यानंतर एनआरआय पोलिसांनी शेकडो ट्रक चालकांना ताब्यात घेतले. तर काही ट्रक चालकांनी पनवेल-सायन महामार्ग रोखला असल्याने प्रचंड मोठी वाहतूक कोंडी झाली आहे.
केंद्र सरकारने जो नवा मोटर वाहन कायदा पारित केला आहे त्या विरोधात हे आंदोलन करण्यात येत होतं. ज्याला हिंसक वळण लागलं आहे. केवळ नवी मुंबईतच नव्हे तर संपूर्ण देशभरात आता अशाप्रकारचे हिंसक आंदोलन होत असल्याचं सध्या पाहायला मिळत आहे.
बेलापूर हायवे ट्रक चालकांनी रोखल्यानंतर काही पोलिसांनी येथे येऊन ट्रक चालकांची समजूत घालत वाहतूक सुरळीत करण्याचा प्रयत्न केला. मात्र, यावेळी ट्रक चालक काहीही ऐकून घेण्याच्या मनस्थितीत नव्हते. त्यामुळे या ट्रक चालकांना ताब्यात घेण्याचा जेव्हा पोलिसांनी प्रयत्न केला तेव्हा त्यांनी थेट पोलिसांनाच लाकडी दांड्याने मारहाण करण्यास सुरुवात केली.
जाणून घ्या काय आहे नवीन हिट अँड रन कायदा
हिट अँड रन प्रकरणाबाबत आधीच कायदा आहे पण आता केंद्र सरकारने नवा कायदा आणला आहे. आतापर्यंत हिट अँड रनमध्ये चालकाला पोलिस ठाण्यातून जामीन मिळायचा. तसेच या संबंधित गुन्हा सिद्ध झाल्यास दोषीला केवळ दोन वर्षांच्या कारावासाचीही तरतूद होती.
मात्र, आता नवीन मोटार वाहन कायद्यानुसार, हिट अँड रन प्रकरणातील दोषीला जास्तीत जास्त 10 वर्षांच्या शिक्षा आणि तब्बल 7 लाख रुपये दंड ठोठावण्याची तरतूद आहे. याच दोन तरतुदींमुळे आता ट्रक चालक हे आक्रमक झाले आहेत.