आपण निर्धार केल्यास कोणीही राज्यघटना बदलू शकत नाही

ज्येष्ठ विचारवंत डॉ. अशोक चौसाळकर यांचे प्रबोधन शिबिरात प्रतिपादन


प्रेस मीडिया लाईव्ह :

शिरोळ/ प्रतिनिधी:

    धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा, एकत्रित लढा देण्याचा इतिहास हा खरा स्वातंत्र्याचा इतिहास आहे. राज्यघटना समजावून घेऊन ती टिकवून ठेवणे व त्याची अंमलबजावणी करणे हे पुढील पिढीची जबाबदारी आहे. स्वातंत्र्य चळवळीचा इतिहास आणि मूल्ये ही राज्यघटना निर्मिती करीत असताना लाभलेली आहेत. उदारमतवादी लोकशाही, सामाजिक न्यायाचा विचार आणि धर्मनिरपेक्ष राष्ट्रवादाचा विचार हा राजघटनेतून करण्यात आला आहे. अनेक देशात राज्यघटना बदलल्या पण भारतात नाही. त्यामुळे आम्ही निर्धार केला तर कोणीही राज्यघटना बदलू शकत नाही, असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत व समाजवादी प्रबोधिनीचे अध्यक्ष डॉ. अशोक चौसाळकर यांनी केले. 

     भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाची सांगता आणि भारतीय संविधानाच्या अमृत महोत्सवी वर्षारंभानिमित्त डॉ. आप्पासाहेब उर्फ सा. रे. पाटील सोशल फाउंडेशन आणि समाजवादी प्रबोधिनी यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्रबोधन शिबिरामध्ये 'भारतीय स्वातंत्र्यलढा व राज्यघटना' याविषयावर ते बोलत होते. शिबिराच्या अध्यक्षस्थानी साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ होते. प्रारंभी कालवश सा. रे. पाटील यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला व दीपप्रज्वलन कऱण्यातआले. या शिबिराचे स्वागताध्यक्ष उद्यानपंडित गणपतराव पाटील यांनी सर्वांचे स्वागत केले. समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी शिबिराच्या आयोजनामागील भूमिका स्पष्ट केली.

             १८५७ ते १९४७ या काळातील स्वातंत्र्य लढ्यातील विविध टप्पे, विविध सूत्रे, वैशिष्ट्ये आणि चळवळ यांचा आढावा घेऊन डॉ. अशोक चौसाळकर म्हणाले, महात्मा गांधीजींचे जीवन एक महाकाव्य असून ते त्याचे महानायक आहेत. त्यांनी लोकांची असामान्य चळवळ उभी करून देशाला स्वातंत्र्य मिळवून दिले. याचा आदर्श तिसऱ्या जगातील अनेक देशांनी घेऊन तेही स्वतंत्र झाले. भारतीय स्वातंत्र्यलढा ही जगातील अनेक देशांच्या स्वातंत्र्यलढ्याची गुरुकिल्ली आहे. भारत आणि पाकिस्तानच्या फाळणीला महात्मा गांधी व नेहरू हे जबाबदार नसून ब्रिटिश साम्राज्यवाद्यांनी फाळणी केली आहे. फाळणी वेळी ब्रिटिशांनी प्रशासन कार्यक्षम न केल्यानेच मोठ्या प्रमाणात हत्याकांड घडले होते असे सांगून त्यांनी दिडशे वर्षांचा स्वातंत्र्यलढा व राज्यघटना याबाबत सुसूत्र व अभ्यासपूर्ण मांडणी केली.

     दुसऱ्या सत्रात 'स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व संविधान' या विषयावर बोलताना सोलापूरचे अप्पर जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे म्हणाले, नोकरशाही मधील नोकर ज्यावेळी आपल्याला आपल्या समाजाचा, आपल्या जातीचा आहे असे वाटतो, त्यावेळी लोकशाहीचा पराभव झाला असे म्हणावे लागेल. त्यामुळे नोकरशाहीवर संविधान जपण्याची मोठी जबाबदारी आली आहे. अधिकाऱ्यांचे चरित्र, सामाजिक बांधिलकी, कार्यक्षमता न पाहता त्यांची 'जात' पाहिली जाते. त्यामुळे जात ही समाजमनावर परिणाम करत आहे. व्यक्तीची प्रतिष्ठा निर्माण करणे व ती प्रतिष्ठा कायम ठेवण्यासाठी संविधानातील मूल्ये आवश्यक आहेत. रोजगार, सामाजिक, राजकीय संदर्भ बदलले असून ती पुन्हा प्रस्तावित करावी लागतील. यासाठी विचार मंथनातून प्रत्यक्ष कृती कार्यक्रम करण्यावर भर दिला पाहिजे.

     तिसऱ्या सत्रामध्ये 'युवकांची जबाबदारी व कर्तव्ये' या विषयावर बोलताना ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे म्हणाले, लोकांनी विचार करू नये असे व्यवस्थेला नेहमीच वाटते. तंत्रज्ञान, बाजारपेठ आणि राजकारण बदलल्यामुळे तरुणांना काय करायचे आहे हे कळालेले नाही. भारतातील लोकांचे विचार बदलवून सामाजिक सलोखा संपविणारा विकास आपल्या कामाचा नाही. सध्याचा काळ अतिशय कठीण असून आपण सर्वजण सोबत राहणे गरजेचे आहे. आम्हाला आपल्या समोरील आव्हाने कळली पाहिजेत, त्याच्यावर विचार करायला आपण शिकले पाहिजे. व्यवस्था सुखी करणे हे आपले काम आहे. आपण सजग भारतीय नागरिक म्हणून विचारपूर्वक आम्हाला व्यवस्थेला जाब विचारता आला पाहिजे.

      अध्यक्षीय मनोगतात विनोद शिरसाठ म्हणाले, प्रशिक्षण शिबिरातून सर्वच प्रश्नांची उत्तरे मिळतील असे होणार नाहीत, पण अनेक प्रश्न निर्माण होतील हाच शिबिराचा उद्देश असतो. गणपतराव पाटील यांनी प्रबोधन शिबिर आयोजित करून समाजामध्ये नवी जागृती निर्माण करण्याबरोबरच तरुण पिढीलाही स्पर्धा परीक्षेचे मार्गदर्शन व्हावे हा उद्देश ठेवल्याने शिबिराबाबतची भूमिका यशस्वी ठरली आहे. अशा प्रकारचे शिबिर झाल्यास वैचारिक कक्षा रुंदावण्यास मदत होईल.

      प्रत्येक वर्षी २६ जानेवारी निमित्त फाउंडेशन व समाजवादी प्रबोधिनीच्या वतीने प्रबोधन शिबिर घेण्याची घोषणा यावेळी गणपतराव पाटील यांनी केली. ज्येष्ठ संपादक दशरथ पारेकर, आदर्श पाटील, प्रीती पाटील यांनी मनोगत व्यक्त केले. सर्वांचा सत्कार करण्यात आला. या शिबिराचे सूत्रसंचालन संजय सुतार यांनी केले तर आभार संजय गुरव यांनी मानले. यावेळी  डॉ. भालबा विभुते, प्राचार्य डॉ. टी. एस. पाटील, शशांक बावचकर, पुणे कमिशनर वैशाली पतंगे, दत्त कारखाना कार्यकारी संचालक एम. व्ही. पाटील, सचिव अशोक शिंदे, दादा काळे, शिरोळचे मुख्याधिकारी प्रचंडराव, सुनील इनामदार, शेखर पाटील, प्रा. मोहन पाटील, महेंद्र बागे, यांच्यासह दत्त कारखान्याचे संचालक, अधिकारी तसेच फाउंडेशनचे आणि समाजवादी प्रबोधिनीचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post