नाण्याचा माळ शाळा वर्गखोली विनाच, वर्गखोलीसाठी शिक्षकांसह स्थानिकांचे प्रयत्न
प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी : सुनील पाटील
शिक्षण हे वाघिणीचे दूध आहे....हे भारतरत्न बाबासाहेब आंबेडकर यांचे वाक्य. याच वाक्यनुसार शिक्षणाचे महत्व विशद होऊन आज शिक्षणासाठी पालक आग्रही असल्याचे सकारात्मक चित्र आहे. मात्र आजही डोंगर दुर्गम भागातील विद्यार्थ्यांची वाट बिकट आहे. कर्जत तालुक्यातील दुर्गम भागात असलेल्या नाण्याचा माळ येथे शाळा आहे. हि शाळा भरते देखील मात्र ती कधी एका घरात, कधी घराच्या ओसरीवर तर झाडाखाली मोकळ्या आभाळाच्या छताखाली. प्रगत महाराष्ट्रात आजही अशा स्थितीत येथील विद्यार्थी शिक्षणाचे धडे गिरवत आहेत. ही बाब देशाच्या स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करणाऱ्यांच्या डोळ्यात जळजळीत अंजन टाकणारी आहेच. दरम्यान याठिकाणी विद्यार्थ्याना शिकण्यासाठी वर्गखोली मिळावी यासाठी शिक्षकांसह स्थानिक प्रयत्न करत आहेत.
कर्जत तालुका हा आदिवासी बहुल तालुका म्हणूनही ओळखला जातो. या तालुक्यात डोंगर दुर्गम भाग मोठ्या प्रमाणात असून आदिवासी समाजाची वस्ती देखील मोठी आहे. तालुक्यात जगप्रसिद्ध थंड हवेचे ठिकाण असलेले माथेरान देखील आहे. तर याच माथेरानच्या डोंगरदऱ्यात अनेक आदिवासी वाड्या वस्त्या आहेत. जुमापट्टी पासून आतमध्ये धनगरवाडा, बेकरेवाडी, आसलवाडी, नाण्याचामाळ, मण्याचा माळ, धनगरवाडा, बोरीचीवाडी, भुतीवलीवाडी, सागाचीवाडी, पाली, धनगरवाडा, चिंचवाडी, आषाणेवाडी व किरवलीवाडी सह आदि आदिवासी वाडया वस्त्या या स्वातंत्र्यपूर्व काळापासून वसलेल्या आहेत. या वाड्यांमध्ये रस्त्याचा प्रश्न गंभीर आहेच. मात्र याठिकाणी असलेल्या नाण्याचा माळ, मण्याचा माळ धनगरवाडा या वाड्यांसाठी २०१० साली रायगड जिल्हा परिषदेची शाळा मंजूर झाली होती. त्यानुसार हि शाळा सुरु देखील झाली मात्र आजवर हि शाळा येथील बाबू आखाडे यांच्या घरात भरत आहे. मात्र आखाडेकडे पाहुणे आले कि हि शाळा घरातून त्यांच्या ओसरीवर किंवा बाजूच्या झाडाखाली भरते. दरम्यान २०१२ साली या शाळेसाठी ग्रॅण्ट मंजूर होत शाळेसाठी इमारत मंजूर झाली होती मात्र वनविभागाची अडचण निर्माण झाल्याने वर्गखोल्या उभ्या राहिल्याच नाहीत. मुळात हा भाग सह्याद्रीच्या डोंगररांगेत असल्याने जंगलात वसलेला आहे. तर आता नाण्याचा माळ शाळेत एकूण १ ली ते ४ थी वर्ग भरत असून एकूण १६ विद्यार्थी पटसंख्या आहे. तर येथे शशिकांत ठाकरे मुख्याध्यापक व अंबादास देवफळे हे शिक्षक म्हणून कार्यरत आहेत. त्यांच्याकडून देखील विद्यार्थ्यांसाठी वर्ग खोल्या उभ्या राहण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
दरम्यान या भागात ४० च्या आसपास घरे असून सुमारे १२० लोकसंख्या आहे. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे लोटली. तर या स्वातंत्र्यासाठी याच भूमीतील हुतात्मा भाई कोतवाल, हिराजी पाटील अशा अनेकांनी बलिदान देत त्यांना हौतात्म्य प्राप्त झाले. तेव्हा देशाच्या स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव साजरा केला जात असताना दुसरीकडे देशातील नागरिक शिक्षणासारख्या मूलभूत गोष्टींसाठी संघर्ष करत असल्याचे भयावह चित्र आहे. तेव्हा आता तरी शासन या मुलांच्या शिक्षणासाठी अडथळे दूर करत पायाभूत सुविधा पुरवणार का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
या शाळेला मी नुकतीच भेट देऊन येथील मुलांशी देखील संवाद साधला होता. तर तालुक्यातील हि एकमेव वर्गखोली नसलेली शाळा आहे. त्यामुळे येथे वर्गखोली होण्यासाठी २०१२ साली निधी देखील मंजूर झाला होता. मात्र जागेअभावी शाळा होऊ शकली नाही. मात्र आता येथील शिक्षक हे वर्गखोली होण्यासाठी प्रयत्न करत आहेत. तर स्थानिक देखील त्यांना सहकार्य करत आहेत.
: संतोष दौंड, गटशिक्षणाधिकारी कर्जत पंचायत समिती
याठिकाणी आम्ही जून २०२३ मध्ये रुजू झालो. दुर्गम भागात असलेल्या शाळेत काम करणे खरंच जिकरीचे असले तरी त्यात आम्हाला समाधान मिळते. तर मुलांना शिक्षणासाठी वर्गखोल्या असाव्यात यासाठी आम्ही देखील प्रयत्न करत आहोत.
: शशिकांत ठाकरे, मुख्याध्यापक नाण्याचा माळ राजिप शाळा
हा भाग वनविभागाच्या अखत्यारीत असला तरी मुलांच्या शिक्षणाचा प्रश्न असल्याने वनविभागाला संबंधित प्रशासनाने प्रस्ताव सादर करावेत. त्यावर नक्कीच निर्णय होऊन मुलांच्या शाळेच्या वर्गखोल्यांचा प्रश्न मार्गी लागेल.
: समीर खेडेकर, वनपरिक्षेत्र अधिकारी कर्जत पश्चिम
मुळात शासन आहे का हा प्रश्न आम्हला पडला आहे ? आमच्या या वाडयांना रस्ता नाही आजारी माणसांना झोळी करावी लागते. तर नाण्याचा माळ येथील विद्यार्थ्यांसाठी असलेल्या शाळेला वर्गखोली नाही. वनविभागाची अडचण असली तरी त्यावर शासनाने उपाययोजना केल्यास मार्ग निघू शकतो मात्र इच्छशक्तीचा अभाव आहे. तसेच याठिकाणी रस्ता नसल्याने पावसाळ्यात येथील विद्यार्थी गुडघाभर पाण्यातुन मार्ग काढून जुमापट्टी शाळेत जातात. आदिवासींकडे शासन दुर्लक्ष करत असल्याची खंत वाटते.