पुणे : अंतिम मतदार यादी २२ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार


प्रेस मीडिया लाईव्ह : 

पुणे - मतदार याद्यांच्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाअंतर्गत अंतिम मतदार यादी २२ जानेवारी रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे या यादीनुसार जिल्ह्यातील मतदारांची संख्या ८० लाख ७३ हजार १८३ झाली आहे. त्यामध्ये एकूण पुरुष मतदार ४२ लाख २५ हजार ९१८ तर महिला मतदारांची संख्या ३८ लाख ४६ हजार ७४१ इतकी आहे.

 तृतीय पंथी मतदारांची संख्या ५२४ इतकी आहे. तसेच १८ ते १९ वर्षे वयोगटातील मतदार २६ हजार ५८८ इतके तर १९ ते २९ वर्षे वयोगटातील मतदारांची संख्या ही १२ लाख ३९ हजार ९९० इतकी आहे. जिल्ह्यातील २१ विधानसभा मतदारसंघात सर्वात मोठा मतदारसंघ हा चिंचवड ठरला आहे. या मतदारसंघात ५ लाख ८५ हजार ७३१ मतदार आहेत. तर सर्वात लहान मतदारसंघ हा पुणे कॅन्टोन्मेंट असून या मतदारसंघात २ लाख ७० हजार ९७४ मतदार आहेत. दरम्यान पुणे शहरात आठ विधानसभा मतदारसंघाचा समावेश होत असून शहरात सर्वांत मोठा मतदारसंघ हा हडपसर असून या मतदारसंघात ५ लाख ५१ हजार १५६ मतदार आहेत.

दरम्यान, मतदार यादीवर आलेल्या हरकतींवर सुनावणी घेऊन दावे व हरकती निकाली काढण्याची अंतिम मुदत दि.१२ जानेवारीपर्यंत आहे. त्यानंतर मतदार यादीचे मानांकन तपासणे, अंतिम प्रसिद्धीसाठी आयोगाची परवानगी घेणे, अभिलेख अद्ययावत करणे व पुरवणी याद्यांची छपाई करण्याची दि. १७ जानेवारी २०२४ आणि मतदार यादी अंतिम प्रसिद्धी दि. २२ जानेवारी २०२४ रोजी केली जाणार आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post