प्रेस मीडिया लाईव्ह :
पुण्यातील लक्ष्मी रस्त्यावरील सरपोतदार कुटुंबियांचे पुना गेस्ट हाऊस हे केवळ क्षुधा शांतीचेच नाही, तर ते कला आणि कलाकारांचे हक्काचे आश्रयाचे ठिकाण आहे. मागील ९० वर्षांची मराठमोळ्या खाद्यपदार्थ आणि आदरातिथ्याची परंपरा जपत आजही तितक्याच आदरभावाने पुना गेस्ट हाऊसची सेवा चालू आहे.
केंद्र शासनाने याची दखल घेत पुना गेस्ट हाऊसवरील पोस्ट तिकिट नुकतेच सुरु केले आहे. याबाबत गणेश व राजू गिऱ्हे यांच्या पुढाकाराने मानाच्या तुळशीबाग गणेशोत्सव मंडळाने कृतज्ञता सोहळा आयोजित केला होता. यावेळी ज्येष्ठ पत्रकार श्री विजय कुवळेकर, प्रसिद्ध अभिनेते अजिंक्य देव, PNG ज्वेलर्सचे सौरभ गाडगीळ, अपर पोलीस आयुक्त प्रविण पाटील, मनपाचे उपायुक्त माधव जगताप यांनी पुना गेस्ट हाऊसच्या आठवणी जागवल्या.
आमचे मित्र किशोर सरपोतदार यांनी यावेळी पुना गेस्ट हाऊसला बोलते करताना सरपोतदार कुटबियांच्या चार पिढयांची वाटचाल सांगितली. अनेक गरजू आणि होतकरू कलावंतांचा आधारवड आणि चित्रपटांचा चालता बोलता इतिहास, अशी ख्याती असलेले पुण्यातील प्रसिद्ध पूना गेस्ट हाऊसचे मालक चारुदत्त सरपोतदार तथा चारुकाका हे किशोरजींचे पिताश्री. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या, पुणे शाखा आणि अखिल भारतीय मराठी चित्रपट महामंडळ, अशा दोन महत्त्वाच्या संस्थांचे अध्यक्ष म्हणून ते अनेकवर्षे कार्यरत होते. याच दरम्यान त्यांचे नाट्य आणि चित्रपटसृष्टीतील कलाकारांशी घनिष्ठ संबंध जुळले. पूना गेस्ट हाऊस, हे अनेक कलावंतांचे पुण्यातील हक्काचे घर होते. कलावंतांसाठी या वास्तूचे दरवाजे दिवस-रात्र उघडे असायचे. अनेक कलाकारांच्या पडत्या काळामध्ये चारूकाकांनी त्यांना आधार दिला. पानशेत धरण फुटल्याने पुण्यातील जनजीवन विस्कळीत झाले होते. त्यावेळी तेथे अक्षरश: गर्दीने हॉटेल भरले होते. चारूकाका मात्र भाकरी आणि बेसन करुन रात्रभर लोकांना जेवायला घालत होते अशी आठवण आजही वडिलधारे पुणेकर काढत असतात.
सरपोतदार कुटुंबियांचे भाग्यविधाते स्व.नानासाहेब सरपोतदार रत्नागिरीतल्या छोटया गावांतून कलेच्या प्रेमापोटी पुण्याला आले. त्यांनी आयर्न फिल्म स्टुडियोच्या माध्यमातून ५० पेक्षा जास्त मूकपटांची निर्मिती करताना लेखक व दिग्दर्शकाच्या जबाबदाऱ्या पण एकाच वेळी निभावल्या. या जोडीला चारितार्थासाठी त्यांनी सुरु केलेले पूना रिफ्रेशमेंट हाऊस त्यांचे चिरंजीव बंडोपंत यांनी खऱ्या अर्थाने नावारुपाला आणले. बंडोपंत, विश्वास, गजानन आणि चारुकाका या भावंडाची पहिली पसंती चित्रपट माध्यमाला असली, तरी त्यांनी पुना गेस्ट हाऊसच्या रुपांत पुण्याची खाद्यसंस्कृती थेट दिल्ली विधानसभेच्या इमारतीपर्यंत पोहचवली.
हा सारा प्रवास किशोर व अभय बंधूद्वाकडून समजून घेण्याची संधी या आनंदसोहळ्यात सामिल होतांना मिळाली. त्यांना खूप खूप शुभेच्छा.. !
मितेश घट्टे
९ जानेवारी २०२४