नवीन नाटकांमध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे परिसंवादात मान्यवरांचा सुर

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : बदलत्या सामाजिक परिस्थितीचा परिणाम अनेक घटकांवर होत आहे. परिणामी मराठी नाटकांना आज प्रेक्षकांचा प्रतिसाद कमी होत आहे. नाटकं हे अतिशय प्रभावी माध्यम आहे, नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजे, त्यामध्ये आजचे सामजिक बदल प्रतिबिंबित झाले पाहिजे असा सूर आजच्या परिसंवादात उमटला. 

शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाच्या शुभारंभ सोहळ्या निमित्त "नाटक माझ्या चष्म्यातून'' हा परिसंवाद आयोजित करण्यात आला होता. यामध्ये खासदार श्रीनिवास पाटील, सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई, माजी आमदार उल्हासदादा पवार,सामाजिक कार्यकर्ते युवराज शहा, पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे सहभागी झाले होते त्यांच्याशी राजेश दामले यांनी संवाद साधला.

खासदार श्रीनिवास पाटील म्हणाले, मराठी नाटकांना मोठी परंपरा आहे. अनेक नाटकांनी सामजिक परिवर्तनात मोलाची भूमिका बजावली आहे. आज नवीन लेखकांनी नाटकांमध्ये नावीन्यपूर्ण विषय आणले पाहिजेत, त्या शिवाय प्रेक्षक वाढणार नाही.

माजी आमदार उल्हास पवार म्हणाले, मामा वरेरकर यांनी ८० वर्षांपूर्वी आपल्या नाटकातून मांडलेले प्रश्न आजही कायम आहेत. नाटकं हे परिवर्तनाचे माध्यम आहे, त्यात सातत्याने प्रयोग झाले पाहिजे, त्या शिवाय प्रेक्षक पुन्हा नाटकाकडे वळणार नाहीत याचा लेखकांनी विचार केला पाहिजे.

सामजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई म्हणाल्या, मी शाळा, कॉलेज मध्ये असताना अनेक नाटकांमध्ये भूमिका केल्या आहेत. नाटक हे समाजाचा अविभाज्य अंग आहे. 

पुणे ग्रामीण पोलीस सहअधीक्षक मितेश घट्टे म्हणाले, मनोरंजनाबरोबरच सामजिक बदल टिपणारे माध्यम म्हणजे नाटक आहे. माणूसपण आणि माणुसकी जपणारी नाटके लिहिली जावीत.युवराज शहा म्हणाले, मराठी नाटकांनी कायम सामजिक परिवर्तन केले आहे.आजही त्यात चांगले प्रयोग होत आहेत, त्याला आर्थिक पाठबळ मिळाले पाहिजे.

Post a Comment

Previous Post Next Post