प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : डॉ. सिंधुताई सपकाळ या व्यक्ती नव्हत्या त्या संस्था होत्या, व्यक्ती निघून जाते मात्र संस्था कायम राहतात. माई या सर्व आयांची आई होत्या, आलेल्या संकटांवर मात करत समाजोपयोगी होण्याचा संदेश माईंनी दिला, माईंचा हा संदेश अजरामर आहे असे मत ज्येष्ठ शास्त्ज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांनी व्यक्त केले.
अनाथांची माय 'पद्मश्री' डॉ. सौ. सिंधुताई सपकाळ यांच्या दुसऱ्या स्मृती दिननिमित्त आज ( ४ जानेवारी ) रोजी 'यशोदामाई राष्ट्रीय पुरस्कारा'ने श्रीमती. पुष्पाताई नडे संचालिका-महिला व बाल विभाग, 'स्व'-रूपवर्धिनी, पुणे, आणि आम्रपाली उत्कर्ष संघ, नागपूर यांना सन्मानित करण्यात आले यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानावरून डॉ. माशेलकर बोलत होते. यावेळी प्रमूख पाहुणे म्हणून भारती विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. शिवाजीराव कदम उपस्थित होते. माईंच्या कन्या आणि 'सप्तसिंधू' महिला आधार बाल संगोपन व शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा ममता सिंधूताई सपकाळ, दीपक गायकवाड, विनय सपकाळ आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना डॉ. माशेलकर म्हणाले, माईंनी अतिशय पराकोटीच्या जिद्दीतून आपले कार्य केले, माई म्हणजे करुणा हे समीकरण तयार झाले होते आणि अखेर पर्यंत ते कायम होते. याप्रसंगी डॉ. माशेलकर यांनी त्यांच्या आईंच्या स्मृती प्रित्यर्थ एक लाख रुपयांचा धनादेश माई परिवाराकडे सुपूर्त केला.
डॉ. शिवाजीराव कदम म्हणाले, माईं आणि भारती विद्यापीठ यांचे एक अतूट नाते होते, माईंनी प्रत्येक काम हक्काचे सांगितले आणि आम्ही सुद्धा त्याच प्रकारे पूर्ण सहकार्य केले. आज माई आपल्यात नसल्या तरी त्यांचे कार्य माई परिवार अतिशय कष्टाने पुढे नेत आहे, त्यांना भारती विद्यापीठ सदैव सहकार्य करेल असे सांगत डॉ. कदम यांनी माईंच्या आठवणींना उजाळा दिला.
सत्काराला उत्तर देताना आम्रपाली उत्कर्ष संघाचे रामेश्वर भुते यांनी माईंच्या आठवणींना उजाळा देत, त्यांची संस्था मदत घेण्याच्या भूमिके बरोबरच देणारे हात झाली आहे याचे कौतुक केले. तसेच आम्रपाली उत्कर्ष संस्थेची माहिती त्यांनी यावेळी दिली.
पुष्पाताई नडे यांनी सत्काराला उत्तर देताना माईंच्या आठवणींना उजाळा देत स्व रुपवर्धिनी संस्थेची माहिती दिली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना ममता सिंधुताई सपकाळ यांनी पुरस्कार देण्यामागील भावना व्यक्त करताना मुळात निरपेक्ष भावनेने जेव्हा कोणी समाजात काम करत असतं तेव्हा त्या व्यक्तीसाठी आपण आधाराचा हात बनला पाहिजे, हे सर्वांचे कर्तव्यच आहे. यामुळे ती व्यक्ती आणखी चांगलं काम करते. तिच्या हाताला बळ मिळतं. ज्या समाजाने माईंना भरभरून प्रेम केलं आणि माईंना इथवर आणलं आता तोच वसा पुढे नेत आहोत. माईंचा त्याग त्यांच समर्पण त्याचा वारसा जे माई आम्हाला देवून गेल्यात ते आता आम्ही इतरांपर्यंत पोहोचवण्याचे काम करत आहे असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विनया देसाई यांनी केले.