प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे : - पुणे स्थित 'द बिशप्स हायस्कूल, कॅम्प' मधील नववीचा विद्यार्थी सफल मुथा व प्राईड स्कूल, चिंचवड हायस्कूलचा विद्यार्थिनी रिदम मुथा, 'द सिटी, या दोघांनी येल विद्यापीठाच्या सुवर्णमहोत्सवी मॉडेल युनायटेड नेशन्स (YMUN 50) या संयुक्त राष्ट्र संघाच्या प्रतिरूप परिषदेत सहभाग घेत आपली प्रतिभा दाखवली. या परिषदेसाठी या दोघांचीही निवड झाली होती. अमेरिकेमधील न्यू हेवन येथे १८ ते २१ जानेवारी दरम्यान ही परिषद संपन्न झाली.
या परिषदेत सफलने इटलीचे तर रिदमने पॅराग्वेचे प्रतिनिधित्व केले. यांनी आपल्या सादरीकरणात विकसनशील देशांमधील स्थलांतरित महिलांचे शोषण आणि माता मृत्यू यासारख्या मुद्द्यांवर लक्ष केंद्रीत केले होते. बैठकीत चर्चा, वादविवाद, भाषणे आणि ठराव तयार करण्यात मोलाचा सहभाग नोंदवला. तसेच त्यांना जागतिक स्तरावरील विविध प्रश्न व नेत्यांच्या भावनेला खऱ्या अर्थाने आत्मसात करता आल्याची भावना त्यांनी बोलून दाखवली.
या प्रतिरूप परिषदेसाठी ४५ हून अधिक देशांमधून दोन हजारांहून अधिक विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. सफलने "सर्वोत्कृष्ट सादरीकरण व्यवस्थापन" साठी तर रिदमने "उत्साही वक्ता" म्हणून उत्कृष्ट कामगिरी बजावली.
या परिषदेच्या उद्घाटन समारंभात संयुक्त राष्ट्र संघाचे माजी महासचिव बान की-मून यांची उपस्थिती होती. त्यांनी आपल्या भाषणात विद्यार्थ्यांना मौलिक असे मार्गदर्शन केले
या परिषदेचा अनुभव मांडताना, सफल मुथा याने सांगितले की, "उद्घाटन समारंभात माजी संयुक्त राष्ट्र महासचिवांना ऐकणे हा एक अविस्मरणीय अनुभव होता." या परिषदेत जगभरातील विद्यार्थी प्रतिनिधींना भेटण्याची आणि त्यांच्याशी चर्चा करण्याची संधी मिळाली.
तर रिदम हिने सांगितले की, वक्तृत्व, वादविवाद आणि चर्चेदरम्यान वाटाघाटी यामधील आमच्या कौशल्यांचा तिथे गौरव झाला, याचा आनंद आहे. आम्हा दोघांसाठी हा नक्कीच आयुष्यभरातील एकमेवव्दितीय असा अनुभव होता."