प्रेस मीडिया लाईव्ह :
पुणे: आयोध्येत श्री राम लल्लाची प्राण प्रतिष्ठा होत असल्याच्या वेळेचा मुहूर्त साधत एका संवेदनशील विषयावरील मराठी चित्रपटाचा मुहूर्त करण्यात आला. 'ॲड. यशवंत जमादार' असे या मराठी चित्रपटाचे नाव असून एस.के. प्रॉडक्शन च्या बॅनर खाली या चित्रपटाची निर्मिती केली जात आहे. या चित्रपटांचे निर्माते संजय अग्रवाल असून दिग्दर्शनाची धुरा रमेश साहेबराव चौधरी सांभाळत आहेत.
'ॲड. यशवंत जमादार' चित्रपटाच्या मुहूर्त प्रसंगी रमेशचंद्र अग्रवाल यांनी लाल रिबीन कापून उद्घाटन केले, चंद्रकांत ठक्कर यांनी दीप प्रज्वलन तर संजीव अग्रवाल यांनी श्री गणपती आणि श्री राम भगवान यांची पूजा केली तसेच दर्शन ठक्कर यांनी नारळ फोडून पूजा संपन्न केली.यावेळी लेखक संजय नवगिरे, डिओपी आणि संकलक सिद्धेश मोरे, संगीतकार अजित परब, प्रोजेक्ट हेड अमर लष्कर,गीतकार मंदार चोळकर ,अभिनेते मकरंद देशपांडे उपस्थित होते. 'ॲड. यशवंत जमादार' या चित्रपटात अभिनेते मकरंद देशपांडे, ऋषिकेश जोशी, भारत गणेशपुरे, कैलास वाघमारे, अभिनेत्री सायली संजीव, विशाखा सुभेदार, प्रतीक्षा जाधव, शिवाली परब, अनुष्का पिंपुटकर, प्राजक्ता हनमघर यांच्या प्रमुख भूमिका आहेत.
या प्रसंगी बोलताना चंद्रकांत ठक्कर म्हणाले, 'ॲड. यशवंत जमादार' या मराठी चित्रपटात आज समाजात अत्यंत संवेदनशील असलेला विषय आम्ही हाताळला आहे. लग्न संस्था ही आपल्या भारतीय रूढी परंपरेमधील अत्यंत महत्वाचा विषय आहे. मात्र अलीकडे बदलत्या सामाजिक, सांस्कृतिक जीवनशैलीचा परिणाम या संस्थेवर होताना दिसतोय. त्याच संबंधीचा विषय अत्यंत खुमासदार विनोदी शैलीत आम्ही प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येत आहोत. समाजाला एका संवेदनशील विषयाची जाणीव करून देण्याचे काम आम्ही 'ॲड.यशवंत जमादार' च्या माध्यमातून करणार आहोत.