पालिकेच्या बेकायदेशीर कारवाईविरुद्ध धरणे आंदोलनाचा इशारा

पुणे शहर छोटे व्यावसायिक, गाळेधारक ,भाडेकरू महासंघ'स्थापन 

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे :अतिक्रमण काढण्याच्या नावाखाली पुणे शहरात चालू असलेल्या पालिकेच्या मनमानी आणि बेकायदेशीर कारवाईच्या विरोधात दाद मागण्यासाठी 'पुणे शहर छोटे व्यावसायिक,गाळेधारक,भाडेकरू महासंघ'स्थापन करण्यात आला असून मनमानी कारवाईच्या विरोधात सर्व पातळ्यांवर दाद मागणार असल्याची माहिती पत्रकार परिषदेत देण्यात आली . 

महासंघाचे निमंत्रक हसीब कलमानी यांच्यासह फिरोझ शेख,डॉ.पायल शाह,अशोक शिरवे,वीणा शाह,तेजस शाह हे प्रतिनिधी या पत्रकार परिषदेला उपस्थित होते. 

महासंघाच्या भूमिकेची पुष्टी करण्यासाठी सॅलिस्बरी पार्क येथील सोसायटीमधील हेतूपूरस्सर झालेल्या , दूजाभाव करणाऱ्या अतिक्रमण तोडणाऱ्या कारवाईची माहिती देखील या पत्रकार परिषदेत दिलीगेली .सॅलिसबरी पार्क मधील मंत्री इस्टेट को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी मध्ये रहिवासी फ्लॅट आणि व्यावसायिक १० गाळे आहेत.त्यात दुकाने,कॅफे,सलून,दवाखाना असे व्यवसाय चालवले जातात. याच इमारतीच्या टेरेस वर काही रहिवाशांनी बेकायदेशीर बांधकाम करून शेड टाकून ८ फ्लॅट तयार करून वापर चालविला आहे.त्याविरोधात गाळेधारकांनी पालिकेच्या क्षेत्रीय कार्यालयाकडे,बांधकाम विभागाकडे  लेखी तक्रारी केल्या.टेरेसवरील बेकायदेशीर फ्लॅट वर कारवाई होण्याऐवजी तक्रार करणाऱ्या गाळेधारकावर अतिक्रमण विभागाने नोटीस न देता,वेळ न देता  कारवाई केली.टेरेस वरील फ्लॅट बांधकामाचे साहित्य खालच्या गाळ्यात येणाऱ्या ग्राहकांवर पडून जीवितहानी होऊ नये म्हणून गाळे धारकांनी तात्पुरत्या शेड बांधल्या होत्या. त्या फुटपाथवर किंवा रस्त्यावर नसून गाळ्यासमोर इमारतीच्या जागेतच आहेत. मात्र,त्या पाडताना तेथील फ्रिज,मशिनरी,सामान देखील तोडण्यात आले. आणि शिवीगाळ करून लाखोंचे नुकसान करण्यात आले.त्यामागे या इमारतीत राहणाऱ्या उच्चपदस्थ अधिकारी असून त्याने गाळे धारकांकडे अतिक्रमण विरोधी कारवाई नको असल्यास दर महा १ लाख रुपये मला द्या अशी मागणी करून धमक्याही दिल्याची माहिती या पत्रकार परिषदेत देण्यात आली.  

टेरेसवरील बेकायदा फ्लॅट बांधकाम वाचविण्यासाठी गाळे धारकांच्या शेडचे बळी देऊन कागद रंगविण्यात आल्याचा आरोप महासंघाने केला.   

अतिक्रमण विरोधी कारवाईच्या चौकशीची मागणी

पुणे शहरात सुरु असलेली अतिक्रमण विरोधी कारवाई शंकास्पद असून या मोहिमेचीच चौकशी करावी,अशी मागणी या पत्रकार परिषदेत करण्यात आली. जिथे ही कारवाई केली गेली आहे ,तिथे छोट्या व्यवसायिकांचा बळी देण्यात आला असून बड्यांची अतिक्रमणे त्यामागे हुशारीने लपवली आहेत,असा आरोप या पत्रकार परिषदेत करण्यात आला. अतिक्रमण विरोधी कारवाई ही दुबळ्यांवर होत नाही. जे लोक प्रभावीपणे दाद मागू शकणार नाहीत,अशाच ठिकाणी कारवाई होत आहे. शहरात असलेली रुफटॉप हॉटेले पालिकेच्या आणि उच्च पदस्थांशी संबंधित आहेत.तिथे मात्र कोणीही कारवाईला जात नाही,असा दाखला या पत्रकार परिषदेत देण्यात आला. 

मनमानी कारवाईच्या विरोधात धरणे आंदोलन 

पुणे पालिकेच्या या शंकास्पद कारवाईची चौकशी व्हावी. मंत्री इस्टेस्ट सोसायटीसह सर्व अन्यायग्रस्त गाळे धारकांना न्याय मिळावा. बड्या धेंडांच्या बेकायदेशीर बांधकामांवर प्राधान्याने कारवाई करावी,या मागणीसाठी १५ तारखेपासून सॅलिसबरी पार्क येथे मांडव टाकून उपोषण केले जाणार आहे,असा इशारा हसीब कलमानी यांनी दिला.  


Post a Comment

Previous Post Next Post