अ. भा. नाट्य संमेलना व्यतिरिक्त सुद्धा बाल नाट्य नगरी झाली पाहिजे - अभिनेत्री निलम शिर्के-सामंत

 


प्रेस मीडिया लाईव्ह :

पिंपरी - चिंचवड : शंभराव्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात स्वतंत्र बाल नाट्य नगरी  करण्यात आली ही बाब अत्यंत कौतुकास्पद आहे. नाट्य चळवळीला गती देण्यासाठी आणि बालकांना चालना देण्यासाठी नाट्य परिषदेने दरवर्षी संमेलना व्यतिरिक्त सुद्धा बाल नाट्य नगरी भरवली पाहिजे असे मत अभिनेत्री निलम शिर्के- सामंत यांनी व्यक्त केले.  



१०० व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनात यंदा पहिल्यांदाच बालनगरी ही वेगळी बालरंगभूमी तयार करण्यात आली आहे. या बालनगरीचे उदघाटन् आज अभिनेत्री निलम  शिर्के- सामंत आणि सविता मालपेकर यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रसंगी त्या बोलत होत्या.  नाट्य संमेलनाचे आयोजक भाऊसाहेब भोईर, नाट्य परिषद पिंपरी शाखेचे उपाध्यक्ष कृष्णकुमार गोयल, कार्याध्यक्ष राजेशकुमार साकला आदि मान्यवर उपस्थित होते.



या प्रसंगी बोलताना भाऊसाहेब भोईर म्हणाले, कला क्षेत्राने मला खूप आधार दिला, माझ्या जगण्याला नवी दिशा दिली आहे. १०० वे नाटय संमेलन ही माझ्या २७ वर्षापासून सुरू असलेल्या वाटचालीची फलनिष्पत्ती आहे असे मला वाटते. नाटय संमेलनाच्या इतिहासात पहिल्यांदाच बाल नाटय नगरी साकारण्यात आली आहे. शहरातील पालकांनी आपल्या मुलांना रविवारीही इथे घेऊन यावे कारण नाटक हे संस्कार घडवणारे माध्यम आहे.


या बालनगरीत आज गजरा नाट्य छटांचा, क्लाउन माईम ‌ॲक्ट आणि  व्यावसायिक बालनाट्य – बोक्या सातवंडे यांचे सादरीकरण झाले. तर उद्या (रविवार)  माझी माय -( सकाळी ९:०० ते ९:४५)

ढब्बू ढोल रिमोट गोल (सकाळी १० ते १२), पपेट शो – पपेटरी हाऊस मुंबई (दु.  १२. १५ ते १२. ४५)

गोष्ट रंग (दु. २ ते २.४५ ), गोष्ट सिम्पल पिल्लाची – ग्रीपस थिएटर (सायं ३:३० ते ४:००), बालगीते – ( सायं ५ ते ६) हे कार्यक्रम होणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post