प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : (दि.२५ जानेवारी २०२४) शालेय विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव देण्यासाठी आणि महानगरपालिका शाळांचे यश साजरे करण्यासाठी बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुल येथे "जल्लोष शिक्षणाचा २०२४" या कार्यक्रमाचे पिंपरी चिंचवड मनपाच्या वतीने आयोजन करण्यात आले होते.
यामध्ये पाय जॅम फाउंडेशनच्या सहाय्याने २५० हून अधिक शिक्षकांचे मूलभूत संगणक आणि कोडींग प्रशिक्षण पूर्ण करून, या सर्व प्रशिक्षित शिक्षकांना वर्गामध्ये मुलांना संगणक विज्ञानाचे धडे देण्यासाठी आवश्यक 'कॉम्प्युटर विज्ञान मार्गदर्शिकेचे' अनावरण खासदार श्रीरंग बारणे यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी आमदार उमा खापरे, शिक्षण आयुक्त सुरज मांढरे, आयुक्त शेखर सिंह, अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, उल्हास जगताप, पाय जॅम फौंडेशनच्या प्रांजली पाठक, महेश तोत्रे आणि शुभम बडगुजर आदी उपस्थित होते.
या कार्यक्रमामध्ये विद्यार्थ्यांनी मांडलेल्या समस्या आणि त्यावर तंत्रज्ञानाचा उपयोग करून सुचविलेले उपाय सादर केले होते. सॅनिटरी वेंडिंग मशीन, नदीतून कचरा गोळा करण्याचे यंत्र याचे आ. उमा खापरे यांनी कौतुक केले.
शिक्षण आयुक्त सुरज मांढरे यांनी सांगितले की, अशा कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी उपयोग होतो. यामुळे स्पर्धात्मक वातावरण तयार होऊन गुणवत्तेसाठी शाळांमध्ये स्पर्धा होते. तसेच विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला आणि कलागुणांना वाव मिळतो.
आयुक्त शेखर सिंह यांनी सांगितले की, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२० नुसार सर्व महानगरपालिका शाळांना डिजिटल संसाधने उपलब्ध केली गेली असून, त्या संसाधनांचा उपयोग विद्यार्थ्यांमध्ये कौशल्ये विकसित करण्यासाठी व्हावा यासाठी मनपा आणि पाय जॅम फौंडेशन काम करीत आहे. विद्यार्थ्यांना नव तंत्रज्ञानाचा वापर, क्लिष्ट समस्या सोडवण्यासाठी तंत्रज्ञान आत्मसात करता यावे यासाठी आवश्यक ते किट ३४ माध्यमिक शाळा व भागशाळा यांना मनपा आणि पाय जॅम फाउंडेशनच्या वतीने देण्यात येणार आहेत.
शालेय अभ्यासाव्यतिरिक्त मुलांमधील सुप्त गुणांचा विकास व्हावा या उद्देशाने इनोवेशन हॅकाथॉन, विज्ञान प्रकल्प, शाळांचे विशेष प्रकल्प व स्वयंसेवी संस्था यांना यावर्षी विशेष स्थान देण्यात आले आहे. पाय जॅम फाउंडेशनने मनपा बरोबर केलेल्या करारा नुसार शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम, पाय लॅब आणि हॅकाथॉन यासारखे उपक्रम त्या दृष्टीने राबविण्यात येत आहेत. विद्यार्थ्यांनी हॅकॅथॉन सारख्या स्पर्धेमधून तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्यांच्या आजूबाजूच्या समस्या कशाप्रकारे सोडविता येतील याविषयीच्या प्रकल्पांचे उत्तम सादरीकरण केले असल्याचे अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांनी सांगितले.
पाय जॅम फौंडेशन सरकारी शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये डिजिटल साक्षरता वाढवणे, विद्यार्थ्यांना तंत्रज्ञानाचे निर्माते बनण्यासाठी सक्षम करणे, सरकारी शाळांसाठी अभ्यासक्रम विकसित करणे, राष्ट्रीय शैक्षणिक धोरणांतर्गत अनिवार्य कौशल्यांमध्ये शिक्षकांची क्षमता वाढविणे आणि कमी खर्चाच्या संगणक विज्ञान प्रयोगशाळा अर्थात 'पाय लॅब्ज' चालविणे यासारखी समाजहितोपयोगी उद्दिष्टांसाठी २०१७ पासून कार्यरत आहे अशी माहिती पाय जॅम फौंडेशनच्या प्रांजली पाठक यांनी प्रसिद्धीस दिली आहे.