प्रेस मीडिया लाईव्ह :
माढा : सहकार महर्षी गणपतराव धोंडीबा साठे यांनी स्वातंत्र्यपूर्व काळात तीन दशके आणि स्वातंत्र्यानंतर पाव शतक सहकार क्षेत्रात जे वैविध्यपूर्ण काम केले त्यामुळे सोलापूर जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासाला मूलभूत स्वरूपाची दिशा मिळाली.विकास सोसायटी पासून जिल्हा बँकेपर्यंत , कृषी उत्पन्न बाजार समिती पासून जिल्हा शिक्षण मंडळापर्यंत, जिल्हा खरेदी विक्री संघापासून जिल्हा शिक्षण मंडळापर्यंत समाज जीवनाच्या सर्व क्षेत्रात त्यांनी सहकारी पद्धतीने जे काम केले ते अतिशय दृष्टीपणाचे होते.
सहकाराच्या माध्यमातून समाजाची भक्कम पायाभरणी होऊ शकते आणि प्रत्येकाला विकासाला संधी मिळू शकते हे दाखवून देण्याचे काम त्यांनी केले. म्हणूनच सहकाराचे आद्य शिल्पकार वैकुंठभाई मेहता यांनी त्यांना सहकारमहर्षी म्हणून गौरवले होते. आजच्या सर्वभक्षी विकृत भांडवलशाहीच्या आणि सरकारी-सार्वजनिक क्षेत्र यांच्या खुलेआम विक्री धोरणाच्या काळात सहकार महर्षी गणपतराव साठे यांचा विचार अत्यंत महत्त्वाचा आहे. तो जपण्याची, अंगिकारण्याची व पुढे नेण्याची नितांत गरज आहे.असे मत समाजवादी प्रबोधिनीचे सरचिटणीस प्रसाद कुलकर्णी यांनी व्यक्त केले. ते सोलापूर जिल्ह्याचे पहिले सहकार महर्षी कालवश गणपतराव धोंडीबा साठे यांच्या १३६व्या जन्मदिनानिमित्त आयोजित व्याख्याना 'सहकार काल-आज व उद्या 'या विषयावर प्रमुख होते म्हणून बोलत होते.
अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा ऍड. मिनलताई साठे होत्या. या कार्यक्रमाचे आयोजन पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ संलग्नित रयत शिक्षण संस्थेच्या कला व वाणिज्य महाविद्यालय( माढा )यांच्या वतीने करण्यात आले होते.मंचावर ज्येष्ठ नेते दादासाहेब साठे,प्राचार्य डॉ. सुनील हेळकर, प्रा. संदीप साठे उपस्थीत होते. प्रारंभी सहकारमहर्षी साठे व कर्मवीर अण्णांच्या प्रतिमला पुष्पहार अर्पण करण्यात आला.तसेच छायाचित्र व रांगोळी प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.
जयंतीनिमित्त घेतलेला विविध स्पर्धाचे पारितोषिक वितरण करण्यात आले. स्वागत व प्रस्ताविक प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी केले. तसेच दादासाहेब साठे व प्रा.संदीप साठे यांनी मनोगत व्यक्त केले. पाहुण्यांचा परिचय प्रा. अशोक लोंढे यांनी करून दिला.
प्रसाद कुलकर्णी पुणे म्हणाले सहकाराबरोबरच माढ्याचेपहिले सरपंच ते विधानपरिषदेवरील पहिले आमदार असे लोकप्रतिनिधी म्हणून जे काम सहकारमहर्षी गणपतराव साठे आणि केले तेही अत्यंत महत्त्वाचे आहे.समाजातल्या शेवटच्या माणसाला विकासाची संधी देण्याचं काम त्यांनी जीवनव्रत म्हणून केले. नवभारताच्या आणि महाराष्ट्राच्या उभारणीत प्रारंभीच्या काळात जुनी महत्त्वाचे योगदान दिले त्या पिढीतील एक महत्त्वाचे नाव म्हणून आपल्याला गणपतराव साठे यांच्याकडे पाहावे लागेल. महाराष्ट्राच्या विकासाची सहकार गंगोत्री बनला त्यात गणपतराव साठे यांच्या सारख्याचे योगदान मोठे आहे.एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंथ या सहकाराच्या मुलमंत्रात समाजवादाच्या तत्त्वाशी बांधिलकी आहे. सर्वांसाठी एक व एकासाठी सर्व हे सहकाराचे मूळ ब्रीद आहे.पण आज त्याचा चुकीचा अर्थ लावून सहकारात स्वाहाकार, मालकीहक्क सुरू आहे.हे सहकाराशी प्रतारणा आहे. सहकार महर्षी गणपतराव साठे आज असते तर त्यांनी हा स्वाहाकार थोपविला असता यात शंका नाही.पण त्यांचे अनुयायी म्हणून आपण सर्वांनी ती जबाबदारी पेलली पाहिजे. सहकार क्षेत्रावर जे गिळंकृतीच्या विकृतीचे आणि बेजबाबदार सुलतानी धोरण लकव्याचे जे आक्रमण होत ते आपणच परतवून लावून सहकाराराच्या मूळ उदात्त तत्वाकडे नेले पाहिजे.
अध्यक्षस्थाना वरून बोलतांना नगराध्यक्षा ऍड.मिनलताई साठे म्हणाल्या, सहकारमहर्षी गणपतराव साठे यांनी स्वातंत्र्य पूर्व व स्वातंत्र्योत्तर काळात सहकारासह राजकारण,समाजकारण, शिक्षण अशा विविध क्षेत्रात जे काम केले ते अतिशय आदर्शवत स्वरूपाचे आहे.त्या विचारांवर पुढे वाटचाल केली तरच आज निर्माण झालेल्या आव्हानांवर आपण मात करू शकतो.यावेळी शहाजीराव साठे,अरुण कदम, विजयराव साठे, उपनगराध्यक्ष कल्पना ताई जगदाळे, नगरसेविका शबाना बागवान,,नितीन साठे, वेदांत साठे, डॉ. जानराव , प्रा.कैलास शिंदे, प्रा. डॉ. सतीश घाटगे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. आभार प्रा. अशोक कदम यांनी मानले.सूत्रसंचालन प्रा.दादासाहेब बोडरे व डॉ. वंदना कविता यांनी केले.