अंतिम मतदार यादी प्रसिध्दी दिनांक 23 जानेवारी 2024
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
यंदा राज्यात लोकसभा आणि विधानसभा या दोन महत्त्वाच्या निवडणुका घेण्यात येणार आहेत. या पार्श्वभूमीवर राज्यात मतदार याद्यांच्या अद्ययावतीकरणासाठी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम तसेच घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमात राबवण्यात आलेल्या मोहिमांमुळे अंतिम मतदार यादीत नवमतदारांचा टक्का लक्षणीय वाढला आहे.
निवडणुका पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी मतदार याद्यांचे अद्ययावतीकरण तसेच शुद्धीकरण अत्यंत महत्त्वपूर्ण असते. यासाठी भारत निवडणूक आयोगाकडून दरवर्षी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम राबवला जातो. २७ ऑक्टोबर २०२३ रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये प्रारूप यादी प्रकाशित करून २०२४ च्या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमाचा प्रारंभ करण्यात आला होता. सदर कार्यक्रम २७ ऑक्टोबर ते २३ जानेवारी २०२४ या कालावधीत राबवला गेला.
या विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत ऑक्टोबर २०२३ च्या प्रारूप मतदार यादीत 62,676 मतदारांची नाव नोंदणी झाली. तसेच ७७,४६६ मतदारांची वगळणी करण्यात आली. त्यामुळे अंतिम मतदार यादीमध्ये १४,७९० मतदारांची निव्वळ घट (Net Deletion) होऊन एकूण मतदारांची संख्या ३१,४२,५९८ इतकी झालेली आहे. त्यानुसार १६,०१,८७७ पुरुष मतदारांची १५,४०,५२२ स्त्री मतदारांची आणि १६९ तृतीयपंथी इतकी मतदारांची संख्या आहे. तसेच ८,९६० इतके सैनिकी मतदारांची संख्या आहे. महिला बचत गट, अंगणवाडी सेविका, गृहनिर्माण सोसायट्या यांच्या सहकार्यामुळे यंदा महिलांच्या मतदार नोंदणीत वाढ झालेली दिसून येते. त्यामुळे मतदार यादीतील स्त्री-पुरुष गुणोत्तर ९६२ इतके झाले आहे.
या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये १८ ते १९ या वयोगटामध्ये २१,९१५ मतदारांची नव्याने भर पडली आहे, तसेच २० ते २९ या वयोगटात २०,३०६ मतदारांची वाढ झालेली आहे. प्रारूप यादीत १८ ते १९ या वयोगटाची मतदार संख्या १३,२४७ (०.४२ टक्के) होती, ती जानेवारीच्या अंतिम मतदार यादीत ३५,१६२ (१.१२ टक्के) इतकी झालेली आहे. तर २० ते २९ वयोगटाची प्रारूप यादीतील मतदार संख्या ५,४५,७१५ (१७.२८ टक्के) होती, ती अंतिम यादीत ५,६०,०२१ (१८.०१ टक्के) इतकी झालेली आहे. विविध सामाजिक संस्था, महाविद्यालये यांनी राबवलेल्या मतदार नोंदणी शिबिरांमुळे या वयोगटाच्या टक्केवारीत वाढ झालेली दिसून येते.
येत्या लोकसभा व विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मतदार याद्या अचूक व परिपूर्ण असण्यावर भारत निवडणूक आयोगाचा भर आहे. त्यानुसार विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमापूर्वी जुलै ते ऑगस्ट २०२३ या कालावधीत घरोघरी सर्वेक्षणाची मोहीम राबवण्यात आली होती. सदर सर्वेक्षणात आढळलेल्या मृत मतदार, कायमस्वरूपी स्थलांतरित मतदार, तसेच दुबार मतदार यांची नावे मतदार यादीतून वगळण्याची कार्यवाही पुनरीक्षणपूर्व कालावधीत तसेच विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत पूर्ण करण्यात आली. त्यानुसार ५२,८६२ मृत मतदारांची नावे मतदार यादीतून वगळण्यात आली. त्यापैकी ८० पेक्षा अधिक वय असलेले १६,४८४ मतदार मृत झाले असल्याचे निदर्शनास आल्यामुळे त्यांची नावेही वगळण्यात आलेली आहेत. त्याचप्रमाणे कोल्हापूर जिल्हयातील १० मतदार संघातील याद्यांमध्ये १९,७२८ एकसारखे फोटो असलेले मतदार (फोटो सिमिलर एन्ट्रीज PSE) असल्याचे निदर्शनास आले, त्यांची सखोल तपासणी करून विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कालावधीत ५,८६१ मतदारांच्या नावांची वगळणी करण्यात आली आहे. तसेच मतदार यादीत नाव व इतर काही तपशील समान असलेले (डेमोग्राफिकल सिमिलर एन्ट्रीज - DSE) १३,१२३ मतदार आढळून आले. त्यांची सखोल तपासणी करून १,५६१ मतदारांची नावे वगळण्यात आलेली आहेत. ही वगळणी प्रक्रिया मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांमार्फत संबंधित मतदारांच्या गृहभेटी घेऊन, स्पीड पोस्टाने नोटिसा पाठवून, तसेच पूर्ण तपासणी-अंती कायदेशीररीत्या करण्यात आलेली आहे. नाव वगळणीच्या या प्रक्रियेमुळे मतदार यादीतील अनावश्यक फुगवटा नाहीसा होऊन आता ती अधिक परिपुर्ण झालेली आहे. कोल्हापूर जिल्हायातील 10 मतदार संघातील विविध महाविदयालयामध्ये शिबिरे घेण्यात आलेली होती त्यामध्ये 5,251 इतक्या विदयार्थ्यांनी नवतदार म्हणून आपली नोंदणी केलेली आहे.
कोल्हापूर जिल्हयात एकूण ३३५९ मतदान केंद्रे असून दिव्यांग मतदारांना ये-जा करण्याच्या दृष्टीने २०२४ च्या लोकसभा निवडणुकीमध्ये सर्व मतदान केंद्रे तळमजल्यावर आणण्याची व्यवस्था करण्यात आलेली आहे. जिल्हयात सद्यथितीमध्ये एकूण २४,४४० इतके दिव्यांग मतदार आहेत. तसेच आगामी लोकसभा व विधानसभा निवडणूकीमध्ये 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांग मतदार तसेच 80 वर्षावरील मतदार यांना घरबसल्या मतदानाचा हक्क बजावण्याची सुविधा भारत आयोगाकडून करणेत आलेली आहे. मतदान याबाबतचे आवश्यक अर्ज हे निवडणूक संबंधित कर्मचारी यांचेमार्फत दिव्यांग व 80 वर्षावरील मतदारांना घरपोच वेळेवर उपलब्ध करून देण्यात येतील.
यंदाच्या पुनरीक्षण कार्यक्रमामध्ये मतदार नोंदणीसाठी १ जानेवारी या नेहमीच्या अर्हता दिनांकासोबतच १ एप्रिल, १ जुलै आणि १ ऑक्टोबर या बहु-अर्हता तारखा ठेवण्यात आल्या होत्या. त्यामुळे ऑक्टोबर २०२४ पर्यंत १८ वर्षे पूर्ण करणाऱ्या युवांनाही या मोहिमेत आगाऊ किंवा पूर्वनोंदणी (Advance Registration) करता आली. पूर्वनोंदणीचे एकूण १४,७९८ अर्ज (१ एप्रिल - ४,३८६, १ जुलै - ५,११३, १ ऑक्टोबर ५,२९९) प्राप्त झालेले आहेत. त्या-त्या तिमाहीच्या कालावधीत १८ वर्षे पूर्ण होणाऱ्या अर्जदारांच्या अर्जावर प्रक्रिया करण्यात येणार आहे. त्यामुळे पूर्वनोंदणी केलेल्या युवांना पुन्हा अर्ज करण्याची आवश्यकता नाही. मात्र अंतिम यादी प्रसिद्ध झाल्यानंतरही मतदार नोंदणीची निरंतर अद्यतन (Continuous Updataion) प्रक्रिया सुरू असल्यामुळे अद्याप नाव नोंदणी न केलेल्या युवांना मतदार नोंदणीची अजूनही संधी असून 18 ते 29 वयोगटातील ज्या व्यक्तींनी अद्याप मतदार यादीत आपले नांव नोंदविले नाही अशा व्यक्तींनी मतदार यादीत आपली नावे नोदणी करून घेवून आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी केले आहे.
दिनांक 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस साजरा करणेत येणार असून या दिवशी मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (BLO) हे मतदान केंद्रावर असणार आहे. तरी सर्व मतदारांनी, तसेच स्थलांतरीत व्यक्तींनी मतदार यादीतील आपले नांव आवर्जुन तपासावे. तसेच मतदार यादीमध्ये काही त्रुटी आढळून आल्यास संबधित बीएलओ, मतदार नोंदणी अधिकारी यांचे कार्यालय, NGPS पोर्टल किंवा 1950 या हेल्पलाईन क्रमांकावर आपली तक्रार नोंदवावी.
दिनांक २३ जानेवारी रोजी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाच्या व जिल्हाधिकारी कार्यालयांच्या संकेतस्थळावर आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्ये अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत. मतदारांनी 'मतदाता सेवा पोर्टल' या संकेतस्थळावर (https://electoralsearch.eci.gov.in/) जाऊन यादीत आपले नाव तपासावे आणि सर्व तपशील योग्य आहेत का हे पाहावे. सोबतच मतदान केंद्र सुद्धा तपासून घ्यावे, जेणेकरून ऐन मतदानाच्या दिवशी गैरसोय होणार नाही. तसेच यादीत नाव नसलेल्या नागरिकांनी सहा क्रमांकाचा अर्ज भरून आपला मताधिकार सुनिश्चित करावा, असे आवाहन जिल्हा अधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी राहूल रेखावार यांनी केले. सर्व राजकीय पक्षांनाही त्यांनी आवाहन केले आहे की, आपापल्या पक्षामार्फत मतदान केंद्रस्तरीय प्रतिनिधींच्या नियुक्त्या करून त्यांच्या माध्यमातून मतदारांना यादीत नाव तपासण्यास आणि नावे नसलेल्यांना मतदार नोंदणीस साहाय्य करावे. नागरिकांना मतदार नोंदणी कार्यालयात प्रत्यक्ष मतदार नोंदणी करता येईल. तसेच 'मतदाता सेवा पोर्टल' (https://voters.eci.gov.in/) आणि 'वोटर हेल्पलाइन अॅप' (Voter Helpline APP) यांवर ऑनलाइन नाव नोंदणीची सुविधा सुद्धा उपलब्ध आहे.
कोल्हापूर जिल्हयातील ‘गावामध्ये 100% मतदार नोंदणी झाल्याचे घोषित करणाऱ्या’ गावांना प्रमाणपत्र देणेत येणार आहे. असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी यांनी पत्रकार परिषदेमध्ये केले आहे.