कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या चौथ्या मजल्याचे उद्घाटन
प्रेस मीडिया लाईव्ह :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर : केंद्र व राज्य शासनाच्या अनेक योजना सर्वसामान्यांपर्यंत पोहोचवण्याचे मोलाचे काम जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केले जाते. आजवरचे अनेक नेते, मंत्री, उपमुख्यमंत्री, मुख्यमंत्री ही जिल्हा परिषदेतूनच पुढे आलेली नेतृत्वं असून जिल्हा परिषद ही नेते घडवणारी जणू एक शाळा असल्याचे प्रतिपादन कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.
कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या नव्याने बांधकाम केलेल्या चौथ्या मजल्याचे उद्घाटन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार धनंजय महाडिक, खासदार संजय मंडलिक, जिल्हाधिकारी राहुल रेखावार, कोल्हापूर महानगरपालिका आयुक्त डॉ.के.मंजूलक्ष्मी, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने तसेच माजी अध्यक्ष बजरंगतात्या पाटील, बी.सी. पाटील, राहुल पाटील, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य, पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. कोरोना परिस्थितीत मयत झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना 50 लाख रुपयांचा धनादेश पालकमंत्री श्री. मुश्रीफ यांच्या हस्ते देण्यात आला.
कागलकर वाड्यात असणारे जिल्हा परिषदेचे सर्व विभाग एकाच ठिकाणी सुरु होण्यासाठी सर्वांच्या प्रयत्नातून सध्याची ही एकत्रित इमारत उभारण्यात आल्याचे सांगून पालकमंत्री हसन मुश्रीफ म्हणाले,
केंद्र सरकारच्या अनेक महत्वाकांक्षी योजना जिल्हा परिषदेच्या माध्यमातून राबवल्या जातात. जिल्ह्यातील विकासकामे मार्गी लावण्यासाठी पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी एकत्रित येऊन काम केलं पाहिजे, असे त्यांनी सांगितले.
लोकसभा, विधानसभा निवडणुका आगामी काळात लवकरच घोषित होतील. यासाठी प्रलंबित विकास कामे लवकरात लवकर पूर्ण करा. मागील वर्षीचा निधी वेळेत खर्च करुन कामे गतीने मार्गी लावा, असे सांगून याकामी विलंब होता कामा नये, अशा सूचना करुन 15 व्या वित्त आयोगाचा निधी जिल्हा परिषद, पंचायत समितीला मिळण्याबाबत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करण्यात येईल, असे त्यांनी सांगितले.
छत्रपती शिवाजी महाराज यांचा राज्याभिषेक दिन सोहळा, ग्रामपंचायतीची कर माफी, कोरोना काळात मृत्यू झालेल्या वारसांना 50 लाख रुपये, विधवा महिलांना सन्मान देण्याचा शासन निर्णय आदी महत्वपूर्ण निर्णय ग्रामविकास मंत्री असताना घेतल्याचे सांगून पूर्वी सती जाण्याची प्रथा राजा राममोहन रॉय यांनी मोडून काढली त्याचप्रमाणे सर्वांनी मिळून विधवा प्रथा मोडून काढणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.
जिल्हा परिषदेला मिनी विधानसभा म्हटले जाते, असे सांगून खासदार धनंजय महाडिक म्हणाले, सकारात्मक काम करणारे अधिकारी असतील तर विकासाची कामे गतीने मार्गी लागतात. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून सुरु असलेली विकसित भारत संकल्प यात्रा कोल्हापूर जिल्ह्यात चांगल्याप्रकारे राबवण्यात आल्याबद्दल मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील यांच्यासह संबंधित अधिकाऱ्यांचे त्यांनी कौतुक केले. यापुढेही केंद्र व राज्य सरकारच्या योजनांचा लाभ नागरिकांना मिळवून द्यावा, असे आवाहन त्यांनी केले. राज्य शासनाकडे प्रलंबित प्रस्ताव पालकमंत्री मुश्रीफ साहेब मार्गी लावतील, तर केंद्र सरकारकडे प्रलंबित प्रश्न लवकरात लवकर मार्गी लावण्यासाठी व जिल्ह्याला जास्त निधी मिळवण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, असे त्यांनी सांगितले.
खासदार संजय मंडलिक म्हणाले, जिल्हा परिषदेत येणाऱ्या नागरिकांच्या सोयीसाठी जिल्हा परिषदेच्या सभागृहाचे नूतनीकरण व या इमारतीत चौथा मजला तयार होणे आवश्यक होते. मुख्यमंत्री आपल्या दारी सह विविध योजनांच्या माध्यमातून नागरिकांना लाभ मिळवून देण्यात आला आहे. हवा महल इमारतीसह अन्य इमारती जिल्हा परिषदेला मिळवून देण्यासाठी प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने यांनी जिल्हा परिषदेच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला. तसेच जिल्हा परिषदेच्या विकासासाठी आवश्यक त्या सुविधा देण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले.
आभार जिल्हा परिषदेचे मुख्य अभियंता श्री सांगावकर यांनी मानले.