पत्रकार हा जनप्रबोधनाचा मुख्य आधार : प्रा. डॉ. अच्युत माने यांचे प्रतिपादन

 श्रमिक पत्रकार संघाचा पत्रकारदिन उत्साहात साजर


प्रेस मीडिया लाईव्ह : 

इचलकरंजी/प्रतिनिधी -

पत्रकारांनी दिलेल्या बातमीमुळे एखाद्या व्यक्तिलाच काय, पण संपूर्ण समाजाला न्याय मिळू शकतो. बातमीमागची बातमी शोधून काढून वास्तवाला भिडणारा पत्रकार हाच जनप्रबोधनाचा मुख्य आधार आहे, असे प्रतिपादन प्रा. डॉ. अच्युत माने यांनी केले.

इचलकरंजी येथे   इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघ व रोटरी क्लबऑफ इचलकरंजी यांच्या संयुक्त विद्यमाने  आयोजित पत्रकार दिन व गौरव पुरस्कार सोहळ्यात  श्री. माने बोलत होते. अध्यक्षस्थानी आमदार प्रकाश आवाडे होते. यावेळी माजी आमदार सुरेश हाळवणकर, पोलीस उपधिक्षक समीरसिंह साळवे,दै महासत्ताचे कार्यकारी संपादक तरूण दत्तवाडे, पोलिस निरिक्षक राजू ताशिलदार, प्रविण खानापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

यावेळी दैनिक महासत्ताचे संपादक वसंतराव दत्तवाडे यांना ’इचलकरंजी भूषण’ हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. तसेच कैश बागवान (उद्योजक), दीपक राशिनकर (वस्त्रोद्योग), अनिकेत माने (क्रीडा), सौ. रमा फाटक (सामाजिक)  व श्री माधव विद्यामंदीर (शैक्षणिक) यांना मान्यवरांचे हस्ते गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आले. रोटरी क्लबचे अध्यक्ष सुनिल सातपुते यांनी स्वागत तर इचलकरंजी श्रमिक पत्रकार संघाचे अध्यक्ष संभाजी गुरव यांनी प्रास्ताविक केले.

डॉ. माने पुढे म्हणाले, महात्मा गांधी म्हणतात, सामान्य माणूस हा क्रांतीचा आधार आहे. या सामान्याला त्याच्या न्याय्य हक्काची जाणीव करून देण्याचे काम पत्रकार करत असतात. व्यवस्था बदलायची असेल तर परिवर्तन झालेच पाहिजे. यासाठी वर्तमानपत्रांनीही अशा बातम्यांना जागा देणे गरजेचे आहे. सध्या समाजाची अभिरूची बदलत असून संवेदनशीलतेचा अभाव आहे. भांडवली वृत्तपत्रांचा परिणाम हा प्रादेशिक, स्थानिक वृत्तपत्रांवर होत आहे.    

अध्यक्षस्थानावरून बोलताना आमदार प्रकाश आवाडे यांनी, समाजाची नाडी ओळखणारा हा खरा पत्रकार होवू शकतो, दर्पणकारांनी समाजप्रबोधनाचे काम वृत्तपत्राच्या माध्यमातून केले, तोच वारसा आजच्या पत्रकारांनी जपणे आवश्यक आहे. पत्रकारांना घरकुले मिळावीत, यासाठी आपण प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

माजी आमदार सुरेश हाळवणकर यांनी, असंघटीत कामगार कल्याणकारी मंडळाप्रमाणेच पत्रकार कल्याण महामंडळ स्थापण्यासाठी तसेच पत्रकारांच्या पेन्शनसाठी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे सांगितले.

याप्रसंगी आगार व्यवस्थापक सागर पाटील, मदन कारंडे, शिवसेना (उबाठा) जिल्हाप्रमुख  संजय चौगुले, वैभव उगळे, सयाजी चव्हाण, सौ. उर्मिला गायकवाड, अश्‍विनी कुबडगे, वैशाली नायकवडे, बाळासाहेब कलागते, अनिल डाळ्या, संजय होगाडे, प्रसाद कुलकर्णी, नरोत्तम लाटा, कौशिक मराठे, संपादक अजय जाधव, संतोष शेळके, सदा मलाबादे, नरसिंग पारीक यांच्यासह श्रमिक पत्रकार संघाचे सर्व पदाधिकारी सदस्य तसेच सामाजिक, राजकीय, शैक्षणिक क्षेत्रातील जाणकार, नागरिक उपस्थित होते. संघाचे उपाध्यक्ष बसवराज कोटगी यांनी आभार मानले. सुत्रसंचालन प्रा. युवराज मोहिते यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post