इचलकरंजी प्रेस क्लबचा प्रा.डॉ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्कार प्रदान



प्रेस मीडिया लाईव्ह :

इचलकरंजी : प्रतिनिधी :

इचलकरंजी प्रेस क्लब व लायन्स क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने पत्रकार दिन व पुरस्कार वितरण सोहळ्यात कन्या महाविद्यालयाच्या प्रा.डाॅ.प्रतिभा पैलवान यांना उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

या पुरस्काराचे वितरण प्रमुख वक्ते शिवाजी विद्यापीठाचे जनसंपर्क अधिकारी अलोक जत्राटकर यांच्या हस्ते करण्यात आले.यावेळी

व्यासपीठावर आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर माजी नगरसेवक नितीन जांभळे, लायन्स क्लबचे अध्यक्ष श्रीकांत सारडा, प्रेस क्लबचे अध्यक्ष मयूर चिंदे,  उपाध्यक्ष अरुण काशीद यांची प्रमुख उपस्थिती होती. 

येथील कन्या महाविद्यालयाच्या प्रा.डाॅ. प्रतिभा पैलवान यांनी राजहंस सोशल फौंडेशनच्या माध्यमातून 

तृतीय पंथीयांच्या समस्या जाणून घेत त्या सोडवण्याबरोबरच त्यांना शासकीय योजनांचा लाभ मिळवून देत विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सातत्याने प्रयत्न सुरु ठेवला आहे.तसेच वंचित ,अनाथ ,गरीब मुलांचे प्रबोधन करत त्यांना सुसंस्कारित व शिक्षणातून स्वावलंबी करण्यासाठी विविध माध्यमातून प्रयत्न सुरु ठेवला आहे.विशेष म्हणजे साहित्य क्षेत्रातही मानवी नातेसंबंध व विविध ज्वलंत प्रश्नांना स्पर्श करत कविता लेखनातून त्यांनी वेगळा ठसा उमटवला आहे.

या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊनच त्यांना इचलकरंजी प्रेस क्लबच्या वतीने उत्कृष्ट सामाजिक कार्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

यावेळी स्वागत प्रेस क्लबचे अध्यक्ष  मयूर चिंदे यांनी तर प्रास्ताविक संजय खूळ यांनी केले. प्रमुख पाहुण्यांची ओळख दयानंद लिपारे यांनी करून दिली.आभार उपाध्यक्ष अरुण काशीद यांनी मानले. सूत्रसंचालन ऋषिकेश राऊत यांनी केले. लायन्स क्लब सभागृहात झालेल्या कार्यक्रमाला विविध संस्थांचे पदाधिकारी, मान्यवर ,पत्रकार, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध स्तरातून अभिनंदन होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post