प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
( ९८ ५०८ ३० २९० )
Prasad.kulkarni65@gmail.com
मंगळवार ता.३० जानेवारी २०२४ रोजी महात्मा गांधी यांचा ७६ वा स्मृतिदिन अर्थात हुतात्मा दिन आहे. भारत स्वतंत्र झाल्यावर अवघ्या साडेपाच महिन्यांनी म्हणजे ३० जानेवारी १९४८रोजी संध्याकाळी पाच वाजता गांधीजींचा निर्घृण पद्धतीने खून करण्यात आला.नथुराम विनायक गोडसे याने दिल्लीतील बिर्लाभवनच्या परिसरातील सार्वजनिक प्रार्थना स्थळाजवळ बंदुकीतून गोळ्या झाडून महात्म्याचा खून केला. स्वातंत्र्यानंतर लगेचच देशाला व जगाला शुरत्वाच्या अहिंसेची शिकवण देणाऱ्या राष्ट्रपित्याचाच भ्याडपणे खून झाल्याने देश पोरका झाला. अनेक ठिकाणी लोकप्रक्षोभ उसळला.जाळपोळ झाली. गांधी खुनाच्या आधी दहा दिवस म्हणजे २० जानेवारी १९४८ रोजी नथुराम गोडसे चा सहकारी मदनलाल पाहवा याने याच ठिकाणी गांधीजींच्या खुनाचा प्रयत्न केला होता. पण तो अयशस्वी ठरला होता. त्याला अटकही झाली होती.गांधीजींच्या प्रत्यक्ष खुनात व कारस्थानात सहभागी असलेल्या नऊ जणांवर आरोप पत्र दाखल झाले होते. २४ जून १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ अशी साधारण दीड वर्षे हा खटला चालला. त्यात १५ नोव्हेंबर १९४९ रोजी नथुराम गोडसे व नारायण आपटे यांना फाशी देण्यात आली. मदनलाल पाहवा, विष्णू करकरे, गोपाळ गोडसे यांना जन्मठेप झाली.डॉ. दत्तात्रय परचुरे,शंकर किस्तय्या, आणि बॅ. विनायक दामोदर सावरकर हे निर्दोष ठरले.या खटल्यात दिगंबर बडगे हा माफीचा साक्षीदार होता.
गांधीजींचा खून हा फाळणीसाठी अथवा ५५ कोटींसाठी केला असे कुजबूज यंत्रणा सांगत असते. पण ते खोटे असून गांधीजींच्या खुनाचे प्रयत्न १९३४ पासूनच अनेकदा झाले होते. त्याची तपशीलवार माहिती नामवंत पत्रकार कालवश जगन फडणीस यांनी ‘महात्म्याची अखेर ‘या पुस्तकात दिलेली आहे. विचारांना विचारांनी उत्तर देता येत नसले की खुनशी विचारधारा खून करतात हा इतिहास आणि वर्तमानही आहे. गांधीजींना अभिवादन करत असतानाच एक गोष्ट ध्यानात घेतली पाहिजे की ,आज व्हाट्सअप पासून चित्रपट,नाटकापर्यंतच्या सर्व माध्यमातून गांधी आणि नथुराम यांच्यात फार मोठा तात्विक संघर्ष होता असे नव्या पिढीवर बिंबवण्याचा प्रयत्न होत आहे. पण नथुराम ही संकुचित विचारधारेची भ्याड खुनशी विकृती होती. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी हे जगाला अहिंसेची व शौर्याची शिकवण देणारे सार्वकालिक श्रेष्ठ व्यक्तिमत्व होते हे काळाने ही सिद्ध केले आहे.
गांधीजींच्या खुनासाठी गोडसेला फाशी दिली होती.मात्र,महात्मा गांधींवर तीन नव्हे तर चार गोळ्या झाडल्या होत्या. आणि त्यांची हत्या चौथ्या गोळीने झाल्याचा दावा करणारी जनहित याचिका अभिनव भारतचे संस्थापक पंकज फडणीस यांनी दाखल केली होती.एका अज्ञात व्यक्तीने चौथी गोळी झाडली आणि त्या गोळी मुळे गांधीजींचा खून झाला. गोडसेला अटक झाली पण त्या अज्ञात व्यक्तीला अटक झाली नाही. म्हणून गांधी हत्येची नव्याने चौकशी झाली पाहिजे असे या जनहित याचिकेत म्हटले होते. त्यावर सर्वोच्च न्यायालयाचे तत्कालीन न्यायमूर्ती शरद बोबडे आणि एल. नागेश्वर राव यांच्या खंडपीठाने ७ ऑक्टोबर २०१७ रोजी ज्येष्ठ विधीज्ञ अमरेंद्र शरण यांची न्यायालयाचे मित्र (ॲमिकस क्युरी ) म्हणून नियुक्ती केली होती. अमरेंद्र शरण यांनी संचित गुरु आणि समर्थ खन्ना या दोन ज्येष्ठ विधिज्ञांचे सहकार्य घेऊन आपला अहवाल ८ जानेवारी २०१८ रोजी सर्वोच्च न्यायालयात सादर केला होता. या अहवालात म्हटले आहे म्हटले होते की,’ गांधीजींच्या हत्येत नथुराम गोडसे व्यतिरिक्त आणखी कोणी सामील असल्याचा पुरावा नसून या प्रकरणाची ७० वर्षानंतर नव्याने चौकशी करण्याची आवश्यकता नाही.याबाबतचे सारे संशय निराधार आहेत.’
महात्मा गांधी हे भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या अखेरच्या तीन दशकांचे मार्गदर्शक नेते होते.त्यापूर्वीची वीस वर्षे त्यांनी दक्षिण आफ्रिकेमध्ये वंशवाद विरोधी यशस्वी संघर्ष केलेला होता. गांधीजी भारतीय स्वातंत्र्याचे शिल्पकार आहेत. भारताचे राष्ट्रपिता आहेत. गांधीवाद नावाचे एक नवे तत्त्वज्ञान आपल्या आचार विचारातून मांडणारे ते थोर विचारवंत होते त्यांच्या कट्टर विरोधकांनाही त्यांच्या नावाचा आसरा घेतल्याशिवाय पुढे जाता येत नाही. भारतात आलेले जी ट्वेंटी सहित कोणतेही जागतिक नेते अथवा आपण बाहेरील कोणत्याही देशात गेलेलो असो भारत हा देश गांधींचा आहे हे सांगून गांधीजींपुढे नतमस्तक होण्याशिवाय पर्याय नसतो ही गांधींची वैश्विक थोरवी आहे.
पण दुसरीकडे गांधी खुनाचा दिवस शौर्य दिन म्हणून साजरा करा, नथुराम गोडसेला राष्ट्रभक्त म्हणा, त्याचे पुतळे उभा करा, असे म्हणणारी, गांधीजींच्या प्रतिमेवरही रक्तरंजितता पसरवून त्यात विखारी,विद्वेषी आनंद मानणारी विकृती आहेच. वरील याचिका सुद्धा नथुरामला निर्दोष ठरवावे किंबहुना लोकांमध्ये संभ्रम निर्माण व्हावा या हेतूनेच केलेली होती यात शंका नाही. जगातील अब्जावधी लोक गांधीजीं पुढे नतमस्तक होतात याचे कारण गांधीजी मानवता धर्म हाच सर्वश्रेष्ठ धर्म आहे असे सांगत होते.ज्या ब्रिटिशांना गांधीजींनी भारत सोडायला लावले त्या इंग्लंडच्या म्हणजे ब्रिटिश संसदेसमोर १४ मार्च २०१५ रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांचा नऊ फूट उंचीचा पुतळा उभा करण्यात आला. ज्या विस्टन चर्चिल यांनी गांधीजींची’ हाफ नेकेड फकीर ‘अशी संभावना केली होती त्याच चर्चिल यांच्या पुतळ्याजवळ महात्मा गांधी यांचा पुतळा ब्रिटिश संसदेपुढे ब्रिटिश सरकारला उभा करावा लागला. यातच गांधीजींच्या विचारधारेची, तत्त्वज्ञानाची महानता स्पष्ट होते.
त्या पुतळ्याचे अनावरण करताना ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून म्हणाले होते ,’इतिहासातील एका सर्वश्रेष्ठ नेत्याला या पुतळ्याच्या माध्यमातून ब्रिटनने अभिवादन केले आहे.’ज्या ब्रिटिशांना गांधीजींनी छोडो भारत असा आदेश देऊन भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात सर्वात मोठी भूमिका बजावली त्याच ब्रिटिशांना आपल्या देशाच्या संसदेसमोर गांधीजींचा पुतळा उभा करावा असे वाटणे आणि ते कृतीत आणणे हीच गांधीजींची महानता आहे .विसाव्या शतकातील या महामानवाच्या वैचारिक अपरिहार्यतेला एकविसाव्या शतकाने दिलेली ती सलामी आहे .गांधीजीं विरोधात गरळ ओकणाऱ्याना तसेच माफींनामे लिहून देऊन ,सहकाऱ्यांची नावे सांगून ज्यांनी ब्रिटिशांशी जवळीक साधली त्यांच्या समर्थकांना ही ब्रिटिशांनीच मारलेली सणसणीत थोबाडीत आहे. हा पुतळा उभारून ब्रिटिशांनी बदलत्या काळाचे सम्यक भान दाखवून दिले आहे .
आजच्या सार्वत्रिक दहशतवादाच्या, हिंसाचाराच्या कालखंडात गांधीजींच्या शांतता, अहिंसा यासह सर्वच विचारांची नितांत गरज आहे. व्यक्तीला बंदुकीच्या गोळ्यांनी ठार मारून त्यांचे विचार संपवता येत नसतात. हे सर्वकालिक सत्य आहे. भ्याडांच्या हिंसेपेक्षा शुरांची अहिंसा नेहमीच मोठी असते हे निर्विवाद सत्य आहे.महात्मा गांधींना नोबेल पुरस्कार का मिळाला नाही ?याची चर्चा वारंवार होत असते. खरंतर महात्मा गांधींचे व्यक्तिमत्व आणि कार्य यांची उंची नोबेल पुरस्कारापेक्षाही मोठी होती .हा पुरस्कार गांधीजींना मिळाला असता तर त्या पुरस्काराची उंची निश्चितच वाढली असती. ऑगस्ट २००८मध्ये नॉर्वेच्या नोबेल समितीचे प्रमुख ओले डॅन बोल्ट एमजीएस यांनी म्हटले होते की, १९४७ च्या अखेरीस गांधीजींना नोबेल पुरस्कार देण्याचे एकमताने ठरले होते. पण १९४८ च्या प्रारंभी त्यांचा खून झाल्याने नाईलाजास्तव हा पुरस्कार देण्याचा निर्णय समितीला मागे घ्यावा लागला. शांततेचा संदेश देणाऱ्या गांधीजींना मरणोत्तर हा पुरस्कार का दिला गेला नाही ?याचे उत्तर त्यांनी दिले नाही. खरंतर गांधीजींना हा पुरस्कार देता येणे शक्य होते पण दिला गेला नाही हे वास्तव आहे.
अर्थात नोबेल मिळाला नसला तरी गांधी विचार संपूर्ण जगाला महत्त्वाचा वाटला, वाटतो आहे हे महत्वाचे आहे.आणखी अशीच एक घटना आहे.लखनऊ येथील ऐश्वर्या पराशर या विद्यार्थिनीने ‘महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता घोषित करावे’ असा विनंती अर्ज भारताच्या राष्ट्रपतींकडे केला होता. या अर्जावर बरेच दिवस उत्तर न आल्याने त्यावर काय कार्यवाही केली याची माहिती ऐश्वर्याने माहितीच्या अधिकारांतर्गत मागवली होती. त्यावर स्पष्टीकरण देण्याचा आदेश गृह मंत्रालयाला देण्यात आला होता त्यावर २५ ऑक्टोबर २०१२ रोजी गृहमंत्रालयाने स्पष्टीकरण द देताना म्हटले होते ,’महात्मा गांधी यांना अधिकृतरित्या राष्ट्रपिता घोषित करण्यास देशाची घटना परवानगी देत नाही. केवळ शैक्षणिक आणि लष्करी क्षेत्रातील व्यक्तींच्या बाबतीत असा अपवाद ठरू शकतो.’गृहमंत्रालयाचे हे स्पष्टीकरण अगदी योग्य होते. भारतीय राज्यघटनेतील कलम १८ मधील भाग एक प्रमाणे राष्ट्रपिता ही पदवी अधिकृतरित्या सरकार देऊ शकत नाही हे सर्वांनी सहजपणे स्वीकारले.पण गांधीजी स्वातंत्र्य आंदोलनात करोडो लोकांचे प्रेरणास्त्रोत होते. त्यामुळे लोकांनी त्यांना राष्ट्रपिता या पदवीने संबोधले आणि स्वीकारलेही. परिणामी’ राष्ट्रपिता महात्मा गांधी’ हे नाव ‘मोहनदास करमचंद गांधी’ या नावापेक्षा सर्वतोमुखी झाले .ते लेखनात, भाषणात सर्रासपणे वापरले जाते. हा लोक पाठिंबा जगात फार दुर्मिळ होता ,आहे आणि राहीलही हे सत्य आहे.
शेवटी गांधीमार्ग हा महामार्ग आहे.आपल्या राजकारणासाठी गांधीजींनी जे मार्ग अवलंबले ते सत्याचा आग्रह धरणारे होते.त्यांचा सत्याचा मार्ग अतिशय प्रभावी आणि भिन्न स्वरूपाचा होता. त्याद्वारे त्यांनी भारतीय स्वातंत्र्य आंदोलनाला एक नवा मंत्र दिला.गांधीजींनी सत्य, अहिंसा ,असंग्रह , अस्तेय (चोरी न करणे, नको असलेली वस्तू घेणे ),अभय, स्वदेशी, स्पर्शभावना (अस्पृश्यता निवारण ),सर्वधर्मसमभाव, शरीरश्रम, आस्वाद (गरजेपुरते पण सकस अन्न)आणि ब्रह्मचर्य (भोगविलास व इंद्रियावर नियंत्रण ) अशी एकादश सूत्रे सांगितली. गांधीजी सत्याबाबत ‘ईश्वर सत्य है ‘ पासून ‘ सत्य ही ईश्वर है ‘या भूमिकेपर्यंत गेलेले होते. मात्र आज असत्य,हिंसा, हाव,चौर्यकर्म ,भय, मेड इन अमेरिका ऑर चायना, जात्यंधता,धर्मांधता, शरीरश्रमघृणा, खान पान विकृती आणि संयमहीनता ही अनर्थकारी एकादश सूत्रे प्रस्थापित झालेली आहेत. त्यापासून परावृत्त करून मूळ गांधी सुत्राकडे नेणे, किमान नेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करणे हीच खरी गांधीजींना आदरांजली ठरणार आहे.शेवटी गांधीजी मारूनही मरत नाहीत ते अमर आहेत हेच खरे….!
स्वातंत्र्याची गाथा रचतो या देशाचा राष्ट्रपिता
युगनिर्माता म्हणून ठरतो या देशाचा राष्ट्रपिता..
चरख्यामागे चरखा होतच फिरत राहिला जीवनभर
चरख्यामधुनी हृदये विणतो या देशाचा राष्ट्रपिता…
भारत छोडो,करो या मरो ,क्रांतिदिनी आदेश दिला
लोकांच्या भाषेत बोलतो या देशाचा राष्ट्रपिता…
त्यांच्या हाती लाठ्या – गोळ्या याच्या हाती मीठ असे
साम्राज्याला धूळ चारतो या देशाचा राष्ट्रपिता..
पहिल्या वहिल्या स्वातंत्र्यदिनी जन सेवेतच रमणारा
सामान्यांचे अश्रू पुसतो या देशाचा राष्ट्रपिता..
अनुयायीही मिळत राहती याच कारणे युगेयुगे
प्रयोगातूनी सत्य सांगतो या देशाचा राष्ट्रपिता…
पृथ्वीवरती जोवर मानव तोवर त्याची महतीही
मानवतेची ज्योत लावतो या देशाचा राष्ट्रपिता..
जाती धर्मा मध्ये इथली भ्याड पिलावळ गुरफटता
समतेसाठी रक्त सांडतो या देशाचा राष्ट्रपिता…
शूर अहिंसी योद्धा होता,विचार त्याचा अमरत्वी
गोळ्या घालून कुठे संपतो या देशाचा राष्ट्रपिता…..
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)