ज्ञानज्योतींचा वसा वारसा



प्रेस मीडिया लाईव्ह :

प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी

( ९८ ५०८ ३० २९० )

prasad.Kulkarni65@gmail.com

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा बुधवार ता.३ जानेवारी २०२४  रोजी  १९२ वा जन्मदिन आहे. त्यांचा जीवन संदेश जाणून घेऊन त्याचा आजच्या संदर्भात अन्वयार्थ लावून आपला वर्तन व्यवहार करणे ही सावित्रीच्या लेकींची आणि लेकरांची जबाबदारी आहे.कारण भवताल अतिशय अस्वस्थ आहे. निर्भया ते हिंगणघाट हा अमानुषतेचा, क्रूरतेचा प्रवास अजून सुरूच आहे. आंतरराष्ट्रीय ख्यातीप्राप्त भारतीय  महिला पैलवानांना आपल्या शोषणाविरोधात आवाज उठवावा लागत आहे. कष्टाने मिळवलेले पुरस्कार परत करावे लागत आहेत.आणि सरकार नावाची निर्ढावलेली यंत्रणा त्याकडे लक्ष देत नाही.हे सारं अतिशय अस्वस्थ करणार आहे. 


समतेची तुतारी वाजवण्यापेक्षा समरसतावादाची पिपाणी जोराचा आवाज काढताना दिसत आहे. महागाई बेरोजगारी सारख्या वास्तववादी प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सामूहिक आवाज पुरेशा प्रमाणात उठत नाही. मात्र त्याचवेळी कोणतीही आकडेवारी सिद्ध होत नसताना,वास्तवाचा कोणताही आधार नसताना केवळ भावनिकतेला चुचकारणाऱ्या चुकीच्या अनाठायी भूमिका घेऊन हजारो लोक रस्त्यावर उतरवले जात आहेत. माणुसकीच्या ध्रुवीकरणाऐवजी आंधळी धर्मांधता ध्रुवीत्रित केली जात आहे. धर्माविषयी प्रेम दाखवण्याचा प्रयत्न केला जातोय तो पण वास्तविक ती आंधळी धर्मांधता आहे. म्हणूनच प्रेमयुद्धाची भाषा केली जात आहे. वास्तविक या सगळ्या व्यवस्थेत स्त्रियांचे स्थान काय याचा विचार प्रत्येक लेकीने केला पाहिजे.तसे आपण करत नसू तर आपण ज्ञानज्योतींचा विचार अंगीकारण्यात कमी पडलो आहोत हे नक्की. ज्ञानज्योतीच्या विचारांच्या प्रकाशामार्गावर आपण चालणे महत्त्वाचा आहे. त्यांचा वसा आणि वारसा पुढे नेणे ही काळाची गरज आहे.


ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले यांचा जन्म ३ जानेवारी १८३२रोजी झाला .आणि १० मार्च १८९७ रोजी त्या कालवश झाल्या.सातारा जिल्ह्यातील शिरवळ जवळचे नायगाव हे त्यांचे जन्मगाव. त्यांचे वडील खंडोजी नवसे हे नायगावचे इनामदार होते.सावित्रीबाई नऊ वर्षाच्या असताना तेरा वर्षाच्या जोतिबांशी त्यांचे लग्न झाले . फुले दाम्पत्याने आपल्या कार्यातून पुढच्या अनेक पिढ्यांना, शतकांचा प्रेरणादायी ठरेल असे काम केले .महात्मा फुले यांचे कार्य व्यापक स्वरूपाचे आहे .या कार्यामध्ये त्यांना बरोबरीने साथ देणाऱ्या सावित्रीबाईंचे स्थानही फार महत्त्वाचे आहे. दीडशे वर्षापूर्वी स्त्रीमुक्तीचा विचार मांडणारे हे दांपत्य या चळवळीचे आद्य प्रणेते आहे. स्त्रियांना आर्थिक ,सामाजिक, धार्मिक गुलामगिरीतून मुक्त करण्याच्या कामाला त्यांनी वाहून घेतले. सावित्रीबाईंचे जीवन म्हणजे विचार व कृती यांचा सुरेख संगम आहे.महात्मा फुले यांच्या मावसभगिनी सगुणाबाई क्षीरसागर यांचा फुले दाम्पत्याला घडवण्यात मोठा वाटा होता .त्यांनी ज्योतिबांना स्वतःसह सावित्रीबाईनाही शिकवायला प्रवृत्त केले .ज्योतिरावांनी महारवाड्यात स्थापलेल्या शाळेत सगुणाबाई शिक्षिका झाल्या .तर सावित्रीबाई भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेत शिकवू लागल्या. सर्व प्रकारच्या निंदानालस्तीला ,अपमानाला तोंड देत सावित्रीबाईनी मोठ्या धीराने जिद्दीने काम केले .


सावित्रीबाईंनी अनुभवाच्या आधारे शिक्षणविषयक काही मूलभूत बाबी मांडल्या. त्यांनी ट्रेनिंग स्कूल काढले .जोतिबांच्या सहाय्याने २८ जानेवारी १८५३ रोजी बाल हत्या प्रतिबंधक गृहाची स्थापना केली. महाराष्ट्रातील अशा प्रकारचे पहिलेच केंद्र होते.या गुहाची जाहिरातच अतिशय नेमकी होती. त्यात म्हटले होते ‘कोणा विधवेचे अजाणतेपणे वाकडे पाऊल पडून ती गरोदर राहिली असेल ,तर तिने या गृहात जाऊन गुपचूपपणे बाळंत होऊन जावे ‘.त्या काळात अशी जाहिरात करण्याचे व काम करण्याचे धाडस केवळ सावित्रीबाई दाखवू शकल्या हे वास्तव आहे.सावित्रीबाईंचे ‘काव्यफुले ‘आणि ‘सुबोध रत्नाकर’ हे दोन कवितासंग्रह प्रसिद्ध आहेत. आपल्या कवितेतून त्यानी ऐक्याचा पुरस्कार केला .तर बेकीचा,विषमतेचा धिक्कार केला. ‘उच्चवर्णीयांनी वेदांच्या साक्षीने स्त्रिया व शूद्रांचे माणूसपण नाकारले त्या मगरूरीचे हरण करण्यासाठीच बुद्ध जन्माला आले ‘असे त्यांनी कवितेतून म्हटले आहे.


सावित्रीबाईनी गरोदर विधवेचा मुलगा दत्तक घेतला .त्या यशवंताचे लग्न दुसऱ्या जातीतील मुलीशी लावून दिले .विचाराप्रमाणे आचार ठेवण्याचे उदाहरण त्यांनी घालून दिले. आज समताधिष्ठित समाज रचनेचे ध्येय गाठायचे असेल तर सावित्रीबाईंच्या विचारांची दखल घ्यावीच लागेल. महात्मा फुले यांच्यानंतर सावित्रीबाईनी सात वर्षे सत्यशोधक समाजाचे नेतृत्व केले. नातेवाईकांचा विरोध पत्करून जोतीबांच्या निधनानंतर त्यांचे उत्तर कार्य त्यांनी स्वतः केले. १८९७ साली पुणे शहरात प्लेगची साथ पसरली होती .पांडुरंग बाबाजी गायकवाड या मुलाला दवाखान्यात नेत असतानाच प्लेगने सावित्रीबाईंचा बळी घेतला. सेवा, त्याग, धाडस ,सहनशीलता या सद्गुणांचे मूर्तीमंत प्रतीक म्हणून सावित्रीबाईकडे पहावे लागेल. ज्या पुण्यामध्ये सावित्रीबाईंना मुलींना शिकवण्यासाठी दगड -धोंडे ,शेण -माती झेलावी लागली त्याच पुण्यातील विद्यापीठाला ‘सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ’ असे अभिमानाने नाव द्यावे लागले यातच सारे काही आले .’जागतिक महिला दिन’ आणि ‘ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले स्मृतिदिन’ संघर्षातूनच समता प्रस्थापित करता येते अशी प्रेरणा देणारा आहे.


(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)

Post a Comment

Previous Post Next Post