प्रेस मीडिया लाईव्ह :
प्रसाद माधव कुलकर्णी, इचलकरंजी
(९८ ५०८ ३० २९०)
prasad.Kulkarni65@gmail.com
१५ जानेवारी हा डॉ .मार्टीन ल्युथर किंग यांचा जन्मदिन.'अमेरिकन कृष्णवर्णीयांचे गांधी ' म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या महामानवाने १९६० च्या दशकात वर्णभेदाविरुद्ध अभिनव पद्धतीने लढा उभारला. आणि त्याद्वारे अमेरिकन समाजाच्या दृष्टिकोनात महत्वपूर्ण बदल घडवून आणला.अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच कृष्णवर्णीय अध्यक्ष होण्याचा मान २००८ साली बराक ओबामा यांना मिळाला हे खरे आहे. पण अमेरिकन लोकमानसिकतेत वैचारिक परिवर्तन त्या आधी चार-पाच दशके मार्टीन ल्युथर किंग यांनी घडवून आणले होते. याचे महत्त्व मोठे आहे. ' जर तुम्ही उघडू शकत नसाल तर पळा, पळू शकत नसाल तर चाला चालू शकत नसाल तर रांगा, पण काहीही झाले तरी तुम्ही पुढे जात राहिले पाहिजे.' हा समाज परिवर्तनासाठीचा मूलभूत विचार त्यांनी मांडला होता. आज पुन्हा उच्चनीचता, जत्यांधता, धर्मांधता यांचे स्तोम प्रचंड वाढत असताना आणि राजकारणासाठी त्याचा अतिशय हीन पद्धतीने वापर होत असताना मार्टिन यांच्या विचारांना समजून घ्यावे लागेल. विषमतेशी लढा देण्याची प्रेरणा त्यांच्या शब्दाशब्दात आहे. कारण ते विश्वाला वंद्य असणाऱ्या महात्मा गांधींच्या विचारांचे पाईक आहेत.
१५ जानेवारी १९२९ रोजी मार्टीन ल्युथर किंग यांचा जन्म अटलांटा येथे झाला. आणि अथांग काम करण्याची मनीषा असूनही वयाच्या अवघ्या ३९ व्या वर्षी ४ एप्रिल १९६८ रोजी त्यांना एका गौरवर्णीयाच्या गोळीची शिकार व्हावे लागले.या झुंजार ध्येयनिष्ठ नेत्याचा महात्मा गांधी यांच्याप्रमाणेच खून झाला. वंशवादी ,वर्णवादी नथुरामी खुनशी प्रवृत्ती सर्वत्रच असते. पण अखेर जगभर अहिंसेचा गांधींमार्गाच महत्त्वाचा ठरत असतो. हे छुप्या व उघड नथूरामी समर्थांनाही मान्य करावेच लागते. वाईट लोकांच्या बाष्फळ बडबडीपेक्षा चांगल्या लोकांचे मौन अधिक त्रासदायक असते. म्हणूनच मनात शंभर चांगले विचार जोपासण्यापेक्षा एका चांगल्या विचाराला कृतिशील गती देणे महत्त्वाचे आहे . असे डॉ.मार्टीन म्हणत असत.
मार्टिन ल्युथर किंग एकाधर्मोपदेशकाच्या घरी जन्मले. त्यांचे वडील व आईची आई उत्तम प्रवचनकारही होते. मार्टिन यांनी म्हटलं अटलांटा कॉलेजमधून बीएची पदवी घेतली.पुढे त्यांनी वडिलांच्या इच्छेप्रमाणे धार्मिक शिक्षणाचा अभ्यासक्रम पूर्ण केला.१९५५ साली त्यांनी बोस्टन विद्यापीठाची पीएचडी पदवीही प्राप्त केली.वडिलांप्रमाणे तेही अलाबामा राज्याच्या मोंटगोमेरी येथे डेक्टर अव्हेन्यू चर्चमध्ये धर्मोपदेशक म्हणून काम करू लागले. पण एका लढ्यात ते ओढले गेले. आणि त्यांच्या जीवन प्रवाहाची दिशा बदलली. त्या खेड्यात स्थानिक वाहतूक कंपनीच्या बसमध्ये गोऱ्या माणसा शेजारी कृष्णवर्णीयांना बसायची परवानगी नव्हती. त्या वर्णभेदाविरोधी तेथे लढा सुरू केला.मार्टीन ल्युथर त्याचा भाग बनले व त्याचे नेते बनले.
'अमेरिकेतील काळे लोक यापुढे स्वातंत्र्य आणि न्याय मिळाल्या वाचून गप्प बसणार नाहीत ' हे मार्टीन यांचे उद्गार सर्वत्र दुमदुमू लागले.ही चळवळ यशस्वी झाल्यावर त्यांनी याच वर्णभेद विरोधी कार्याला वाहून घेतले. त्यासाठी त्यांना सातवेळा तुरुंगात जावे लागले. दवाखान्यापासून उपाहार घरापर्यंत जेथे जेथे वर्णभेद दिसेल तेथे तेथे त्यांनी लढा उभारला.
वर्णभेदाविरुद्धचा लढा योग्य प्रकारे संघटित करण्यासाठी आणि त्यामध्ये तरुणांचा, विद्यार्थ्यांचा सहभाग वाढावा यासाठी त्यांनी स्टुडन्ट नॉन व्हायलंट को ऑर्डिनेटिंग कमिटी (एसएनसीसी )स्थापन करण्यास मदत केली. तत्पूर्वी त्यांनी सदर्न ख्रिश्चन लिडरशिप कॉन्फरन्स ची स्थापना केली होती . त्याद्वारे त्यांनी या प्रश्ना विरोधात आवाज उठवला होता.ते भारतातही आले होते .पंडित जवाहरलाल नेहरू यांच्याशी त्यांची चर्चा झाली होती.त्यांचा सर्व लढा महात्मा गांधींच्या मार्गाचा अवलंब करणारा म्हणजेच अहिंसक होता. त्यांच्या आंदोलनावर अमेरिकन प्रशासनाने प्रचंड फार्सने पाण्याचे फवारे सोडण्यापासून ते कुत्री सोडण्यापर्यंतचे सर्व प्रयत्न केले .पण मार्टिन ल्युथर मागे हटले नाहीत .परिणामी १९६३ साली अमेरिकेच्या इतिहासात प्रथमच अध्यक्षांनी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात वर्णभेदाचा प्रश्न हा नैतिक प्रश्न असल्यास जाहीर केले. १९६४मध्ये अमेरिकन कायदेमंडळाने नागरी हक्कांचा कायदा संमत केला. त्यामुळे सार्वजनिक ठिकाणी व वाहनातून वर्णीय विभागणी रद्द करण्याचे तसेच सरकारी मालकीच्या सवलती आणि नोकऱ्यांमध्ये वर्णीय पक्षपाताला प्रतिबंध करण्याचे अधिकार अमेरिकेच्या मध्यवर्ती सरकारला देण्यात आला. नंतर आणखी लढा प्रखर केल्यावर मताधिकारही मिळाला.हा मार्टीन यांचा नैतिक विजय होता.मार्टीन यांना एकदा अटक झाल्यानंतर तुरुंगातून एका पत्रकातून ते म्हणाले,' गाडलेले लोक कायमचे काढलेले राहू शकत नाहीत. स्वातंत्र्याची उर्मी कधीतरी उफाळून येतेच.अमेरिकेत काळ्यांच्या बाबतीत तसेच झालं. स्वातंत्र्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे ही जाणीव अंत:प्रेरणे दिली आहे. आणि तो हक्क मिळवता येतो अशी जाणीव बाह्यप्रेरणेने दिली आहे.'
आपल्या सर्व समाजाची घडी बदलण्याची आवश्यकता वाढत चालली आहे असे स्पष्ट करून डॉक्टर मार्टिन म्हणाले, अनत्याचारी सत्याग्रहाने असे वातावरण निर्माण होते की ,जे लोक आजपर्यंत न्याय हक्कांबद्दल वाटाघाटी करायला तयार नसत त्यांना वाटाघाटी करण्यावाचून गत्यंतरच राहत नाही. आजवरच्या अनुभवावरून आम्ही शिकलो आहोत की स्वातंत्र्य कोणीही आपण होऊन देत नाही. दडपल्या गेलेल्या जनतेला ते ताठमानाने उभे राहून मिळवावे लागते
वॉशिंग्टन शहराच्या इतिहासात आजवरचा सर्वात भव्य मोर्चा मार्टिन ल्युथर किंग यांच्या नेतृत्वाखाली निघाला होता.लिंकन स्मारका जवळील या मोर्चात अडीच लाख लोकांचा सहभाग होता. त्यात अनेक धर्माचे, वंशाचे लोक सहभागी झाले होते. या मोर्चा पुढे मार्टीन यांनी जे भाषण केलं ते जगाच्या इतिहासातील एक प्रभावी भाषण म्हणून ओळखले जाते.ते म्हणाले होते ,' माझे एक स्वप्न आहे की, एक दिवस जोर्जियाच्या लाल खेड्यांवर माजी गुलामंची मुलं आणि माजी गुलामांच्या मालकांची मुलं एका खेळात बंधू भावाने रममाण होतील.माझे स्वप्न आहे की, अन्याय आणि गांजणुक यांच्या झळा सहन करत असलेल्या मिसिसिपी राज्याचं परिवर्तन स्वातंत्र्य आणि न्याय यांच्या हिरवळीत होईल. माझे स्वप्न आहे की, एक दिवस माझी चार छोटी मुले एका राष्ट्रात राहतील की जिथे त्यांच्या कातडीच्या रंगावरून नव्हे तर शीलसंपदे वरून त्यांची पारख केली जाईल. अमेरिकन समाजाच्या मानसिकतेत बदल घडवून आणण्याची महान कामगिरी करणाऱ्या मार्टीन यांना वयाच्या अवघ्या ३५ व्या वर्षी १९६४ साली नोबेल पारितोषिक मिळाले होते. यांनी आपले अवघे आयुष्य शांतता सदाचार आणि न्यायाच्या प्रस्थापनेसाठी खर्च केले.त्यांनी काही पुस्तकेही लिहिली.या महान नेत्याच्या स्मृतीला विनम्र अभिवादन...!
(लेखक समाजवादी प्रबोधिनी,इचलकरंजीचे १९८५ पासूनचे कार्यकर्ते आहेत.प्रबोधिनीच्या वतीने गेली पस्तीस वर्षे नियमितपणे प्रकाशित होणाऱ्या ‘प्रबोधन प्रकाशन ज्योती ‘मासिकाचे संपादक आहेत. तसेच लेखक,कवी,गझलकार म्हणून सुपरिचित आहेत.)