भारतीय जनतेचे,घटनेचे हे लोकतत्व नीटपणे समजून घेण्याची गरज आहे.


प्रेस मीडिया लाईव्ह :

 इचलकरंजी ता.१, २०२३ ला निरोप देऊन २०२४ मध्ये पदार्पण करत असताना राजकीय ,सामाजिक ,आर्थिक, सांस्कृतिक अशा सर्व क्षेत्रांमध्ये सर्वांगीण समतेच्या व विकासाच्या राजकारणाची गरज आहे. 

संविधानाच्या मूल्यांची जोपासना करणारे सुदृढ राजकारणच जगातील सर्वाधिक लोकसंख्येच्या आपल्या देशाला खऱ्या अर्थाने प्रगतीच्या मार्गावरती नेऊ शकते. जात्यंध व धर्मांध राजकारणाच्या सत्तालोलूप विघातक विचारधारांना देशातील तरुणाईने व सजग नागरिकांनी जाब विचारला पाहिजे.तरच वाढती बेरोजगारी , वाढती महागाई, वाढते राष्ट्रीय कर्ज, वाढती असहिष्णुता असे मूलभूत प्रश्न राजकारणाचे केंद्रबिंदू बनतील.भावनिक, धर्मांध , परधर्म द्वेशी राजकारणाने  जगातील काही देश विकासाच्या ऐवजी भकासाच्या गर्तेत अडकले आहेत.हे गांभीर्याने समजून घेणे व तसे होऊ न देण्याची जबाबदारी स्वीकारणे हीच खरी राष्ट्रभक्ती आहे.असा सांगावा घेऊन नवे वर्ष आले आहे असे मत समाजवादी प्रबोधिनीच्या साप्ताहिक चर्चासत्रात व्यक्त करण्यात आले.या चर्चासत्रात प्रसाद कुलकर्णी,तुकाराम अपराध, पांडूरंग पिसे, दयानंद लिपारे, शकील मुल्ला, सचिन पाटोळे, रामभाऊ ठिकणे,शहाजी धस्ते, मनोहर जोशी, अशोक मगदूम आदींनी सहभाग घेतला. यावेळी माजी आमदार व ज्येष्ठ समाजवादी नेते प्रा. शरद पाटील यांना आदरांजली वाहण्यात आली.

या चर्चासत्रात असे मत व्यक्त करण्यात आले की, यावर्षी आपण   लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकाना सामोरे जात आहोत.तसेच २६ जानेवारी या लोकसत्ताक दिनी संविधान अंमलबजावणीच्या अमृत महोत्सवी वर्षाला सुरुवात होत आहे. 

संविधानाने आणि त्यापूर्वी झालेल्या स्वातंत्र्य लढ्याने लोकशक्ती सर्वात महत्वाची मानली. जेव्हा ‘ लोक ‘एकीकडे आणि ‘शाही ‘दुसरीकडे अशी अवस्था तयार होते तेव्हा लोक आपल्या प्रश्नांसाठी ,आपल्या हक्कांसाठी, सामूहिक उन्नतीसाठी उस्फुर्तपणे रस्त्यावर येत असतात हा केवळ इतिहास आहे. लोकांना गृहीत धरून अथवा त्यांची मुस्कटदाबी करून चालत नसते. राज्यकारभार लोककेंद्रितच असावा लागतो. जात, धर्म,अनर्थ केंद्रीत असून चालत नाही.भारतीय जनतेचे,घटनेचे हे लोकतत्व नीटपणे समजून घेण्याची गरज आहे. या चर्चेत नव्या वर्षातील विविध आव्हानांचा आणि संधींचा ऊहापोह करण्यात आला

Post a Comment

Previous Post Next Post