समृद्धी महामार्ग पोलीस आणि आरटीओ गिऱ्हाईक हेरतात का ?

 समृद्धी महामार्गांवरील वाढत्या अपघातांवरून सत्यजीत तांबेंचा सरकारला प्रश्न


प्रेस मीडिया लाईव्ह

 विशेष प्रतिनिधी  : सुनील पाटील

राज्यातील महामार्गावरील अपघातांमध्ये वाढ झाली असून राज्यात रस्ते अपघातात १५२२४ जणांचा मृत्यू झाला आहे. या अपघातांसाठी अनेक कारणं असून अनेकदा महामार्गावरील वळणांवर, उतारांवर नियम तोडणाऱ्या वाहन चालकांवर कारवाईसाठी दडून बसलेल्या पोलीस व आरटीओ कर्मचाऱ्यांमुळेही अपघात होत असल्याचा ठपका आमदार सत्यजीत तांबे यांनी ठेवला.

अचानक पोलीस दिसल्याने वाहन थांबवताना किंवा पोलिसांच्या भीतीने वाहन जोरात दामटताना अपघात होत असून याबाबत पोलिसांना काही सूचना अथवा नियमावली करणार का, असा प्रश्नही तांबे यांनी उपस्थित केला.

२०२० ते २०२२ या तीन वर्षांच्या काळात राज्यातील रस्ते अपघातांची आणि अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या वाढली आहे. यासाठी अनेक कारणं असून महामार्गांवर सर्वाधिक अपघात होतात. अनेकदा महामार्गांवर वाहतुकीच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करण्यासाठी महामार्ग पोलीस, वाहतूक पोलीस आणि आरटीओ ठिकठिकाणी तैनात असतात. मात्र हे पोलीस एखाद्या वळणावर, उतारावर झाडामागे दडून असतात. ते अचानक लोकांसमोर आल्यावर एक तर पटकन वाहन थांबवल्याने किंवा अधिक वेगाने दामटल्याने अपघात घडतात, असं सत्यजीत तांबे म्हणाले. हे वाहतूक पोलीस गिऱ्हाईकं हेरतात का, असा खोचक सवालही त्यांनी केला. 

त्याशिवाय सत्यजीत तांबे यांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृद्धी महामार्गाच्या गुणवत्तेबाबतही प्रश्न उपस्थित केला. नागपूर ते घोटी या दरम्यान १४ टप्प्यांमध्ये हे काम झालं. १४ वेगवेगळ्या कंत्राटदारांनी हे काम केल्यामुळे कामाच्या गुणवत्तेत प्रचंड फरक पडला आहे. काही टप्प्यांमध्ये गाडी प्रचंड उडते, तर काही ठिकाणी गाडी व्यवस्थित जाते. रस्त्याच्या या विभिन्न स्थितीमुळेही अपघात होत असल्याचं तांबे यांनी स्पष्ट केलं. या रस्त्याची गुणवत्ता एकसमान करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का, संपूर्ण रस्त्यावर पॅचसारखं एखादं कोटिंग करणार का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला.

रस्त्यांची गुणवत्ता तपासण्याचे निर्देश रस्ते विकास महामंडळाला दिले जातील, असं आश्वासन राज्य उत्पादन शुल्क आणि सीमा संरक्षण मंत्री शंभुराज देसाई यांनी दिलं. त्याशिवाय पोलिसांनी वाहन चालकांना दिसेल अशा ठिकाणीच उभं राहावं, अचानक वाहन चालकांसमोर येऊन त्यांना अडवू नये, याबाबत महामार्ग पोलीस अधीक्षक आणि परिवहन आयुक्त यांना सूचना दिल्या जातील, असंही देसाई म्हणाले.

समृद्धी महामार्गावर वाढलंय चोऱ्यांचं प्रमाण

७०१ किलोमीटरचा सहापदरी समृद्धी महामार्ग १० जिल्ह्यांमधून जात असला, तरी तो वस्तीबाहेरून जातो. त्यामुळे हा महामार्ग सुनसान असतो. परिणामी या महामार्गावर चोऱ्या आणि लुटमारीच्या घटना समोर येत आहेत, याकडे सत्यजीत तांबे यांनी सभागृहाचं लक्ष वेधलं. याबाबत सरकार काय उपाययोजना करणार, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला. यावर महामार्ग पोलिसांना गस्त घालण्याच्या सूचना दिल्या जातील. मात्र, या गस्तीच्या वाहनांमुळे अपघात होणार नाहीत, याची खबरदारी घ्यावी लागेल, असं मंत्री शंभुराज देसाई यांनी स्पष्ट केलं.

Post a Comment

Previous Post Next Post