प्रेस मीडिया लाईव्ह
विशेष प्रतिनिधी सुनील पाटील :
माथेरान मधील क्रांतिसूर्य हुतात्मा वीर भाई उर्फ विठ्ठलराव कोतवाल यांच्या 111 व्या जयंती निमित्त नगरपालिकेकडून अभिवादन करण्यात आले.कोतवाल ब्रिगेडच्या माध्यमातून अनेक कार्यकर्ते या अभिवादन कार्यक्रमात उपस्थित होते.
देशाला स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी बलिदान देणाऱ्या माथेरानमधील सुपुत्राच्या म्हणजे हुतात्मा वीर विठ्ठलराव कोतवाल यांच्या 111 व्या जयंतीचे औचित्य साधून वेगवेगळ्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.मुख्याधिकारी वैभव गारवे यांच्या हस्ते हुतात्मा भाई कोतवाल यांच्या नौरोजी उद्यान येथील अर्ध पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला.सकाळी 8 वाजता हुतात्मा स्मारक येथे पुष्पहार अर्पण केल्यानंतर मशाल मिरवणूक काढण्यात आली.माजी नगराध्यक्षा प्रेरणा सावंत,माजी उपनगराध्यक्ष आकाश चौधरी, माजी नगरसेवक कुलदीप जाधव,कोतवाल ब्रिगेड अध्यक्ष रोहिदास क्षीरसागर तसेच अन्य नागरिकांनी मशाल मिरवणुकीत सहभाग नोंदवला.
माथेरानच्या वीर हुतात्मा भाई कोतवाल प्राथमिक शाळेत अभिवादनपर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.शाळेचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढेबे तसेच अन्य शिक्षक यांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले होते. विद्यार्थ्यांनी अभिवादनपर गीते सादर करून त्यांना आदरांजली वाहिली.याप्रसंगी लोकशाहीर वैभव घरत यांनी देशभक्तीपर गीते सादर करून रसिकांची मने जिंकली.यावेळी कोतवलांचा माथेरान मधील पूर्ण परिवार व माजी शिक्षण सभापती दिनेश सुतार,प्रभारी अधीक्षक अंकुश इचके आणि नगरपालिका कर्मचारी,शाळेचे कर्मचारी,विद्यार्थी तसेच अन्य नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.रात्री 7 वाजता वीर भाई कोतवाल यांच्या जीवनावर आधारित भाजप कडून चित्रपट दाखविण्यात आले.