प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रवीण देवकाते यांनी ड्रग्ज तस्कर ललित पाटीलला रुग्णालयातून पळून जाण्यास मदत केल्या प्रकरणी गुन्हे शाखेनं त्यांना अटक केली आहे. सोमवारी रात्री पुणे पोलिसांनी ही कारवाई केली. या प्रकरणात यापूर्वी ससून रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याला अटक करण्यात आली होती. मात्र वैद्यकीय अधिकारी प्रविण देवकाते यांना अटक केल्यानं जोरदार खळबळ उडाली आहे.
डॉ. प्रवीण देवकाते हे ससून रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी असून ते ऑर्थो विभागाचे प्रमुख होते. ससून रुग्णालयात डॉ प्रवीण देवकाते यांच्या देखरेखीखाली ललित पाटील याच्यावर उपचार सुरू होते. डॉ प्रवीण देवकाते यांनी बलकवडे आणि भूषण पाटील यांच्या फोनवर बोल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झाल्यानं त्यांना अटक करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी पोलिसांनी आतापर्यंत 2 पोलीस कर्मचाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. त्यासह ललित पाटीलच्या 2 मैत्रिणी आणि येरवडा कारागृहाच्या कामगारांसह डॉक्टर संजय मरसाळे यांनाही या प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
ललित पाटील ड्रग्ज प्रकरणी कसबा मतदार संघाचे आमदार रवींद्र धंगेकर यांनी पोलीस आयुक्तांच्या कार्यालयाच्या बाहेर ठिय्या आंदोलन केलं होतं. त्यानंतर पोलिसांनी जलद कारवाई करण्याचा शब्द दिला होता. अखेर डॉ प्रवीण देवकाते यांना अटक करण्यात आली आहे. यात अजूनही डॉ. संजीव ठाकूर यांना देखील अटक करण्यात आलेली नाही. या प्रकरणी डॉ. संजीव ठाकूर यांना ज्या लोकांनी फोन केले, त्यांचा तपास करण्यात यावा. ज्यांनी डिल केली ते बाहेर आहेत, असा आरोप यावेळी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केला.