प्रेस मीडिया लाईव्ह :
अनवर अली शेख :
पुणे : तपासणीसाठी क्लिनिक मध्ये गेलेल्या तरूणीसोबत अश्लील चाळे करुन तिचा विनयभंग केल्याची घटना स्वारगेट परिसरात घडली असून याप्रकरणी न्यूरोलॉजिस्ट डॉक्टरवर स्वारगेट पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदरचा प्रकार 29 नोव्हेंबर रोजी मुकूंदनगर येथे सायंकाळी सव्वा सहा ते साडेसहा या दरम्यान घडला आहे.
याबाबत आंबेगाव बुद्रुक येथे राहणाऱ्या तरूणीने गुरुवारी (दि.30 नोव्हेंबर) स्वारगेट पोलीस ठाण्यात (Swargate Police Station) फिर्य़ाद दिली आहे. यावरून डॉ. श्रीपाद पुजारी (रा. बिझनेस कोर्ट, मुकूंदनगर, स्वारगेट) याच्यावर आयपीसी 354अ नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या बाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी श्रीपाद पुजारी हे न्यूरोलॉजिस्ट असून त्यांचे मुकूंदनगर येथील बिझनेस कोर्ट येथे क्लिनिक आहे . फिर्यादी तरूणीला मायग्रेनचा त्रास होत असल्याने त्या डॉ. पुजारी यांच्या क्लिनिकमध्ये बुधवारी सायंकाळी तपासणीसाठी गेल्या होत्या. त्यावेळी आरोपी पुजारी याच्या केबिनमध्ये कोणतीही महिला अटेंडन्ट नव्हती. त्यावेळी आरोपीने फिर्यादी यांच्याकडे पाहून अश्लील बोलून त्यांच्यासोबत अश्लील चाळे करुन विनयभंग केल्याचे फिर्य़ादीत नमूद केले आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक कीर्ती चाटे करीत आहेत.