शिवराज्याभिषेकासह रायगडाची कथा ऐकण्याची संधी

शुक्रवारपासून तीन दिवसीय व्याख्यानमाला

प्रेस मीडिया लाईव्ह :

पुणे : छत्रपती श्री शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या तीनशेपन्नासाव्या वर्षाचे औचित्य साधून शिवराज्याभिषेक आणि रायगडाची संपूर्ण ओळख करून देणाऱ्या व्याख्यानांचे आयोजन पुण्यात करण्यात आले आहे. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेत ही व्याख्याने होणार असून ही व्याख्यानमाला ८ ते १० डिसेंबर दरम्यान होईल.

अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम न्यास यांच्या वतीने स. प. महाविद्यालयाच्या लेडी रमाबाई हॉलमध्ये रोज सायंकाळी सात वाजता ही व्याख्याने होणार आहेत. सर्वांसाठी ही व्याख्यानमाला निःशुल्क खुली आहे.

व्याख्यानमालेत शुक्रवारी, ८ डिसेंबर रोजी 'असा होता रायगड' या व्याख्यानात डॉ. रमा लोहकरे रायगडाचा इतिहास मांडणार आहेत. रायगड या विषयावर त्यांनी पीएच.डी. संपादन केली आहे. त्याच दिवशी इतिहास अभ्यासक प्रसाद तारे यांचे 'असा झाला राज्याभिषेक' या विषयावर व्याख्यान होईल. शनिवारी, ९ डिसेंबर रोजी 'कला रसिक बाबासाहेब' हा कार्यक्रम समूह नाट्याचे प्रणेते संजय पुरंदरे, जाणता राजा महानाट्याचे प्रथम दिग्दर्शक दिवाकर पांडे, होनराज मावळे आणि सहकलाकार सादर करणार आहेत.

दुर्ग आणि इतिहास अभ्यासक महेश तेंडुलकर 'इतिहासकार बाबासाहेब' या विषयावरील व्याख्यान आणि सादरीकरण रविवारी, १० डिसेंबर रोजी करतील. शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे स्मृती व्याख्यानमालेच्या निमित्ताने होणाऱ्या या वैचारिक मंथनात सहभागी होण्याचे आवाहन अक्षय सेवा संशोधन प्रतिष्ठान आणि कौशिक आश्रम न्यास यांनी केले आहे.

----

अधिक माहितीसाठी संपर्क- श्री. राजाभाऊ पानगावे

९८२२७३९९८४

Post a Comment

Previous Post Next Post