प्रेस मीडिया लाईव्ह :
मुंबई : काल, गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि माजी मंत्री नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले आणि सुरू झाले मोठे राजकारण . अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी संबंध असल्याच्या आरोप मंत्री नवाब मलिक यांचेवर आहे याबाबत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पत्र पाठवून 'सत्तेपेक्षा देश महत्त्वाचा' असल्याचा सांगत त्यांच्या सत्तेतील सहभागावर आक्षेप घेतला आहे.
आता या निमित्ताने अजित पवार गटाचे खासदार प्रफुल्ल पटेल हे ठाकरे गट आणि काँग्रेसच्य रडारवर आले आहेत.राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला गुरुवारपासून नागपुरात सुरुवात झाली. वैद्यकीय जामीनावर कारागृहाबाहेर आलेले आमदार नवाब मलिक हे विधानसभेत थेट सत्ताधारी बाकांवर बसल्याने ते अजित पवार गटात सामील झाल्याचे स्पष्ट झाले आहे. महाविकास आघाडी सरकारच्या काळात मंत्री असलेल्या नवाब मलिक यांच्यावर अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी कथित संबंध असल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यामुळे देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मलिक यांना देशद्रोही म्हटले होते. पण तेच मलिक आता सत्तेत सहभागी झाल्याने फडणवीस यांच्यावर विरोधकांनी टीका करण्यास सुरुवात केली आहे.
नवाब मलिक सत्ताधारी बाकांवर बसले म्हणून भाजपाला आग लागली; मग इक्बाल मिर्चीशी संबंधित जागेचा व्यवहार करणारे प्रफुल्ल पटेल कसे चालतात? भाजपाच्या दृष्टीने इक्बाल मिर्ची देशभक्त आहे का? असा सवाल काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी केला आहे. दांभिकपणा भाजपाचा स्थायीभाव असून लोकांना ते मूर्ख समजतात, अशी जोरदार टीका त्यांनी केली आहे.