प्रेस मीडिया लाईव्ह :
पिंपरी : महर्षी दयानंद सरस्वती यांच्या द्विशताब्दी जयंती निमित्त आणि आर्य समाज पिंपरी या संस्थेच्या ७३ व्या वर्धापन दिनानिमित्त शुक्रवार ते रविवार विविध धार्मिक व सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती अध्यक्ष सुरेंद्र करमचंदानी, सल्लागार मुरलीधर सुंदरानी, सचिव हरेश तीलोकचंदानी यांनी प्रसिद्धीस दिली आहे.
पिंपरी कॅम्प येथील आर्य समाजच्या पटांगणात शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी सात वाजता, तसेच रविवारी सकाळी आठ वाजता कर्नाल, हरियाणा येथील प्रवचनकार विदुषी अंजली आर्या आणि पुण्यातील ज्येष्ठ प्रवचनकार आचार्य सोनेरावजी यांचे प्रवचन, भजन होणार आहे. त्यांना तबला वादक रमाकांत राऊत साथ देणार आहेत. सायंकाळी सहा वाजता होमहवन, शनिवारी (दि.२३) दुपारी चार वाजता बालकांच्या हस्ते होम हवन होणार आहे. रविवारी (दि.२४) सकाळी दहा वाजता ५१ बहुकुंडीय यज्ञ होणार आहे. पिंपरी आर्य समाजचे पुरोहित धर्माचार्य पंडित विवेक शास्त्री यांच्या मार्गदर्शनाखाली होम हवन होणार आहे. तसेच हुतात्मा स्वामी श्रद्धानंद यांच्या ९७ व्या बलिदान दिवस निमित्त पिंपरीतील आर्य वीर दलाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले आहे.
...............................
...............................
विदुषी अंजली आर्या यांचा परिचय : या वैदिक सिद्धांताच्या प्रचारासाठी जगभर प्रवचन कीर्तन करून मार्गदर्शन करीत असतात. त्यांनी हरियाणा राज्यातील कर्नाल येथून उच्च शिक्षण घेतले आहे. त्यांची संगीत क्षेत्रातील आवड आणि वाणीवरील प्रभुत्व पाहून त्यांचे आजोबांनी त्यांना आर्य समाजाचे कार्याचा प्रचार, प्रसार करण्यासाठी मार्गदर्शन केले. समाजाचे रामचरित्रातून प्रबोधन करणे, पाखंड, अंधविश्वास विषयी जागृती करणे या कार्यासाठी त्यांनी आपले जीवन समर्पित केले आहे.
...................................
प्रा. आचार्य सोनरावजी यांचा परिचय : प्रा. आचार्य सोनेरावजी हे बीड जिल्ह्यातील रहिवासी आहेत. त्यांनी तरुण वयात हरिश्चंद्र सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली संस्कृत व वेदशास्त्र अभ्यासासाठी पंजाब मधील गुरुकुलात प्रवेश घेतला होता. नंतर अमृतसर, चंदिगड आणि मेरठ या तीनही विद्यापीठातून एम. ए. संस्कृत परीक्षा सुवर्णपदकांसह प्राप्त केल्या. लातूरच्या महाविद्यालयात संस्कृत प्राध्यापक म्हणून काही काळ सेवा केली. त्यानंतर आर्य समाजाचे प्रचारक म्हणून ते आफ्रिकेत गेले, नंतर इंग्लंड, अमेरिका येथेही प्रचारक म्हणून जबाबदारी सांभाळली. त्यांनी आफ्रिका, युरोप, अमेरिका खंडातील अनेक देशात आर्य समाजाचे वेद, उपनिषदांचे महत्त्व पटवून देणारे प्रवचन करून समाज प्रबोधन केले आहे. आता ते पुण्यात स्थायिक झाले आहेत. त्यांचे संस्कृत भाषेवर प्रभुत्व असून वेद, उपनिषधांचा सखोल अभ्यास आहे.
....................................